28 February 2021

News Flash

लगीनघाई कलाकारांची

वर्षाची सुरुवात अभिनेता वरुण धवन आणि त्याची बालपणीची मैत्रीण नताशा दलाल यांच्या लग्नाने झाली.

|| मानसी जोशी

गेल्या दोन वर्षांपासून अनुष्का शर्मा-विराट कोहली, दीपिका पदुकोण-रणवीर सिंग आणि सोनम कपूर-आनंद आहुजा यांच्यामुळे कलाकारांचे लग्न हा समस्त चाहते आणि प्रसारमाध्यमांसाठी उत्सुकतेचा विषय झाला आहे. यात कलाकारांच्या पाहुण्यांच्या यादीपासून, त्यांचे पोशाख, केशभूषा तसेच वेशभूषा यांची चर्चाही होते. आपल्या आवडत्या कलाकाराचे लग्न पाहून चाहतेही त्याच आलिशान पद्धतीने लग्न करण्याचा आग्रह धरत आहेत. जगभरातील करोनाचे संकट लक्षात घेता अनेक कलाकारांनी परदेशी जाण्याचे रद्द करत साधेपणाने करोनाचे नियम पाळत लग्न करण्यावर भर दिला आहे. हिंदी तसेच मराठी चित्रपटसृष्टीतील झालेल्या कलाकारांच्या विवाह सोहळ्याकडे लक्ष दिल्यास करोनाची काळजी असली तरी उदंड उत्साहाने हे लग्न सोहळे पार पडतायेत हे सहज लक्षात येईल…

या वर्षाची सुरुवात अभिनेता वरुण धवन आणि त्याची बालपणीची मैत्रीण नताशा दलाल यांच्या लग्नाने झाली. करोनामुळे परदेशी जाऊन थाटामाटात लग्न करण्याचा बेत त्यांनी रद्द के ला आणि अलिबागमध्ये सासवणे येथील ‘द मॅन्शन हाऊस’ या रिसॉर्टमध्ये लग्न करण्याचे ठरवले. या वेळी पाहुण्यांच्या राहण्याची व्यवस्था शाहरुख खानच्या अलिबागमधील व्हिलामध्ये करण्यात आली होती. करोनाकाळातील नियमांमुळे या लग्नाला बॉलीवूडचे सगळेच मानकरी हजर राहू शकले नाहीत, तरी वरुणच्या अगदी जवळ असलेली करण जोहर, जान्हवी कपूर, कुणाल कपूर अशा हिंदी चित्रपटसृष्टीतील तारे-तारकांनी हजेरी लावली होती.

मॉडेल आणि अभिनेत्री गौहर खान आणि गायक ईस्माईल दरबार यांचा मुलगा झैन दरबार यांचा निकाहसुद्धा चर्चेचा विषय ठरला. यात गौहर आणि झैनमधील वयाचे अंतर हाही अनेक वेळा चर्चेचा विषय ठरला. गौहरची बहीण निगार खान खास अमेरिकेवरून निकाहसाठी मुंबईत आली होती. गायिका नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंग यांचेही एकदम फिल्मी स्टाइलने लग्न झाले. ‘नेहु दा व्याह’ या गाण्याच्या चित्रीकरणादरम्यान त्या दोघांची ओळख झाली. नंतर मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. नेहानेही आपल्यापेक्षा सात वर्षे वयाने लहान असलेल्या रोहनप्रीतशी केलेले लग्न पाहून चाहत्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. नेहाच्या संगीत सोहळ्यासाठी अनिता डोंगरे यांनी डिझाइन केलेला लेहंगा आणि टिसा स्टुडिओच्या शेरवानीत हे युगुल एकदम खुलून दिसत होते. नवी दिल्लीतील गुरुद्वारेत गेल्या वर्षी त्यांनी पंजाबी पद्धतीने लग्न केले. लग्नाच्या वेळेस नेहाने सब्यासाचीने डिझाइन केलेला लेहंगा परिधान केला होता. ऑक्टोबरमध्ये वाजलेल्या त्यांच्या शहनाईचे सूर अजूनही कलाविश्वाात रेंगाळत आहेत. क्रिकेटपटू युवराज चहल आणि मॉडेल धनश्री वर्मा यांनीही वर्ष सरता सरता चट मंगनी पट ब्याह केले.

लग्न सोहळ्याचा हा धूमधडाका फक्त हिंदी चित्रपटसृष्टीतच नाही तर मराठीतही तितक्याच जोरदारपणे सुरू आहे. या महिन्यात अभिनेत्री अभिज्ञा भावे आणि मेहुल पै, अभिनेता सिद्धार्थ चांदेकरआणि मिताली मयेकर या दोन आवडत्या जोड्या विवाह बंधनात अडकल्या. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून एकमेकांच्या प्रेमात असलेल्या सिद्धार्थ आणि मितालीचा साखरपुडा खरं तर २०१९च्या डिसेंबर महिन्यात झाला होता. त्यानंतर जून महिन्यात लग्न करण्याचा त्यांचा बेत होता. मात्र करोनामुळे लागू झालेल्या टाळेबंदीमुळे त्यांनी २०२१ मध्ये लग्न करण्याचे ठरवले. जास्त चर्चा नको या हेतूने त्यांनी लग्नाची तारीख शेवटपर्यंत गुलदस्त्यात ठेवली होती. सई ताम्हणकर, आरती वडगबाळकर, क्षिती जोग आणि छाया कदम यांच्याकडील या जोडीची केळवणाची छायाचित्रे समाजमाध्यमावर प्रसिद्ध झाली आणि त्यांच्या लग्नाच्या चर्चेला चित्रपटसृष्टीत उधाण आले होते. अखेर जसे हळद, मेंदी आणि ग्रहमक विधी सुरू झाल्यावर त्यांच्या लग्नाची तारीख प्रेक्षकांना समजली. आम्हाला आमच्या लग्नाचा गवगवा करायचा नव्हता. त्यामुळे शेवटपर्यंत तारीख सांगितली नसल्याचे सिद्धार्थने सांगितले. पुण्यातील ढेपेवाडा येथे २४ जानेवारीला ते दोघे विवाहबद्ध झाले. सध्या सिद्धार्थ ‘सांग तू आहेस का’ आणि मिताली ‘लाडाची मी लेक गं’ या मालिकेत प्रमुख भूमिकेत आहेत. काम सांभाळून लग्नाचे नियोजन केले असल्याचे त्याने स्पष्ट केले. यासाठी आम्ही निर्मिती संस्थांना याची कल्पना दिली होती. त्याप्रमाणे जास्तीचे चित्रीकरण करून भाग आधीच तयार करून ठेवले होते. त्यामुळे वैयक्तिक आणि खासगी जीवनाचा समतोल सांभाळणे सोपे गेले, असे त्यांनी सांगितले.

सिद्धार्थनंतर अभिनेत्री अभिज्ञा भावे हिनेही मेहुल पैसोबत सात जन्म एकत्र राहण्याच्या आणाभाका घेतल्या. ‘आम्ही गेल्या वर्षी लग्न करण्याचा विचार करत होतो, मात्र टाळेबंदीमुळे लग्न करण्याचे टाळले. टाळेबंदीच्या शिथिलीकरणानंतर परिस्थिती पूर्ववत झाल्यावर लग्न करण्याचे ठरवले. अनेक प्रसारमाध्यमांनी लग्नाला प्रसिद्धी देण्याविषयी विचारले होते. मात्र माझा नवरा मेहुल आणि कुटुंबीय प्रकाशझोतापासून चार हात दूरच राहणे पसंत करत असल्याने जास्त माध्यम प्रतिनिधींना बोलावण्याचे टाळले. करोनाच्या पाश्र्वाभूमीवर निमंत्रितांची संख्या मर्यादित ठेवली होती. हॉलवर निर्जंतुकीकरण, तापमानाची नोंद, मुखपट्ट्यांचा वापर इत्यादी गोष्टी कटाक्षाने पाळल्याचे अभिज्ञाने सांगतिले. लग्न हा माझ्या आयुष्यातील महत्त्वाचा क्षण असल्याने तो साधा साजरा केला आणि पोशाखासाठी ठरावीक रंगसंगतीचा वापर केला. लग्नाच्या वेळी हिरवा किंवा पिवळा शालू न वापरता गुलाबी रंगाचा वापर केला, असे फॅ शनबद्दल जागरूक असलेल्या अभिज्ञाने सांगितले. तर अभिनेत्रीमानसी नाईकही व्यवसायाने बॉक्सर असलेल्या प्रदीप खरेराशी विवाहबद्ध झाली.

आता यावर्षी आणखी कोणाच्या लग्नाचा धूमधडाका होणार? याचा विचार करताना रणबीर आणि आलियाचे नाव हटकू न समोर येते. करोना नसता तर आम्हीही आत्तापर्यंत विवाहबद्ध झालो असतो, अशी कबुली रणबीरने मध्यंतरी दिली होती. त्यामुळे यावर्षीही ‘वाजवा रे वाजवा’ची धून वर्षभर असणार यात शंका नाही.

यंदा कर्तव्य आहे

टायगर श्रॉफ-दिशा पटनी

मलायका अरोरा-अर्जुन क पूर

अदर जैन-तारा सुतारिया

रणबीर कपूर-आलिया भट्ट

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 31, 2021 12:03 am

Web Title: anushka sharma virat kohli deepika padukone ranveer singh and sonam kapoor anand ahuja akp 94
Next Stories
1 हेही नसे थोडके …
2 निर्मिती-अभिनयाचा सुवर्णविवेक
3 लग्नानंतर मिसेस चांदेकरांचा मेकओव्हर; पाहा मितालीचा नवा लूक
Just Now!
X