छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय शो म्हणजे ‘इंटू द वाइल्ड विद बेयर ग्रिल्स’ (Into The Wild With Bear Grylls). या शो च्या प्रत्येक भागासाठी प्रेक्षक फार उत्सुक असतात. डिस्कव्हरी चॅनेलचा प्रसिद्ध शो अशी ओळख असलेल्या या शो मध्ये आतापर्यंत बॉलिवूडसह अनेक हॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली होती. आता या यादीत आणखी एका अभिनेत्याचा समावेश होणार आहे. अभिनेता अक्षय कुमार आणि रजनीकांत यांच्यानंतर आता बॉलिवूडचा सिंघम अजय देवगण या शोमध्ये झळकणार आहे. यामुळे अजय देवगणच्या अनेक चाहत्यांना आनंद झाला आहे.

डिस्कव्हरी चॅनलच्या या सुपरहिट शो मध्ये बेअर ग्रिल्ससोबत पहिल्यांदाच अजय देवगण झळकणार आहे. यापूर्वी यात बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि दाक्षिणात्य अभिनेता रजनीकांतही दिसला होता. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदीही २०१९ मध्ये या कार्यक्रमात दिसले होते. त्यानंतर आता अजय देवगणही यात दिसणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बेअर ग्रिल्ससोबत अजय देवगणच्या या शोची शूटींग मालदीवमध्ये होणार आहे. नुकतंच अजय यासाठी रवाना झाला आहे. अजय देवगण आणि बेयर ग्रिल्सचा हा शो नेमका कधी प्रसारित होणार, याची तारीख अद्याप निश्चित करण्यात आलेली नाही. मात्र या शो चा  प्रीमिअर डिस्कव्हरी प्लस अॅपवर होणार असल्याचे बोललं जात आहे.

‘मॅन वर्सेस वाईल्ड’ या कार्यक्रमाचा होस्ट बेअर ग्रिल्स हा अत्यंत निर्भिड आणि साहसी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तो या कार्यक्रमात काम करत आहे. यात तो प्रतिकूल परिस्थितीत जगण्यासाठी कशाप्रकारे संघर्ष करता येतो, याची माहिती देतो. या कार्यक्रमादरम्यान बेअर ग्रिल्सने आतापर्यंत अनेक जंगल आणि पर्वतांवर अॅडव्हेंचर ट्रीप केल्या आहेत. या सर्व ट्रीपमध्ये त्याने कुठल्या ना कुठल्या भयंकर परिस्थितीशी झुंज दिली. बर्फाच्छादित पर्वतांवर आपले प्राण वाचवण्यासाठी पळण्यापासून, पाण्यात पोहत दुसऱ्या किनाऱ्यापर्यंत जाण्यापर्यंत, तर कुठल्या जंगली प्राण्याला मारुन आपली भूक भागवणे, यांसह अनेक गोष्टी बेअर ग्रिल्स अगदी सहजरित्या करतो. त्यामुळे त्याचा हा शो प्रचंड सुपरहिट आहे.

कुठल्याही कठीण परिस्थितीत आपण स्वत:चे प्राण कशाप्रकारे वाचवू शकतो आणि स्वत:ला त्या समस्येतून कसं सोडवू शकतो, याची शिकवण या कार्यक्रमाच्या माध्यमातून बेअर ग्रिल्स नेहमीच देतो.