अभिनेता अमिताभ बच्चन सध्या दिल्लीमध्ये आर बाल्की यांच्या ‘पॅडमॅन’ सिनेमाच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहेत. अक्षय कुमारची मुख्य भूमिका असलेल्या या सिनेमात शहेनशहा एका पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहेत. पण त्यांची व्यक्तिरेखा नेमकी काय आहे हे मात्र अजून गुलदसत्यात आहे. ‘मी उद्या (शनिवारी) अक्षय कुमारसोबत आर बाल्कीच्या सिनेमात अक्षय कुमारसोबत काम करणार आहे,’ असे बच्चन यांनी शुक्रवारी रात्री त्यांच्या ब्लॉगमध्ये लिहिले.

बाल्की आणि अमिताभ यांनी याआधीही ‘चीनी कम’, ‘पा’, ‘शमिताभ’ या सिनेमांत एकत्र काम केले आहे. तसंच बाल्कीच्या इतर सिनेमांत बिग बींनी पाहुण्या कलाकाराची भूमिकाही साकारली आहे. बाल्कींचा कोणताही सिनेमा असो त्यात बच्चन यांची झलक तर पाहायला मिळतेच. त्यामुळेच अमिताभ हे बाल्कींचे ‘लकी चार्म’ आहेत असंच म्हणावं लागेल. करण जोहरचीही कधी एकेकाळी काजोल ‘लकी चार्म’ होती असं म्हणावं लागेल. कारण करणच्या प्रत्येक सिनेमात ती हमखास दिसायची. पण वेळ बदलली की मैत्रीही बदलते त्याप्रमाणे करणच्या आयुष्यातली ती मैत्रीही बदलली आणि तो ‘लकी चार्म’ही. सध्या करणच्या प्रत्येक सिनेमात दिसणारी एक व्यक्ती म्हणजे आलिया भट्ट.

अरुणाचलम् मुरुगानंदम् यांच्या आयुष्यावर ‘पॅडमॅन’ हा सिनेमा बेतलेला आहे. मासिक पाळीकडे आपल्याकडे आजही गुप्ततेचा विषय म्हणून बघितले जाते. एवढंच काय तर काही वर्षांपूर्वी मासिक पाळीत घ्यावी लागणारी स्वच्छता हीदेखील दुर्लक्षिलेलीच गोष्ट होती. पण, अरुणाचलम् यांच्या ते लक्षात आले आणि त्यांनी स्त्रियांसाठी विशेषतः खेड्यातल्या स्त्रियांसाठी स्वस्त आणि उपयोगी सॅनिटरी नॅपकिन्स तयार केले. यातून त्यांनी अनेक स्त्रियांना रोजगारही मिळवून दिला, यावरच ‘पॅडमॅन’ चित्रपट आधारित आहे. ‘पॅडमॅन’ची म्हणजेच अरुणाचलम् मुरुगानंदम् यांची मुख्य भूमिका अक्षय साकारत आहे.

काही दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन यांनी जनजागृती करणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. लैंगिक शोषण झालेल्या महिलेसोबत समाज आणि तिचे स्वतःचे कुटुंबिय कसा व्यवहार करतात याबद्दल अमिताभ या व्हिडिओत भाष्य करताना दिसतात. लैगिंक शोषण झालेल्या मुलीची यात कोणतीच चूक नसून तिला जास्तीत जास्त समजून घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.