|| नीलेश अडसूळ

मराठी मालिकांच्या दुनियेत पौराणिक आणि ऐतिहासिक मालिकांची चलती प्रेक्षकांना काही नवीन नाही. दर काही वर्षांनी अशा मालिका विविध वाहिन्यांवर येत असतात. आणि मराठी प्रेक्षकवर्ग हा इतिहासाशी भावनिकतेने जोडलेला असल्याने अशा मालिका मनामनात घर करून राहतात. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, जिजाऊ  अशा धाडसी आणि इतिहास घडवणाऱ्या व्यक्तींबद्दल आपल्याला कायमच अभिमान वाटतो. काही वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवनपट उलगडणारी मालिका स्टार प्रवाह या वाहिनीवर प्रदर्शित झाली आणि शिवाजी महाराजांचे चरित्र दृक्श्राव्य माध्यमातून घराघरांत पोहचले. संभाजी नाटकातून प्रेक्षकांच्या हृदयात ‘संभाजी’ म्हणून स्थान मिळवणारे डॉ. अमोल कोल्हे या मालिकेत शिवाजी महाराजांच्या भूमिकेतून समोर आले आणि अमोल कोल्हे म्हणजेच शिवाजी महाराज असे समीकरण तयार झाले. पुढे अशाच धाटणीची ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ ही मालिका ‘झी मराठी’ वाहिनीवर आली. आणि अवघा महाराष्ट्र पुन्हा एकदा इतिहासमय होऊन शिवकालात गेला. आता मात्र या मालिकेचा शेवट कसा होणार, अशी उत्सुकता लागलेली असतानाच ‘स्वराज्य जननी जिजामाता’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत असल्याची चर्चा सध्या जोरदार सुरू आहे. अमोल कोल्हेंनीच या मालिकेची निर्मिती केली असून १९ ऑगस्टला ही मालिका ‘सोनी मराठी’ वाहिनीवर प्रदर्शित होणार आहे.

या मालिकेविषयी सांगताना खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी स्वराज्याशी निगडित काही संकल्पना मांडून विश्लेषण केले. ते सांगतात, ‘स्वराज्य संकल्पक’ म्हणजे शहाजी महाराज, ‘स्वराज्य संस्थापक’ म्हणजे शिवाजी महाराज, ‘स्वराज्य रक्षक’ म्हणजे संभाजी महाराज आणि या स्वराज्याला जन्म देणाऱ्या म्हणजे ‘स्वराज्य जननी’ जिजामाता. या संकल्पांनामध्येच मालिकेचे आशयसूत्र सामावलेले आहे. स्वराज्याचे सर्वेसर्वा असणारे शहाजीराजे, शिवाजी महाराज, संभाजी महाराज या तीन महान व्यक्तिमत्त्वांना जोडणारा एकमेव सामाईक धागा आहे तो म्हणजे जिजाऊ. आजवर ज्या नाटक, चित्रपट आणि मालिकांमधून जिजाऊ  समोर आल्या त्या केवळ पत्नी, आई आणि आजीच्या भूमिकेत लोकांनी पाहिल्या. परंतु जिजाऊ  काय आणि कोण होत्या याबाबत स्वतंत्र चरित्रपट कधीही आला नाही. तो साकारण्याची खूप वर्षांची इच्छा होती. आणि ‘स्वराज्य जननी जिजामाता’च्या निमित्ताने आज ती पूर्ण होत आहे. एक स्त्री म्हणून त्यांचा जीवनप्रवास  सर्वाना भुरळ घालणारा आहे तितकाच तो प्रेरणादायी आहे. म्हणून संपूर्ण जगापर्यंत तो पोहचावा, या उद्देशाने या मालिकेची निर्मिती के ल्याचे त्यांनी सांगतले.

ऐतिहासिक मालिका साकारताना जबाबदारी तर असतेच पण त्याहून ते आव्हानात्मक असते. असे विषय मांडताना इतिहासाचा अभ्यास, त्या अनुषंगाने अभ्यासकांची निवड, मालिकेच्या सादरीक रणाची पद्धत अशा सर्व बाजूने विचार करावा लागतो, असे कोल्हे सांगतात. अशा मालिका करताना मनात कोणताही किंतु न ठेवता शुद्ध हेतूने त्यात योगदान देणे हे अभ्यासाहून अधिक महत्त्वाचे आहे. कारण अशा व्यक्तिरेखा या भव्यदिव्य असल्याने त्या आपल्याला नकळत अनेक जीवनमूल्ये देऊन जातात. हा अभ्यास केवळ एका दिवसाचा नसून त्यासाठी भूतकाळातील संदर्भ, विविध पुस्तकं, काही महत्त्वाचे दस्तावेज पडताळून पाहावे लागतात. एखाद्या घटनेमागचा हेतू, भावना आणि भूमिका समजून घ्यावी लागते. आणि याची जाणीव ठेऊनच सर्व कलाकार काम करत असतात. किंबहुना त्याशिवाय अशा भूमिकांना न्याय देणे तितके सोपे नसल्याचे त्यांनी सांगितले.

या मालिकेत जिजाऊ  माँसाहेबांची भूमिका अभिनय क्षेत्रात नुकत्याच पदार्पण केलेल्या अमृता पवार या अभिनेत्रीने साकारली आहे. अमृताच्या निवडीविषयी कोल्हे  सांगतात, जिजामातांची भूमिका साकारताना केवळ अभिनय किंवा चेहरा महत्त्वाचा नव्हता तर त्या व्यक्तिरेखेविषयी मनात आदर आणि जाणीव असणारी अभिनेत्री हवी होती. कारण ती व्यक्तिरेखा समजून घेणे किंवा ती साकारताना येणाऱ्या व्यवधानांवर मात करून पुढे जाणेही तितकेच महत्त्वाचे होते. या भूमिकेसाठी अमृताने चित्रपट देखील नाकारला. आम्हाला अपेक्षित असणारी तळमळ अमृतामध्ये दिसली आणि आम्हाला जिजाऊ  सापडल्या, असे अमोल कोल्हे सांगतात.

‘शंभूराजे’ या नाटकाने आपल्या वैयक्तिक जीवनात अनेक बदल घडवून आणले, असे ते सांगतात. संभाजी महाराजांविषयी लोकांच्या मनात असणारे गैरसमज आणि चुकीच्या प्रतिमा पाहून मला प्रचंड त्रास झाला. शंभूराजांच्या भूमिकेशी एकरूप होऊन मी ते नाटक केले होते. शिवाजी महाराजांवर मालिका करताना शिवाजी महाराजांच्या भूमिकेसाठी मला विचारले गेले तेव्हाही शंभूराजांवर मालिका करू या, असाच माझा आग्रह होता. परंतु संभाजी महाराजांविषयी अनेक समज-गैरसमज असल्याने तो विषय अनेक र्वष तसाच राहिला. तब्बल आठ वर्षे यासाठी मी प्रयत्न करत होतो. अखेर ‘झी मराठी’ने विश्वास दाखवला आणि ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ ही मालिका घराघरांत पोहचली. आज लोकांना मालिकेच्या माध्यमातून शंभूराजे कळले आणि माझा हेतू सफल झाला. वाहिन्यांनी अशा मालिकांसाठी व्यासपीठ देणे अतिशय महत्त्वाचे आहे. तो विश्वास ‘झी मराठी’ आणि आता ‘सोनी मराठी’ या वाहिन्यांनी दाखवला त्याबद्दल डॉ.अमोल कोल्हे वाहिन्यांचे आभार मानतात.

अभिनय आणि राजकारण याविषयी अमोल कोल्हे सांगतात, ‘‘अभिनयाची आवड होतीच, परंतु एकाच आयुष्यात अनेक व्यक्तिरेखा साकारण्याची संधी केवळ अभिनय क्षेत्रात असते. आणि त्याविषयी मला कायम आकर्षण होते. माझ्या अभिनयाच्या आवडीला घरच्यांनी कधी विरोध केला नाही, परंतु कला क्षेत्रात तितकीशी स्थिरता नसल्याने अभिनयासोबतच त्यांनी शिक्षणाचीही सक्ती केली. आणि म्हणूनच आज माझ्या नावापुढे डॉक्टर ही उपाधी आहे. परंतु अभिनयाकडे वळल्यावर मात्र मी माझे काम प्रामाणिकपणे करत गेलो, नवनवीन कामे मिळत गेली आणि आज स्वत:ची ओळख निर्माण झाली, असे सांगतानाच राजकारण म्हणाल तर पश्चिम महाराष्ट्रातल्या नाक्यानाक्यांवर राजकारण रंगत असते. त्यामुळे ती आवड प्रत्येकात असते. परंतु अभिनय क्षेत्रात साकारलेल्या भूमिकांमुळे ती ओढ अधिकच वाढत गेली, असे त्यांनी सांगितले आणि ज्या लोकशाहीविषयी आपण आज गप्पा करतो ती संकल्पना सोळाव्या शतकात महाराजांनी ‘रयतेचं राज्य’ म्हणून अमलात आणली होती. मग आता त्याच मार्गावर पाऊल टाकत लोकांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी राजकारणाचा मार्ग स्वीकारला आहे, असेही ते म्हणतात.

समाजकारणावरच लक्ष केंद्रित..

सध्याचा व्याप पाहता मालिकांमधून सुरू असलेल्या अभिनयाला तूर्तास अल्पविराम दिला आहे. परंतु नाटक, सिनेमा वेळ काढून करण्याचा प्रयत्न असेल. मतदारसंघ ही प्राथमिक जबाबदारी असल्याने सर्वाधिक लक्ष समाजकारणात असेल. ‘स्वराज्य रक्षक जिजामाता’च्या निमित्ताने निर्माता म्हणून काम करतो आहे. पुढे असे छान विषय मांडण्याची संधी मिळाली तर काम सुरूच राहील. ज्याप्रमाणे हरएक वर्गातील व्यक्तीने ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ मालिकेवर प्रेम केले त्याचप्रमाणे जिजाऊं च्या मालिकेलाही प्रेक्षक भरभरून प्रतिसाद देतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. प्रेक्षकांच्या मनाला भावेल अशीच रेखीव निर्मिती केली आहे. त्यामुळे पडद्याआड दडलेले हे इतिहासाचे पान प्रेक्षकांना आवडेल अशी खात्री डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केली.