महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या मनावर अधिराज्य करणारे अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते म्हणजे प्रविण विठ्ठल तरडे. प्रवीण तरडेंची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. फेसबुकवरील त्यांच्या एका कमेंटमुळे ते सध्या चर्चेत आले आहेत. त्यांच्या कमेंटमुळे अनेक नेटकऱ्यांनी संताप व्यक्त करत त्यांना ट्रोलही केले आहे.

फेसबुकवर पत्रकार राजू परुळेकर यांनी ‘एकतर तुम्ही देशासोबत आहात किंवा तुम्ही भाजपासोबत आहात, ठरवा’ अशी आशयाची पोस्ट केली होती. त्यांच्या या पोस्टवर प्रवीण तरडे यांनी ‘संपूर्ण देश भाजपासोबत आहे’ अशी कमेंट केली. जेएनयू प्रकरणावरून केंद्र सरकारवर टीका होत असताना तरडे यांनी भाजपासोबत असल्याचं कमेंट करून सरकारला पाठिंबा दिला असल्याचे दिसत आहे. त्यांच्या या कमेंटने सोशल मीडियावर संतापाची लाट पसरली असून अनेक नेटकऱ्यांनी त्यांच्यावर टीकादेखील केली. संपूर्ण देश भाजपासोबत आहे तर मग आंदोलन करणारे परग्रहावरुन आलेत काय? असा सवाल नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

 

सोशल मीडियावर प्रवीण तरडे यांना ट्रोल केल्यामुळे त्यांनी काही वेळातच ही कमेंट डिलीट केली. पण त्यांच्या या कमेंटचे स्क्रीन शॉट मात्र मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. तसेच त्यांच्या फेसबुक पोस्टवर अनेक नेटकरी नकारार्थी कमेंट करत असल्याचे दिसत आहे.