22 September 2019

News Flash

‘अ‍ॅक्वामॅन’चा ‘डीसी युनिव्हर्स’ला रामराम

अ‍ॅक्वामॅनच्या दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहात आहेत, परंतु जेसन मोमा याने ‘अ‍ॅक्वामॅन - २’ मध्ये काम करण्यास नकार दिला आहे.

जबरदस्त अ‍ॅनिमेशन व अ‍ॅक्शन सीन्सने भरलेला ‘अ‍ॅक्वामॅन’ हा गेल्या काही वर्षांतील ‘डीसी युनिव्हर्स’ने निर्माण केलेल्या सर्वोत्कृष्ट सुपरहिरोपटांपैकी एक आहे. या चित्रपटात अभिनेता जेसन मोमा याने अ‍ॅक्वामॅन ही मुख्य व्यक्तिरेखा साकारली होती. या चित्रपटात त्याने केलेला अभिनय प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरला होता. परिणामी चाहत्यांनी अ‍ॅक्वामॅनला सर्वात लोकप्रिय सुपरहिरोंच्या पंगतीत स्थान मिळवून दिले. आता चाहते अ‍ॅक्वामॅनच्या दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहात आहेत, परंतु जेसन मोमा याने ‘अ‍ॅक्वामॅन – २’ मध्ये काम करण्यास नकार दिला आहे. त्याने आपल्या इन्स्टाग्राम पेजवरून आपला नकार चाहत्यांना कळवला आहे.

अमेरिकेतील हवाई या राज्यात ‘अ‍ॅक्वामॅन – २’च्या चित्रीकरणास येत्या काही दिवसांत सुरुवात होणार होती. परंतु त्या ठिकाणी ‘थर्टी मीटर टेलीस्कोप’ या प्रकल्पाविरोधात सुरू असलेल्या आंदोलनात जेसन मोमा याने भाग घेतला आहे. त्यामुळे त्याने ‘डीसी युनिव्हर्स’च्या अगामी चित्रपटात काम करण्यास नकार दिला आहे. ‘थर्टी मीटर टेलीस्कोप’ ही एक खगोलशास्त्रीय वेधशाळा आहे. या वेधशाळेत अद्ययावत संगणकीय दुर्बिणींच्या मदतीने आपल्या सूर्यमालेतील ग्रहांवर संशोधन केले जाते, परंतु या संशोधनादरम्यान हानीकारक पदार्थ व किरणांचे उत्सर्जन होते. परिणामी तेथील पर्यावरणाचा समतोल बिघडला आहे, असा आरोप या प्रकल्पाविरोधात तेथील स्थानिकांनी केला आहे. त्यांनी ‘थर्टी मीटर टेलीस्कोप’ या वेधशाळेत केले जाणारे प्रयोग थांबवण्यासाठी एक आंदोलनही उभे केले आहे. या आंदोलनात अभिनेता जेसन मोमा याने सक्रिय सहभाग घेतला आहे. या आंदोलनाच्या कामात व्यग्र असल्यामुळे त्याने अ‍ॅक्वामॅनच्या आगामी चित्रपटात काम करण्यास नकार दिला आहे.

सातत्याने तिकीटबारीवर फ्लॉप होणाऱ्या चित्रपटांमुळे ‘डीसी’ कंपनी सध्या आर्थिक संकटात अडकली आहे. तसेच अ‍ॅक्वामॅन हा डीसीच्या गेल्या काही वर्षांतील सर्वात जास्त कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक होता. त्यामुळे या चित्रपटाबाबत निर्माते प्रचंड आशावादी होते. परंतु अभिनेता जेसन मोमा याने ऐन मोक्याच्या क्षणी दिलेल्या नकारामुळे निर्मात्यांमध्ये आता गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. या गोंधळातून ‘डीसी कॉमिक’ कंपनी कसा काय मार्ग काढते?, हे पाहणे जसे उत्सुक तेचे ठरणार आहे. तसेच चाहत्यांनाही त्यांचा अ‍ॅक्वामॅन पुन्हा भेटणार की नाही़, हाही उत्सुकतेचा विषय ठरला आहे.

First Published on August 18, 2019 2:41 am

Web Title: aquaman 2 dc universe thirty meter telescope mpg 94