टीव्ही अभिनेता आणि बिग बॉसमधील स्पर्धक Ajaz Khan एजाज खानने गोरक्षेच्या मुद्यावर काही प्रश्न उपस्थित केले आहेत. एजाजने त्याच्या फेसबुक अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर करुन मोदी आणि योगीनाथांना हिंदू- मुसलमान यांच्यात भांडणं न लावण्याचा सल्ला दिलाय.
गोरक्षेच्या नावावरुन हिंदू- मुसलमान यांच्यात भांडण न लावता, जी मूळ समस्या आहेत त्यांचे निरसण करण्याकडे लक्ष द्या, असा सल्ला एजाजने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना दिला आहे. एजाजचा हा व्हिडिओ आतापर्यंत १३ लाखांहून अधिक लोकांनी पाहीला. ३ मिनिटांच्या या व्हिडिओमध्ये आपल्या देशात गायीच्या कातडीपासून बनवलेल्या गोष्टी किती सहज उपलब्ध होत आहेत याकडे त्याने साऱ्यांचे लक्ष वेधले. तसेच या सगळ्या राजकारणात निष्पाप लोकांचा बळी जात आहे हे कुठे तरी थांबले पाहिजे असेही त्याने सांगितले.
‘गोरक्षक कोणालाही पकडत आहेत आणि त्यांना मारहाण करतायेत. आतापर्यंत अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आणि याबद्दल कोणी काही बोलत नाही. नुकताच मी एक हार्ले डेविडसनचा लेदर बेल्ट घेतला. हा गायीच्या कातडीपासून बनवलेला बेल्ट आहे. जगभरात हा बेल्ट विकला जातो. तुम्हाला या देशात दंगल घडवून आणायची आहे, हिंदू- मुसलमान यांच्यात फूट पाडायची आहे. गोरक्ष, आदित्यनाथ आणि मोदी यांना मी हार्ले डेविडसन बंद करण्याची विनंती करतो. तसंच रस्त्यावर भटकणाऱ्या गायींची अवस्थाही खूप वाईट असते. त्यांच्याकडेही लक्ष द्या. मी सत्य बोलायला घाबरणार नाही. हिंदू- मुसलमानमध्ये फूट पाडू नका,’ अशा आशयाचा व्हिडिओ एजाजने फेसबुकवर शेअर केला आहे.
एजाज सध्या काश्मिरमध्ये एका सिनेमाच्या चित्रीकरणासाठी गेला आहे. एका मॉडेलला अश्लिल मेसेज पाठवल्यासंदर्बात त्याला अटकही करण्यात आली होती. पण, १०,००० रुपयांच्या जामीनावर त्याची सुटका झाली होती.