बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना शनिवारी करोनाची लागण झाली. मुंबईतील नानावटी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. बिग बी रुग्णालयात दाखल असले तरी सोशल मीडियावर सक्रिय आहेत. इन्स्टाग्राम, ट्विटरवर ते रोज पोस्ट लिहित आहेत. नुकताच त्यांनी एक फोटो पोस्ट करत विठोबा-रखुमाईला साकडं घातलं आहे. ‘ईश्वर के चरणों में समर्पित’, असं लिहित त्यांनी विठ्ठल-रखुमाईचा फोटो पोस्ट केला आहे.
११ जुलै रोजी अमिताभ बच्चन व त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन यांना करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली. त्यानंतर मुंबईतील नानावटी रुग्णालयांना त्यांना दाखल करण्यात आलं. नानावटी रुग्णालयात दोघांवर उपचार सुरू असून पुढील सात दिवस तरी त्यांना रुग्णालयातच राहावं लागणार आहे. “दोघांची प्रकृती स्थिर असून उपचारांना चांगला प्रतिसाद देत आहेत. त्यांना किमान आणखी सात दिवस तरी रुग्णालयात राहावं लागणार आहे”, अशी माहिती रुग्णालयाने दिली होती. तर ऐश्वर्या राय बच्चन व आठ वर्षीय आराध्या यांना घरातच क्वारंटाइन करण्यात आलं आहे.
बच्चन कुटुंबातील चौघांना करोनाची बाधा झाल्यामुळे मुंबई महापालिकेने रविवारी ‘जलसा’, ‘प्रतीक्षा’, ‘जनक’ आणि ‘वत्सा’ हे त्यांचे चारही बंगले प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करून टाळेबंद केले. चारही बंगले र्निजतुक करण्यात आले असून पालिकेच्या वैद्यकीय पथकांनी चारही बंगल्यांतील सुमारे ३० कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली. त्याचप्रमाणे गेल्या १४ दिवसांमध्ये त्यांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध पालिकेने सुरू केला आहे. दरम्यान, जया बच्चन, श्वेता नंदा, नव्या नवेली, अगस्त नंदा यांची चाचणी नकारात्मक (निगेटिव्ह) आल्याचे समजते.