बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन कलाविश्वाव्यतिरिक्त सामाजिक कार्यामध्येही तितकेच सक्रीय असतात. त्यामुळे त्यांना शक्य होईल त्यानुसार ते समाजकार्यामध्ये हातभार लावत असतात. बिग बींनी आतापर्यंत शहिद जवानांच्या कुटुंबीयांना, पूरग्रस्तांना आणि शेतकऱ्यांना आर्थिक मदत केल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यानंतर आता त्यांनी पुन्हा एकदा त्यांच्या मदतीचा हात पुढे केला आहे. यावेळी अमिताभ यांनी आसाममधील पूरग्रस्तांना आर्थिक मदत केली आहे.

आसाम राज्यात सध्या पुराच्या तडाख्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. ब्रह्मपुत्रा नदीला आलेल्या पुरामुळे येथील निम्म्याहून अधिक जिल्हे पाण्याखाली गेल्याने आसाममधील पूरस्थिती अधिकच गंभीर झाली आहे. इतकंच नाही तर या पुरात काही जण मरण पावले असून ४.२३ लाख लोक बाधित झाले आहेत. त्यामुळे येथील पूरग्रस्तांना प्रत्येक राज्य, येथील व्यक्ती शक्य तेवढी मदत करत आहेत.त्यातच अमिताभ बच्चन यांनीदेखील येथील पूरग्रस्तांना ५१ लाख रुपयांची मदत केली आहे. अमिताभ यांनी दोन राज्यांसाठी ही मदत केली आहे.

अमिताभ यांनी आसामच्या मुख्यमंत्री मदतनिधीच्या माध्यमातून ५१ लाख रुपयांची मदत केली आहे. विशेष म्हणजे ही माहिती आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी दिली आहे. अमिताभ यांच्याव्यतिरिक्त अक्षय कुमारनेदेखील २ कोटी रुपयांची आर्थिक मदत केली आहे.

दरम्यान, पुरामुळे आसाम-बिहारमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. धेमाजी, लखीमपूर, विश्वनाथ, नलबारी, चिरांग, गोलाघाट, मजुली, जोरहाट, दिब्रुगड, नागाव, मोरीगाव, कोक्राझर, बोंगाईगाव, बाकसा, सोनितपूर, दरांग आणि बारपेटा हे जिल्हे बाधित झाल्याच्या सांगण्यात येत आहे.