अक्षय कुमारचा आगामी टॉयलेट एक प्रेमकथाचा पहिला पोस्टर प्रदर्शित करण्यात आला आहे. अक्षयने हे पोस्टर हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांत प्रदर्शित केला आहे. हे पोस्टर पाहून अक्षयचे चाहते नक्कीच खूश होतील यात काही शंका नाही. पोस्टर पाहताना स्वच्छ भारत अभियानावर आधारित या सिनेमातून अक्षयला नेमका काय संदेश द्यायचा आहे हे स्पष्ट होते. बॉलिवूडच्या या खिलाडी कुमारने गुरुवारी रात्री दोन्ही पोस्टर त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करत त्याने म्हटले की, स्वच्छ स्वातंत्र्यासाठी तयार व्हा. ११ ऑगस्टला ‘टॉयलेट एक प्रेम कथा’, ही एक अनोखी प्रेम कहानी येत आहे. अक्षयच्या या पोस्टला आतापर्यंत दीड लाखांपेक्षाही अधिक लाइक्स मिळाले आहेत. या सिनेमात भूमी पेडणेकर. अक्षयच्या पत्नीची भूमिका साकारत आहे. तर सना खान ही अक्षयच्या प्रेयसीच्या भूमिकेत दिसेल. या सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान, अक्षय अनेकदा सनाला अभिनयातले बारकावे समजावताना दिसला होता. अक्षयसोबतचा हा सिनेमा भूमी आणि सनाच्या

अभिनय करिअरला कलाटणी देणारा ठरेल अशी आशा सध्या व्यक्त केली जात आहे.
याआधी अक्षयने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करुन त्याने स्वच्छता आणि शौचालयाचा मुद्दा समोर आणला होता. तसेच एका पत्रकार परिषदेत त्याच्या सिनेमाचे नाव टॉयलेट असे का ठेवले याचाही खुलासा केला होता. अक्षय म्हणाला की, ‘ही एक खरी घटना आहे आणि आपण त्यापासून दूर पळू शकत नाही. आपल्या देशात उघड्यावर शौचाला जाणे ही खूप गंभीर घटना आहे ज्यावर आता उघडपणे बोलण्याची वेळ आली आहे. या सिनेमाचा विषय खरंच खूप चांगला आहे.’

‘आपल्या देशात ५४ टक्के लोकसंख्येकडे आजही शौचालय नाहीयेत. त्यामुळे मला वाटले की जर मी या विषयावर सच्चेपणाने तसेच विनोद, मनोरंजन आणि चांगल्या लोकांसोबत मिळून एखादा सिनेमा केला तर लोकांना याचे गांभिर्य चांगल्या पद्धतीने समजेल. भारतात साधारणतः १००० मुलं रोज अतिसाराने मरतात. ही आपल्यासाठी एक धोक्याची सुचना आहे,’ असे अक्षय म्हणाला.

अक्षयच्या ‘टॉयलेट एक प्रेमकथाचे दिग्दर्शन नारायण सिंग यांनी केले असून अनुपम खेर यांचीही महत्त्वपूर्ण भूमिका या सिनेमात आहे. याआधी अक्षय आणि अनुपम यांनी ‘स्पेशल २६’ आणि ‘बेबी’ या सिनेमात एकत्र काम केले होते. ‘जॉली एलएलबी २’ हा सिनेमाही यशस्वी ठरला होता. एका मागून एक हिट सिनेमे देणाऱ्या अक्षयचा हा सिनेमाही यशस्वी होतो की नाही हे तर येणारा काळच ठरवेल. येत्या ११ ऑगस्टला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.