News Flash

तंत्राचे बाहुबळ..

पंधराहून जास्त ‘व्हीएफएक्स’ कंपन्या एकाच महिष्मतीच्या राज्यावर सलग चार वर्षे काम करतायेत.

‘बाहुबली २’ हा दीडशे मिनिटांचा चित्रपट आहे.

पंधराहून जास्त ‘व्हीएफएक्स’ कंपन्या एकाच महिष्मतीच्या राज्यावर सलग चार वर्षे काम करतायेत. दिग्दर्शक एस. राजामौलीच्या डोक्यातील महिष्मती आणि त्याचा राजा अमरेंद्र बाहुबली यांची कथा रंगवायची तर त्याचं डोळ्यात भरणारं साम्राज्यही उभं राहायला हवं. चित्रात दिसणारी भव्यदिव्य महिष्मती प्रत्यक्षात पडद्यावर जिवंत होण्याआधी त्याची प्रतिकृती बनवणं हेही मोठं आव्हान.. अशा कितीतरी गोष्टी बनवायला कलादिग्दर्शक साबु सिरिल यांच्या हाताखाली दोन हजार सुतार आणि अनेक तंत्रज्ञ काम करत होते. लॉस एंजेलिस ते हैदराबाद या परिघात न जाणो किती छोटे-मोठे ‘व्हीएफएक्स’ तंत्रज्ञ ‘बाहुबली’ची महिष्मती संगणकावर जिवंत करण्यासाठी खपत होते. त्याचा परिणाम दिसला रुपेरी पडद्यावर २०१५ला ‘बाहुबली : द बिगिनिंग’ हा चित्रपट झळकला तेव्हा.. देशी पौराणिक कथा आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्हीएफएक्स तंत्रज्ञान यांच्या जोरावर भारतीय चित्रपटाच्या इतिहासात मैलाचा दगड ठरलेल्या ‘बाहुबली’ने साडेसहाशे कोटी रुपयांची कमाई केली. मात्र ही कमाई एवढेच या चित्रपटाचे साध्य नाही. या शुक्रवारी ‘बाहुबली : द क न्क्लुजन’ हा दुसरा बहुप्रतीक्षित भाग प्रदर्शित होतो आहे. ‘बिगिनिंग ते कन्क्लुजन’ या चित्रपटाच्या प्रवासादरम्यान एकूणच ‘बाहुबली’सारख्या भव्य चित्रपटनिर्मितीबरोबरच भारतीय ‘व्हीएफएक्स’ उद्योगाचा अडकलेला श्वासही मोकळा झाला आहे..

‘व्हीएफएक्स’ तंत्रज्ञान हे आजच्या एकूणएक चित्रपटाचा जीव आहे. त्यासाठी ‘बाहुबली’सारखा पौराणिक कथा असलेला चित्रपटच असायला हवा याची गरज उरलेली नाही. ‘व्हीएफएक्स’ तंत्रज्ञान हे आज चित्रपटापुरतं मर्यादित राहिलेलं नाही. तर टेलीव्हिजनवरही त्याने आपला विस्तार वेगाने केला आहे. अनेक पौराणिक, ऐतिहासिक, साय-फाय विषयांवरच्या मालिकांचे जाळे या ‘व्हीएफएक्स’च्या मदतीने टेलीव्हिजनभर पसरले आहे. ‘बाहुबली : द बिगिनिंग’ हा एका अर्थाने या उद्योगाचीही बिगिनिंग ठरला हा योगायोग खचित नव्हे.. मुळात, दिग्दर्शक राजामौली यांनी ‘बाहुबली’च्या निर्मितीचं स्वप्न पाहिलं तेव्हा त्यांच्या गाठीशी आधीच दोन चित्रपटांचा अनुभव होता. ‘मागधीरा’ आणि ‘एगा’ हे दोन चित्रपट राजामौली यांनी दिग्दर्शित केले होते. आणि हे दोन्ही चित्रपट ‘व्हीएफएक्स’वरच उभे राहिले होते. ‘एगा’ जो हिंदीत नंतर ‘मख्खी’ या नावाने प्रदर्शित झाला, त्या चित्रपटाला स्पेशल इफेक्टसाठी राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. मात्र हे सगळे झाले तरी ‘व्हीएफएक्स’चे विश्व तुलनेने मर्यादितच राहिले होते. हॉलीवूड चित्रपटांसाठीची व्हीएफएक्स कामे आणि बॉलीवूडच्या तुरळक अ‍ॅक्शनपटांचे सीजी (कॉम्प्युटर ग्राफिक्स) इथेच अडकून पडलेल्या व्हीएफएक्स उद्योगाला ‘बाहुबली’च्या यशाने मोकळा श्वास दिला. त्यामुळेच ‘बाहुबली २’चे यशही या क्षेत्रासाठी तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे. ‘बाहुबली’च्या व्हीएफएक्सचे काम प्रामुख्याने केले आहे ते ‘मकुटा’ या ‘व्हीएफएक्स’ कंपनीने.. याच कंपनीने राजामौलींच्या आधीच्या दोन्ही चित्रपटांचे काम केले होते. त्यामुळे राजामौलींच्या डोक्यातील ‘बाहुबली’ची कथा ऐकल्यानंतर एक भव्यदिव्य चित्रपट तयार होणार आहे, याची कल्पना ‘मकुटा’चे कर्तेधर्ते पेटे ड्रेपर यांच्यासह चित्रपटाच्या निर्मात्यांनाही आली होती. मात्र हा चित्रपट किती भव्यदिव्य ठरणार याची प्रचीती सगळ्यांना चित्रपटावर काम सुरू झाल्यानंतरच आली.

‘बाहुबली २’ हा दीडशे मिनिटांचा चित्रपट आहे. ज्यातील शंभर मिनिटांचे चित्रीकरण हे के वळ आणि केवळ ‘व्हीएफएक्स’चे काम आहे, असे ड्रेपर यांनी म्हटले आहे. किंबहुना, ‘बाहुबली २’चे बरेचसे चित्रीकरणही पहिल्याच चित्रपटाच्या वेळी झाले होते. तरीही २०१५ मध्ये पहिला चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर दुसरा चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी बरोबर दोन वर्षांचा कालावधी राजामौली यांनी घेतला. या दोन वर्षांमध्ये व्हीएफएक्स आणि चित्रपटाच्या पोस्ट प्रॉडक्शनवरच जास्त काम करण्यात आले आहे. पहिल्या चित्रपटापेक्षा या भागात अमरेंद्र बाहुबलीचे महिष्मती राज्य अधिक भव्य आणि देखणेपणाने उभे राहणार आहे. चित्रपटातील युद्धाचे प्रसंग पहिल्यापेक्षा अधिक चांगल्या रीतीने, युद्धातील डावपेच-रणनीती दाखवणारे आहेत. मुळातच, चित्रपटाच्या व्हीएफएक्सची मुख्य जबाबदारी मकुटाने सांभाळली असली तरी अनेक छोटय़ा-मोठय़ा गोष्टी वेगवेगळ्या व्हीएफएक्स कंपन्यांकडून करून घेणं आणि ते काम एकत्रित झाल्यानंतर त्यात एकच वातावरण दिसणं हे मोठं आव्हान होतं. मात्र हे आव्हान राजामौली यांच्या टीमने लीलया पेललं आहे. ‘कटप्पाने बाहुबलीला का मारलं?’, या एका प्रश्नाभोवती दोन चित्रपट खेळवणं ही या कथालेखकाची मातब्बरी आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर कुठेही बाहेर पडू नये यासाठीही व्हीएफएक्सचं कामही कौशल्याने करून घेणं ही त्यांची गरज होती. खरंतर, पहिला चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हाच ‘मकुटा’ची ओळख मोठी झाली, असं तिथल्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. ‘बाहुबली : द बिगिनिंग’ प्रदर्शित झाल्यानंतर गेली कित्येक वर्षे हॉलीवूडची कामं     करूनही जी ओळख मिळाली नव्हती त्यापेक्षा कितीतरी पटीने मोठी ओळख, लौकिक या चित्रपटाने जगभरात मिळवून दिला. भारतातही केवळ दक्षिणेपुरते मर्यादित न राहता उत्तरेकडेही या कंपनीला ओळख मिळाल्याचे तिथली सूत्रे सांगतात. मात्र व्हीएफएक्स क्षेत्राचं हे यश या कंपनीपुरतं वाढलेलं नाही. तर त्याचा परिणाम एकूणच बॉलीवूडवर झाला असल्याचे प्रसिद्ध व्हीएफएक्स सुपरवायझर प्रसाद सुतार यांनी सांगितलं.

अगदी आताच्याच घटनांवर दृष्टिक्षेप टाकला तर अजय देवगण निर्मित, दिग्दर्शित ‘शिवाय’ या चित्रपटाला स्पेशल इफेक्टसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. ‘दंगल’, ‘पीके’ अशा अनेक चित्रपटांमधून व्हीएफएक्सचा वापर वाढला. ‘राबता’ या दिनेश विजन दिग्दर्शित आगामी चित्रपटातही दोन काळामधली एपिक प्रेमकथा व्हीएफएक्सच्या मदतीने रंगवण्यात आली आहे. ज्यात राजकुमार राव याने ३२४ वर्षांच्या म्हाताऱ्याची भूमिका केली आहे. येत्या काळात व्हीएफएक्सचा वापर वेगवेगळ्या पद्धतीने करत अगदी नव्या धाटणीचे असे हिंदी चित्रपट पाहायला मिळतील, असे सूतोवाच सुतार यांनी केले. याचं श्रेय हे निर्विवादपणे ‘बाहुबली’ चित्रपट आणि राजामौलीसारख्या द्रष्टय़ा दिग्दर्शकाचं असल्याचं त्यांनी सांगितलं. राजामौली यांनी ‘बाहुबली’ बनवायचं स्वप्न पाहिलं नसतं आणि ते प्रत्यक्षात आणलं नसतं तर गेली कित्येक वर्षे या क्षेत्राची आपल्याकडे जी कोंडी झाली आहे ती सुटली नसती, असं ते म्हणतात. ‘बाहुबली’चं यश पाहिल्यानंतर अनेक निर्माते-दिग्दर्शक व्हीएफएक्स वापरून वेगळ्या कथांवरचे चित्रपट बनवण्याचा विचार करू लागले आहेत. व्हीएफएक्स तंत्रज्ञांना विश्वासात घेऊन अशाप्रकारचे वेगळे प्रयोग करण्याची मानसिकता आता निर्माता-दिग्दर्शकांमध्ये तयार झाली असल्याने इथेच मोठे काम या क्षेत्रातील लोकांना उपलब्ध होईल. ‘शिवाय’चंच उदाहरण घ्यायचं झालं तर हा चित्रपट समकालीन विषयावरचा आहे. इथे कुठल्याही प्रकारे पौराणिक कथा, संदर्भ घेण्यात आलेला नाही. तरीही व्हीएफएक्स तंत्राचा उत्तम वापर करून एक समकालीन चित्रपट विषयही चांगल्या प्रकारे हाताळता येऊ शकतो हे आम्ही दाखवू शकलो. आणि आमच्या या प्रयत्नांना राष्ट्रीय पुरस्काराच्या रूपाने दादही मिळाली. ‘बाहुबली १’ ते ‘बाहुबली २’ या दरम्यान व्हीएफएक्स क्षेत्रात चांगल्या घडामोडी झाल्यात. त्यामुळे ‘बाहुबली : द कन्क्लुजन’ हा चित्रपट यशस्वी ठरला तर त्याच्या आसपास येऊ घातलेल्या चित्रपटांनाही प्रेरणा मिळेल. कारण व्हीएफएक्सच्या तंत्रज्ञानात फारसा बदल होणार नाही. बदल हा कथाकथनाच्या शैलीत आहे. ‘बाहुबली’ची कथा व्हीएफएक्सचा वापर करत ज्या पद्धतीने राजामौली यांनी सादर केली त्याचा लोकांवर प्रभाव पडला आहे. येत्या काळात या तंत्राचा वापर हुकमी पद्धतीने करत आपली चित्रकथा अधिकाधिक प्रभावी करण्याचं आव्हान चित्रपटकर्मीसमोर असेल. आणि त्यादृष्टीने येत्या शुक्रवारी प्रदर्शित होणाऱ्या ‘बाहुबली’चं कन्क्लुजनही महत्त्वाचं ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 23, 2017 2:51 am

Web Title: almost every possible technology use in baahubali
Next Stories
1 डोंबिवलीचा ‘बाहुबली’
2 ‘मला काहीतरी वेगळं सांगायला आवडतं’
3 आजोबांच्या धमाल गोष्टी
Just Now!
X