१९७० च्या दशकाच्या सुरुवातीला भारतीय चित्रपटातील ‘अॅग्री यंग मॅन’ अशी ख्याती मिळविणारे अभिनेते म्हणजे अमिताभ बच्चन. अमिताभ यांनी चार दशकांहून अधिक मोठ्या कारकीर्दीत १८० हून अधिक चित्रपटांत भूमिका केल्या. अमिताभ हे भारतीय चित्रपटाच्या इतिहासातील सर्वात महान आणि प्रभावशाली अभिनेत्यांपैकी एक आहेत. तसेच अभिनेते कादर खान देखील कॉमेडी भूमिकांसाठी नेहमी चर्चेत असायचे. बिग बी आणि कादर खान यांच्यामध्ये चांगली मैत्री होती. पण राजकारणामुळे त्यांच्या मैत्रीमध्ये फूट पडल्याचे म्हटले जाते.

कादर खान यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये त्यांनी करिअरमधील संघर्ष आणि अमिताभ बच्चन यांच्यासोबतची मैत्री अशा अनेक गोष्टी सांगितल्या होत्या. ‘मी अमिताभ बच्चनला अमित म्हणून आवाज द्यायचो. एक निर्माता येऊन मला विचारत होता तुम्ही सरांना भेटलात का? त्यावर मी विचारले कोणते सर? निर्मात्याने अमिताभकडे इशारा करुन ते काय तिथे उभे आहेत असे म्हटले. मी त्याला म्हटलं तो अमित आहे. सर्वजण अमिताभला सर म्हणून आवज देत होते पण माझ्या तोंडून सर कधीच निघाले नाही. आपल्या भावाला किंवा मित्राला आपण दुसऱ्या कोणत्या नावाने आवाज देऊ शकत नाही का? पण याच कारणामुळे मला खुदा गवाह चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला’ असे कादर खान म्हणाले.

दुसऱ्या एका मुलाखतीमध्ये कादर खान यांनी जेव्हा अमिताभ यांनी राजकारणात पाऊल ठेवले तेव्हा त्यांच्या नात्यात खूप बदल झाल्याचे म्हटले. त्यानंतर अमिताभ बच्चन खासदार झाले आणि सर्व काही बदललं असे कादर खान म्हणाले होते. राजकारणामुळे अमिताभ आणि कादर खान यांच्या मैत्रिमध्ये फूट पडल्याचे त्यावेळी म्हटले जात होते.

अमिताभ बच्चन आणि कादर खान यांच्या मैत्रीविषयी त्यांच्या कुटुंबीयांना देखील माहिती होते. कादर खान यांच्या निधनानंतर प्रसार माध्यामांशी संवाद साधताना त्यांचा मुलगा सरफराजने देखील एकदा अमिताभ यांचा उल्लेख केला होता. कादर खान आणि अमिताभ यांच्यामध्ये चांगले मैत्रीचे नाते होते असे म्हटले होते. कादर खान यांनी अमिताभ यांच्या ‘शराबी’, ‘लावारिस’, ‘अमर अकबर एंथोनी’, ‘अग्निपथ’ अशा सुपरहिट चित्रपटांची स्क्रिप्ट लिहीली होती.