01 March 2021

News Flash

‘हे तर धक्कादायक’

बॉलीवूड हे ‘मी टू’चे केंद्रबिंदू असावे हे धक्कादायक आणि व्यथित करणारे असल्याचे अर्जुनने म्हटले आहे.

(संग्रहित छायाचित्र)

बॉलीवूडमध्ये ‘# मी टू’ मोहिमेंतर्गत रोज नवीन नाव, नवीन गोष्ट समोर येते आहे. ही नावंही बॉलीवूडमध्ये आजवर नावलौकिक कमावलेल्यांची असल्याने याप्रकरणी कोणतेच मोठे कलाकार सहजी बोलायला फारसे तयार नाहीत. प्रियांका चोप्रा, सोनम कपूर, फरहान अख्तर, स्वरा भास्कर, मलायका अरोरा, शिल्पा शेट्टी अशी मोजकीच कलाकार मंडळी नेहमीप्रमाणे इतर सामाजिक मुद्दय़ांप्रमाणेच यावरही बोलती झाली. मात्र अनेकांनी जे होतेय ते शांतपणे पाहत याविषयी मौन बाळगण्याची भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर आपल्या आगामी ‘नमस्ते इंग्लंड’ या चित्रपटाच्या प्रसिद्धीनिमित्ताने समोर आलेल्या अर्जुन कपूरने मात्र या प्रकरणाचा आणि त्यावर बॉलीवूडमधील त्याच्या सहकाऱ्यांनी घेतलेल्या भूमिकेचा स्पष्ट शब्दांत निषेध व्यक्त केला. बॉलीवूड हे ‘मी टू’चे केंद्रबिंदू असावे हे धक्कादायक आणि व्यथित करणारे असल्याचे अर्जुनने म्हटले आहे.

बॉलीवूडपासूनच या प्रकरणांची सुरुवात व्हावी हे त्रासदायक असले तरी जे घडले आहे त्यामुळे इंडस्ट्रीत किमान बदल तरी होईल, अशी अपेक्षा अर्जुनने व्यक्त केली आहे. या सगळ्या प्रकरणांमध्ये बॉलीवूडच खलनायक ठरणार असेल आणि त्यामुळे निदान यांनाही कुठल्याही चुकीच्या वर्तनासाठी शिक्षा होऊ शकते, ही भीती देशभरातील कोणत्याही व्यक्तीच्या मनात बसली. आणि नकळतपणे का होईना आम्ही त्याला असे कृत्य करण्यापासून थांबवू शकलो. तर मला जास्त आनंद आहे, असे अर्जुन कपूर याने म्हटले आहे. मात्र सातत्याने कानावर पडणाऱ्या या प्रकरणांमध्ये स्वत:ला आधुनिक विचारांचे पुरस्कर्ते म्हणवणाऱ्या कलाकार-दिग्दर्शकांनी काहीच भूमिका कशी घेतली नाही, आपल्या कंपनीत असे प्रकार होऊ नयेत, याची काळजी घेण्यात ही मंडळी कशी कमी पडली, यावरही त्याने प्रश्नचिन्ह उभे केले आहे. दिग्दर्शक विकास बहल याच्या विकृत वागणूकीबद्दल सगळीकडे कुजबुज होत होती. मात्र ‘फँटम’ सारखी प्रॉडक्शन कंपनीजी अनुराग कश्यप, मधु मंतेना, विक्रमादित्य मोटवने आणि विकास बहल अशा चार निर्माता-दिग्दर्शकांच्या खांद्यावर उभी राहिली. हे चौघेही हिंदी चित्रपटसृष्टीतील बदलत्या प्रवाहांचे चेहरे म्हणून ओळखले जातात. त्यांच्या कंपनीत एक महिला कर्मचारी त्यांच्याच सहकाऱ्याकडून लैंगिक छळवणूक होत असल्याची तक्रार करते आणि तरीही तिच्या तक्रारीची दखल घेतली जात नाही. त्याबाबतीत काहीच भूमिका न करण्याइतपत ही मंडळी शांत कशी राहिली याचेच आश्चर्य वाटत असल्याचे त्याने म्हटले आहे.

‘फँटम’ प्रॉडक्शनबद्दल मला खूप आदर आहे. मी या चौघांशीही सविस्तर बोललो आणि या प्रकरणी जे तपशील वाचले ते त्रासदायक आहेत. तुमच्या कंपनीत एखाद्या कर्मचाऱ्याचे शारीरिक-मानसिक, कार्यालयीन समस्यांकडे लक्ष देण्यासाठी मनुष्यबळ अधिकारीच नाही हे कसं होऊ शकतं? कुठल्याही कंपनीसाठी ही मूलभूत गोष्ट आहे. तसा अधिकारी असता तर त्या महिला कर्मचाऱ्याला पुढे जो त्रास भोगावा लागला तो नक्कीच थांबवता आला असता, असं सांगत हा प्रकार कोणा एका कंपनीपुरता मर्यादित नाही. तर तो सध्या पूर्ण इंडस्ट्रीच्या अशा अलिप्त राहण्यामुळे होतो आहे, असेही त्याने स्पष्ट केले. आम्ही सतत फक्त अशा गोष्टी ऐकत असतो. ही प्रकरणे ऐकल्यानंतर यातली सत्यासत्यता पडताळून पाहण्याचे कष्टच कोणी घेत नाही. उलट आमच्या इंडस्ट्रीत असं काही घडत नाही, हेच छातीठोकपणे सांगण्यात आपण धन्यता मानतो, असेही त्याने सांगितले. लैंगिक गैरवर्तन करणाऱ्या कलाकारांबरोबर आपण काम करणार नाही, असे अभिनेता अक्षय कुमारने याआधीच जाहीर केले आहे. अर्जुनचीही तीच भूमिका आहे का? यावर उत्तर देताना अशा लोकांना समाजच बाहेर फेकून देईल, असं तो म्हणतो. अशा लोकांची सातत्याने नावं घेऊन त्यांना मोठं करण्यातही आपल्याला रस नसल्याचे त्याने स्पष्ट केले.

मात्र याचबरोबर इतक्या उशीरा या अभिनेत्रींनी याविषयी वाच्यता करण्याचे कारण काय? अशी उलट टीका केली जाते आहे ते चुकीचे असल्याचे त्याने सांगितले. या स्त्रियांना नेमकं काय भोगावं लागलं आहे, याची आपल्याला सुतराही कल्पना येऊ शकत नाही. कोणतीही स्त्री अशा अनुभवांतून जाते तेव्हा निश्चितच यासंबंधीचे पुरावे गोळा करण्याचा विचार त्यांच्या मनात येणारच नाही. अशा वेळी ९९ टक्के स्त्रिया खरंच बोलत असतात, आपण त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. त्यांनी आपले अनुभव सांगायला तीस वर्षे घेतली की तीन मिनिटे याने काही फरक पडत नाही. त्यांनी तो अनुभव लोकांना सांगण्याचं धाडस केलं हे इथे जास्त महत्त्वाचं ठरतं. त्यांच्या धाडसामुळे अशा अनेक व्यक्तींना त्यांच्या कृत्याचा जबाब द्यावा लागतोय. त्यामुळे या स्त्रियांचे कौतुकच करायला हवे, अशी भूमिका त्याने मांडली. आत्ताच्या परिस्थितीत इंडस्ट्रीने एकत्र येऊन अशा व्यक्तींविरोधात कारवाई होण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. यानिमित्ताने, इंडस्ट्रीतील वातावरण स्त्रियांना काम करण्यासाठी अधिकाधिक सुरक्षित कसं करता येईल, यावर विचार आणि त्यानुसार उपाययोजना होणे गरजेचे असल्याचे त्याने म्हटले आहे. आणि म्हणूनच या प्रकरणांवर ताबडतोब प्रतिसाद न देता त्यावर विचारपूर्वक कार्यवाही व्हायला हवी, असे तो म्हणतो.

‘बिग बी’चे बिंग फुटणार’

आत्तापर्यंत ‘मी टू’ प्रकरणाबद्दल मौन बाळगलेल्या सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ७६ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने याप्रकरणी सविस्तर निवेदन जाहीर केले. मात्र त्यांचे हे निवेदन धादांत खोटे असून त्यांचेही सत्य लवकरच जगासमोर येईल, असा आरोप सेलेब्रिटी हेअरस्टायलिस्ट सपना भवनानी यांनी समाजमाध्यमांवर केला आहे. अमिताभ बच्चन यांनी केलेल्या लैंगिक गैरवर्तनाच्या अनेक गोष्टी आपण याआधी ऐकलेल्या आहेत, असे सांगत या महिलांनीही पुढे येऊन त्यांचे अनुभव जाहीरपणे सांगावेत, असे आवाहन सपना यांनी केले आहे. ‘पिंक’ चित्रपट येऊन गेला आता तुमची ही सुधारकाची खोटी प्रतिमा आहे तीही लवकरच नष्ट होईल, असे त्यांनी थेट म्हटले आहे.

अमृता पुरी- फरहान अख्तर वाद

साजिद खानच्या विकत वर्तणूकीचे किस्से इंडस्ट्रीत सगळ्यांना माहिती आहेत. त्याच्या कुटुंबियांना त्याच्या या स्वभावाबद्दल माहिती होतं. त्यामुळे त्यांना आता हे ऐकून धक्का बसला असा दावा केला जातोय तो खोटा असल्याचे ट्विट अभिनेत्री अमृता पुरी हिने केले. त्यावर साजिदचे वर्तन त्याच्या कुटुंबियांना माहिती होते हा अमृताचा दावा योग्य नसल्याची भूमिका अभिनेता फरहान अख्तरने घेतली. फरहान हा साजिद खानचा चुलत भाऊ आहे. साजिदवर ‘मी टू’ प्रकरणात ज्या पध्दतीचे आरोप झाले आहेत ते ऐकून कुटुंबियांना धक्का बसल्याचे फरहानने सांगितले होते. अमृताने साजिदवर जो राग व्यक्त केला आहे तो मी समजू शकतो मात्र तिचा कुटुंबियांच्याबाबतीला दावा योग्य नाही, असे त्याने स्पष्ट करताच साजिद आणि फरहान यांच्यातील नाते आपल्याला माहिती नव्हते. मी सरसकट विधान करणे चुकीचे आहे, असे म्हणत अमृताने समाजमाध्यमावर फरहानची माफीही मागितली.

आतापर्यंत बंद असलेला हा पेटारा आता उघडला आहे. इंडस्ट्रीचा खरा चेहरा सगळ्यांना दिसतो आहे. अशा वेळी खोटी कारणे शोधून हे घडलेच नाही असे दाखवण्याला अर्थ उरलेला नाही. आता शांत बसून जे जे बाहेर पडतंय ते पाहायला हवं. आणि त्यानंतर एक व्यक्ती म्हणून, इंडस्ट्रीतील व्यावसायिक म्हणून प्रत्येकानेच विचार करण्याची, अंतर्मुख होण्याची गरज आहे.

– अर्जुन कपूर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 14, 2018 12:38 am

Web Title: arjun kapoor express on me too movement
Next Stories
1 वे ब सी रि ज ही
2 हिरो व्हायचंय मला!
3 # MeToo : साजिद आऊट, फरहाद सामजी करणार ‘हाऊसफुल ४’ दिग्दर्शन
Just Now!
X