बॉलिवूडमधील निर्माते-दिग्दर्शक रामगोपाल वर्मा हे गुरुवारी कॉपी राईट अॅक्टअंतर्गत दाखल झालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने औरंगाबाद जिल्हा न्यायालयात हजर झाले. याप्रकरणाची पुढील सुनावणी २० ऑक्टोबर रोजी अपेक्षित आहे.

नूतन कॉलनीतील रहिवासी मुश्ताक मोहसीन मुबारक हुसेन यांनी तक्रार दिली होती. त्या तक्रारीत त्यांनी रामगोपाल वर्मा यांच्यावर कथा चोरीचा आरोप केला होता. मुश्ताक यांच्या तक्रारीनुसार त्यांनी ‘जंगल में मंगल’ नावाची कथा लिहिली होती. त्या कथेवर रामगोपाल वर्मा यांनी ‘अज्ञात’ नावाचा चित्रपट तयार केला. त्यामुळे कलम ५१ प्रमाणे कॉपी राईट कायद्याचा भंग झाला. याप्रकरणी कलम ६३ नुसार शिक्षा व्हावी, अशी मागणी त्यांनी केली.

दरम्यान, २००९ मध्ये अज्ञात हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. तर मुश्ताक यांनी २०१० मध्ये दावा दाखल केला. याप्रकरणी रामगोपाल वर्मा व रॉनी स्क्रुवाला यांना प्रतिवादी करण्यात आले होते. यापूर्वी वर्मा यांनी जामीन मिळवला होता. त्यानंतर ते हजेरी माफीचा अर्ज देत होते. १२ जून २०१८ रोजी न्यायालयात वर्मा यांच्याकडून दाखल हजेरी माफीचा अर्ज नामंजूर करण्यात आला होता. न्यायालयाने रामगोपाल वर्मा व रॉनी स्क्रुवाला यांना हजर राहण्यासाठी वॉरंट बजावले होते.

त्यावरून गुरुवारी रामगोपाल वर्मा व रॉनी स्क्रुवाला हे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी के. के. कुरुंदळे यांच्या न्यायालयात हजर झाले. याप्रकरणाची पुढील सुनावणी २० ऑक्टोबर रोजी अपेक्षित आहे. याप्रकरणात रामगोपाल वर्मा यांच्यावतीने अॅड. दुजेंद्रकुमार शर्मा, अॅड. दिलीप खंडागळे, अॅड. विजय सपकाळ, अॅड. आशीष सूर्यवंशी, अॅड. प्रतीक शर्मा यांनी तर फिर्यादीकडून अॅड. वाळूजकर यांनी काम पाहिले.