ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर गैरवर्तन केल्याचा खळबळजनक आरोप अभिनेत्री तनुश्री दत्ताने केला आहे. त्यामुळे सध्या कलाविश्वामध्ये या विषयी जोरदार चर्चा सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र बॉलिवूडचे महानायक अर्थात अमिताभ बच्चन यांनी याविषयी बोलणं टाळलं. त्यामुळे त्यांना सोशल मीडियावर ट्रोल व्हावं लागलं आहे.

मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान आणि अमिताभ बच्चन यांच्या बहुचर्चित ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचचा कार्यक्रम नुकताच पार पडला. यावेळी त्यांना तनुश्रीने केलेल्या आरोपांविषयी काही प्रश्न विचारण्यात आले होते. मात्र ‘माझं नाव तनुश्री दत्ता किंवा नाना पाटेकर नाही, मग मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर कसं देऊ शकतो?,’ असा प्रतिप्रश्नच बिग बींनी प्रसारमाध्यमांना केला. त्यांच्या या उत्तरानंतर त्यांना सोशल मीडियावर ट्रोल व्हावं लागलं आहे.

‘अमिताभ जी तुम्ही ‘बेटी बचाओ,बेटी पढाओ’ चे ब्रॅण्ड अॅम्बेसिडर आहात मात्र तरीदेखील तनुश्रीच्या या आरोपांवर कोणतीही प्रतिक्रिया देत नाही. तुमच्याकडून हे अपेक्षित नव्हतं’, असं एका ट्रोलकऱ्याने म्हटलं आहे. तर ‘जेव्हा एखादी मुलगी नाही म्हणते, तेव्हा तिच्या नाहीचा अर्थ हा नाहीच असतो’, असा संवाद अमिताभ यांनी ‘पिंक’ चित्रपटामध्ये म्हटला होता. या संवादाची आठवणही त्यांना काही नेटकऱ्यांनी करुन दिली आहे.

दरम्यान, २००८ साली ‘ हॉर्न ओके प्लीज’ या चित्रपटादरम्यान नानांनी माझ्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असभ्य वर्तन केलं असा आरोप तनुश्रीनं एका मुलाखतीत केला. नाना पाटेकर यांनी माझ्याशी असभ्य वर्तन केलं हे अनेकांनी पाहिलं पण कोणीही माझ्यामागे उभं राहिलं नाही, सगळ्यांनीच यावेळी केवळ बघ्याची भूमिका निभावली असंही ती म्हणाली होती. तनुश्रीच्या या वक्तव्यानंतर कलाविश्वामध्ये सध्या ही एकच चर्चा सुरु असून अनेक कलाकारांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. मात्र अमिताभ यांनी प्रतिक्रिया देण्याचं टाळल्यामुळे त्यांना ट्रोल होण्याची वेळ आल्याचं दिसून येत आहे.