‘इशकजादे’ या चित्रपटातून अर्जुन कपूरने बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं तेव्हापासून सातत्याने एकापाठोपाठ एक चित्रपट करत सुटलेला अर्जुन सध्या रुपेरी पडद्यावरून गायबच झाल्याचे चित्र दिसते आहे. आर. बाल्की दिग्दर्शित ‘की अँड का’ या चित्रपटातून अर्जुन चक्क करिना कपूरचा नायक म्हणून दिसणार आहे. शिवाय, छोटय़ा पडद्यावरही तो ‘खतरों के खिलाडी’च्या निमित्ताने सक्रिय झाला आहे. लोकप्रियतेच्या शिखरावर असताना त्याचे असे छोटय़ा पडद्यावर येणे भल्याभल्यांना आश्चर्यात टाकणारे होते. गेली तीन वर्षे सातत्याने काम करून कंटाळलेल्या अर्जुनला आपल्याला थोडी विश्रांती हवी असल्यानेच थोडे वेगळे प्रयोग करायचे ठरवल्याचे त्याने सांगितले.

‘इशकजादे’ हा यशराज प्रॉडक्शनचा पहिला चित्रपट यशस्वी ठरल्यानंतर अर्जुनने ‘औरंगजेब’, ‘गुंडे’, ‘फाइंडिंग फॅ नी’, ‘२ स्टेट्स’ असे एकापाठोपाठ एक चित्रपट केले. गेल्यावर्षी त्याने वडील बोनी क पूर यांची निर्मिती असलेला ‘तेवर’ चित्रपट केला. तो चांगलाच आपटल्यानंतर अर्जुनने आपला चित्रपटांचा वेगही कमी केला. ‘तेवर’ चित्रपटाच्या वेळी शारीरिक आणि मानसिकदृष्टय़ा मी फिट नव्हतो. तीन वर्षे एकही सुट्टी न घेता सातत्याने काम करून क रून मी पूर्ण थकलो होतो. माझी शक्ती पूर्ण खेचून घेतली आहे, अशी अस्वस्थता माझ्यात घर करून होती. या सगळ्याचा परिपाक म्हणून मी चित्रपटांचा वेग कमी करायचा निर्णय घेतला आहे, असे अर्जुनने सांगितले.

‘एकापाठोपाठ सहा चित्रपट मी केले. बारा महिन्यांत माझे चार चित्रपट प्रदर्शित झाले होते. मी स्वत:लाच पडद्यावर पाहून कंटाळलो होतो. मग प्रेक्षकांचे काय झाले असेल, असा विचार मनात येतो. मार्के टच्या दृष्टीने पाहिले तरी माझे असे लागोपाठ चित्रपट करणे चुकीचे होते हे जाणवल्यानंतरच मी माझे धोरण बदलले आहे,’ असे सांगणाऱ्या अर्जुनने आपण ‘तेवर’च्या अपयशामुळे कुठेही नाराज झालो नव्हतो, असे स्पष्ट केले. ‘तेवर’चं चित्रीकरण सुरू असतानाच माझ्या आजारांना सुरुवात झाली होती. मी चित्रपटाचे प्रमोशन करत सुटलो होतो, मात्र त्याचे परिणाम तब्येतीवर होत होते. त्यामुळे चित्रपट चालला असता तरी ही विश्रांती मला घ्यायचीच होती, असं त्याने सांगितलं.

‘की अँड का’ चित्रपटात त्याच्याही आधी करिनाची निवड झाली होती. त्यामुळे त्याबाबतीतला निर्णय आपला नव्हता, मात्र हा चित्रपट त्याच्या आत्तापर्यंतच्या चित्रपटांपेक्षा पूर्णपणे वेगळा असल्याचे त्याने सांगितले. करिनाबरोबर काम करतानाही मजा आल्याचे सांगणाऱ्या अर्जुनने आपल्या कामाची तारीफ खुद्द सैफकडून झाली असल्याचे सांगितले. या वर्षभरात त्याने एक चित्रपट आणि एक रिअ‍ॅलिटी शो पूर्ण के ला आहे. यापुढेही एकावेळी एकच चित्रपट करण्यावर आपला भर असेल, असे त्याने स्पष्ट केले.