Bigg Boss Marathi : मराठी कलाविश्वात पहिल्यांदाच ‘बिग बॉस मराठी’ या रिअॅलिटी शोने शिरकाव केला आणि हा शो तुफान गाजला. बिग बॉस हा कार्यक्रम वादग्रस्त कार्यक्रमांच्या यादीत अग्रस्थानी असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे या कार्यक्रमाचं स्वरुप, त्यात सहभागी होणारे स्पर्धक आणि त्या स्पर्धकांमध्ये जिंकण्यासाठी लागलेली चढाओढ हे पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता पाहायला मिळाली.

हिंदी बिग बॉसच्या धर्तीवर मराठी कलाविश्वातही या रिअॅलिटी शोची सुरुवात झाली. त्यामुळे बिग बॉस मराठीमध्ये अनेक कलाकारांची वर्णी लागल्याचं पाहायला मिळालं. इतकंच नाही तर पडद्यावर रोज आदर्श भूमिकेत वावरणारी ही कलाकार मंडळी प्रत्यक्षात कसे वागतात. त्यांचा स्वभाव कसा आहे याचा प्रत्ययही या शोच्या माध्यमातून प्रेक्षकांना आला.

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सध्या स्मिता गोंदकर, आस्ताद काळे, मेघा धाडे, सई लोकूर, पुष्कर जोग, शर्मिष्ठा राऊत हे कलाकार अंतिम फेरीत पोहोचले असून बिग बॉस मराठीचा पहिला विजेता कोण ठरणार याकडे साऱ्याचं लक्ष वेधलं आहे. या फायनलिस्टने अथक प्रयत्न करुन हा टप्पा गाठला असून यापूर्वी अनेक स्पर्धकांनी या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न केला होता. मात्र केवळ त्यांच्या आक्रमक स्वभावामुळे आणि खेळण्याच्या नितीमुळे त्यांना घराबाहेर पडावं लागल्याचं दिसून येत आहे.

वाइल्ड कार्डमधून बिग बॉसच्या घरात एन्ट्री करणारा नंदकिशोर चौघुले या कार्यक्रमामुळे प्रकाशझोतात आला. मात्र आक्रमक स्वभावामुळे त्याच्या या घरात फार काळ निभाव लागला नाही. ‘हुकूमशहा’ या टास्कमध्ये त्याने घरात गाजवलेली हुकूमशाही चर्चेचा विषय ठरली होती आणि त्यामुळे त्याला प्रेक्षकांच्या पसंतीत उतरता आलं नाही.

नंदकिशोरप्रमाणेच आस्तादच्या रागाचं दर्शनही अनेकवेळा घरातल्या सदस्यांनी घेतलं असून अनेक वेळा टास्कच्या दरम्यान आस्तादच्या रागाचा पारा चढल्याचं दिसून आलं होतं. मात्र तरीदेखील आस्ताद अंतिम फेरीपर्यंत पोहोचण्यास यशस्वी झाल्याचं दिसून येत आहे. त्याचप्रमाणे सुशांत शेलारनेदेखील अनेक वेळा टास्क खेळतांना त्याच्या मर्यादा ओलांडून वागल्याचं पाहायला मिळालं होतं. भावनिक असल्याचं सांगणाऱ्या सुशांतने रागाच्याभरामध्ये उषा नाडकर्णी यांनादेखील खडे बोल सुनावले होते.

घरात प्रवेश केल्यानंतर शांत व्यक्ती अशी ओळख निर्माण करणाऱ्या राजेश शृंगारपुरेचं खरं आक्रमक रुप टास्कच्या वेळी प्रत्येकालाच दिसून आलं. घरात खेळण्यात आलेल्या अनेक टास्कमध्ये राजेशने हुकुमशाही केल्याचं दिसून आलं. इतकंच नाही तर त्याने शारीरिक बळाचादेखील वापर केल्याचं पाहायला मिळालं. या स्पर्धकांप्रमाणेच सई लोकूर हिचा आवाजदेखील अनेक वेळा चढला होता. प्रत्येक वेळा टास्कमध्ये किंवा घरात होणाऱ्या वादांमध्ये सईने अनेक वेळा मोठ्या आवाजात घरातल्या सदस्यांशी भांडण केल्याचं दिसून आलं होतं. त्यामुळे एकंदरीतच काय तर या खेळामुळे पडद्यावर गोड, सालस अशा भूमिका साकारणाऱ्या कलाकरांच्या खऱ्या स्वभावाचं दर्शन या निमित्ताने झाल्याचं पाहायला मिळालं.