आज सकाळीच अभिनेता रणबीर कपूरचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्याची आई आणि अभिनेत्री नीतू कपूर यांनी याबद्दल माहिती दिली होती. रणबीरची गर्लफ्रेंड आलिया भट हिनेही काही धीराच्या गोष्टी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केल्या आहेत.

तिने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक वाक्य पोस्ट केलं आहे. ते वाक्य आहे की, “We grow through what we go through”. म्हणजेच आपण ज्या परिस्थितीमधून जात असतो, त्यातूनच शिकत असतो.

 

रणबीर कपूरचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याची  बातमी देताना त्याची आई आणि अभिनेत्री नीतू कपूर यांनी चाहत्यांचे आभार मानले आहेत तसंच रणबीरच्या तब्येतीबद्दलही सांगितलं आहे. त्यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून रणबीरचा एक फोटो शेअर केला आहे आणि त्याला कॅप्शन दिलं आहे. त्या असं म्हणतात, “तुम्हा सर्वांच्या काळजीबद्दल आणि शुभेच्छांबद्दल धन्यवाद. रणबीरची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्याच्यावर औषधोपचार सुरु आहेत आणि तो बरा होत आहे. सध्या तो गृह विलगीकरणात आहे आणि सर्व प्रकारे काळजी घेत आहे.”

यापूर्वी रणबीरचे काका रणधीर कपूर यांनी रणबीर आजारी असल्याचं सांगितलं होतं. पण तो करोनाबाधित आहे याबद्दल काही सांगितलं नव्हतं.

रणबीर आणि आलिया ‘ब्रम्हास्त्र’ या चित्रपटात प्रथमच एकत्र दिसणार आहेत. आलिया आपल्या सोशल मीडिया अकाऊंट्सवरून या चित्रपटाबद्दलच्या पोस्ट्स कायम शेअर करत असते. हे दोघेही ३ वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. गेल्या वर्षी एका मुलाखतीत रणबीर म्हणाला होता की, जर करोना महामारी आली नसती तर त्यांनी एकमेकांसोबत गेल्या वर्षीच लग्न केलं असतं.