काळवीट शिकार प्रकरणात अवैधरित्या शस्त्रास्त्र बाळगल्याप्रकरणी सुरू असलेल्या खटल्यात बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या अडचणीत भर पडली आहे. सलमानने तब्येतीचे कारण पुढे करत या खटल्याच्या सुनावणीला गैरहजर राहण्याची मुभा मागितली होती. मात्र, या काळात सलमान चित्रपटांचे चित्रीकरण करत होता, अशी हरकत घेत जोधपूर न्यायालयात सलमानविरोधात विनंतीअर्ज दाखल करण्यात आला आहे. मुख्य न्याय दंडाधिकारी अनुपमा बिजलानी यांनी वनाधिकारी ललित बोडा यांच्या विनंतीअर्जाचा स्विकार केला आहे. वनाधिकारी बोडा यांनीच १९९८मध्ये काळवीट शिकार प्रकरणी सलमानविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. आता, या खटल्याची पुढील सुनावणी २९ एप्रिल रोजी होणार आहे.

यावेळी एच.एम.सारस्वत यांनी न्यायालयात सलमानची बाजू मांडली. सलमानच्या कानाला झालेल्या दुखापतीमुळे त्याला डॉक्टरांनी विमानाने प्रवास करण्यास मनाई केली होती, त्यामुळेच सलमान खानकडून सुनावणीला गैरहजर राहण्याची मुभा मागण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यादरम्यान, मी चित्रीकरण करणार नाही, असे कोणतेही वचन सलमानने न्यायालयाला दिले नव्हते. फक्त कानाच्या त्रासामुळे हवाई प्रवास करता येणार नाही एवढीच गोष्ट सलमानतर्फे सांगण्यात आली होती, असे सारस्वत यांनी न्यायालयासमोर स्पष्ट केले. त्यामुळे सलमानविरोधात विनंतीअर्जाच्या माध्यमातून दाखल करण्यात आलेली तक्रार योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले.
बोडा यांनी सादर केलेल्या विनंतीअर्जात त्यांनी सलमान खान ‘बजरंगी भाईजान’च्या चित्रीकरणासाठी जम्मू-काश्मीर येथे गेल्याची प्रसारमाध्यमांतील वृत्ते निदर्शनास आणून दिली आहेत. त्यामुळे तब्येतीचे कारण पुढे करत सलमानने मागितलेली मुभा न्यायालयाची दिशाभूल करणारी असल्याचे बोडा यांनी म्हटले आहे. तेव्हा न्यायालयाने सलमान खानविरुद्ध सक्त कारवाई करावी, अशी मागमी बोडा यांनी केली आहे. १९९८ साली जोधपूर येथे काळवीटाची शिकार केल्याप्रकरणी वन विभागाकडून सलमान खानविरुद्ध शस्त्रास्त्र कायद्याअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.