करोनाचा फटका हिंदी चित्रपट सृष्टीलाही बसल्याचे चित्र दिसत आहे. परदेशामधून भारतात आलेल्या काही कलाकारांनी घरीच विलगीकरणामध्ये (होम क्वारंटाइनमध्ये) राहण्याचा निर्णय घेतला आहे. बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर हे सुद्धा शुक्रवारी अमेरिकेहून भारतात परतले. त्यानंतर त्यांनी लगेच दुसऱ्या दिवशी त्यांचा सख्खा शेजारी असणारा अभिनेता अनिल कपूर याची भेट घेतली. मात्र आता तुम्ही म्हणाल की परदेशातून आले तर लगेच दुसऱ्या दिवशी भेट कशी घेतली. पण तुम्हाला सांगू इच्छितो की या भेटीमध्येही त्यांनी सोशल डिस्टंन्सींगचे नियम पाळले. म्हणजेच अनुपम खेर हे विलगीकरणात असल्याने त्यांनी स्वत:च्या बाल्कनीमधूनच अनिल कपूरची विचारपूस केली. या दोघांनी आपआपल्या बाल्कनीमधून जुन्या स्टाइलने गप्पा मारल्या. यासंदर्भातील ट्विट अनिल कपूरनेच केलं आहे.

अनिल कपूरने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये अनुपम खेर हे त्यांच्या बाल्कनीमध्ये उभे असल्याचे दिसत आहे. या व्हिडिओमध्ये दोघेही गप्पा मारताना दिसून येत आहे. हा व्हिडिओ पोस्ट करताना अनिल कपूरने #AKseesAK म्हणजे अनिल कपूर आणि अनुपम खेरची भेट असा हॅशटॅग वापरला आहे. “शेजाऱ्यांनी गप्पा मारण्याची परंपरा सुरु ठेवली आहे पण सुरक्षित अंतर ठेऊन पारंपारिक पद्धतीने,” असं कॅप्शन अनिलने हा व्हिडिओ पोस्ट करताना दिलं आहे.

“काय मग सर अमेरिकेहून परत कधी आलात? भारतात तुम्हाला कशी वागणूक मिळत आहे?”, असा प्रश्न अनिलने अनुपम यांना विचारला. यावर अनुपम यांनी, “आपण शेजारी राहतो पण आपण भेटू शकत नाही. गेटच्या बाहेर येऊन तुम्ही मला नुसतं हॅलो म्हणत आहात आणि मी बाल्कनीमधून बोलत आहे,” असं उत्तर अनुपम खेर देतात. यावर अनिल कपूरने एकदम मजेशीर उत्तर दिलं आहे. “काय करणार यार सुनिता (अनिल कपूर यांची पत्नी) तुला घरामध्ये येऊ देणायर नाही,” असं उत्तर अनिल कपूरने दिल्यावर त्यावर “जबाबदार नागरिक म्हणून ते गरजेचं आहे,” असं उत्तर अनुपम खेर यांनी दिलं. त्यानंतर अनिल कपूरने ‘तेरे घर के सामने एक घर बनाऊंगा’ हे गाणं गायल्याचंही व्हिडिओत पहायला मिळत आहे.

अनुपम खेर हे शुक्रवारी भारतात परत आले असून आपली करोना चाचणी नकारात्मक आल्याचे त्यांनी पीटीआयशी बोलताना सांगितलं आहे. “मी आत्ताच भारतामध्ये आलो. माझी विमातळावर तपासणी झाली ती नकारात्मक आली असून मला क्लिनचीट देण्यात आली आहे. पण मी स्वत: घरी थांबण्याचा निर्णय घेता असून मी स्वत:ला आयसोलेट केलं आहे. आपण हे केलचं पाहिजे,” असं अनुपम यांनी पीटीआयशी बोलताना सांगितलं. खेर हे न्यूयॉर्क शहरामध्ये मागील अनेक आठवड्यांपासून न्यू अमस्टरडॅम या मालिकेचे चित्रिकरण करत होते. मात्र करोनामुळे हे चित्रकरण पुढे ढकलण्यात आल्याने खेर भारतात परतले आहेत.