25 September 2020

News Flash

वेबवाला : नार्को पुन्हा एकदा

गेल्या तीन वर्षांत नेटफ्लिक्सवरील ज्या वेबसिरीजना सर्वाधिक लोकप्रियता लाभली त्यात नार्कोजचे तीनही सीझन होते.

(संग्रहित छायाचित्र)

सुहास जोशी

गेल्या तीन वर्षांत नेटफ्लिक्सवरील ज्या वेबसिरीजना सर्वाधिक लोकप्रियता लाभली त्यात नार्कोजचे तीनही सीझन होते. लोकांना हिंसात्मक कथानकं पाहायला आवडतात वगैरे मानसशास्त्रीय निष्कर्ष काढण्यापेक्षा हे लोकांना आवडते त्यामुळे मग त्या साच्यातून आणखीन काय दाखवता येईल हे व्यावसायिकाचे लक्ष्य असते. ते नार्कोज : मेक्सिको या मागील आठवडय़ात प्रदर्शित झालेल्या वेबसिरीजने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. अमली पदार्थाचा व्यापार हा कितीही वाईट असला तरी त्यावर आधारित कथानक पडद्यावर दाखवणे हे प्रेक्षकसंख्या वाढवणारे असते हेच डोक्यात ठेवून नार्कोज : मेक्सिको ही वेबसिरीज तयार केली आहे. नेटफ्लिक्सने जरी ती स्वतंत्र वेबसिरीज म्हटले असले तरी एकूणच त्याची रचना, मांडणी आणि सादरीकरण पाहता ही सिरीज मूळ नार्कोजचा चौथा सीझन म्हणता येईल अशी आहे. कथानक कोलंबियातून मेक्सिकोत नेले असले तरी त्याचे लक्ष्य हे अमेरिकेतील अमली पदार्थाचा वाढता कारभार आणि ते रोखण्यासाठी डीइए (ड्रग एन्फोर्समेन्ट अडमिनिस्ट्रेशन) यांच्या हालचाली हेच समान सूत्र येथे आहे.

भौगोलिक सीमा बदलल्या असल्या आणि कथेचा सारा रोख हा त्या एका साचेबद्धतेत असला तरी काही महत्त्वाच्या बाबी येथे पूर्णत: नव्याने येताना दिसतात. ऐंशीच्या दशकात मेक्सिकोत धुमाकूळ घातलेल्या ग्वादलाहारा कार्टेलची ही गोष्ट आहे. सिनोला प्रांतातील चरस, गांजाच्या शेतीवर मेक्सिको सरकारने थेट लष्करालाच पाचारण करून ती शेती उद्ध्वस्त केली. तेव्हा त्याच शहरातील फेलिक्स हा पोलीस अधिकारी नोकरी सोडून चरस, गांजाच्या शेतीसाठी पर्याय शोधतो. शेती आणि त्यावर अवलंबून असलेला अमली पदार्थाचा व्यवसाय संकटात आल्यामुळे बेकार झालेला राफाएल एक भन्नाट युक्ती शोधतो. ती म्हणजे थेट वाळवंटी भागात चरस, गांजाची शेती करायची. ती तो यशस्वी करतो देखील. सिनोला प्रांतातील डॉन नेतो आणि हे दोघे थेट ग्वादालाहारा शहरात येतात. तोपर्यंत विस्कळीत असलेला आणि प्रत्येक गटाचा स्वतंत्रपणे सुरू असलेला व्यवसाय हा फेलिक्स संघटित आणि नियंत्रित करतो. त्यातून ग्वादालाहारा कार्टेलचा जन्म होतो. केवळ मेक्सिकोतील चरस, गांजाच नाही तर कोलंबियातील कोकेनदेखील अमेरिकेत नेऊ न पोहचवण्याचे काम सुरू होते. परिणामी पैसाच पैसा. मात्र हे होताना, पोलीस, राजकारणी, संरक्षण दल या सर्वाची एक अभद्र युती तयार होते. अशा युती या सोयीस्कररीत्या होत असतानाच त्याच सहजतेने उद्ध्वस्तदेखील होत असतात. याच भोवती या सिरीजचा हा पहिला सीझन गुंफला आहे.

कथानकाचा गाभा एकच असल्याने नार्कोज आणि नार्कोज मेक्सिको यांची तुलना ही होतच राहणार. त्यातच सिरीजकर्ते एकच असल्याने एकूणच वाटचाल तशीच असणार हे अपेक्षितच म्हणता येईल. पण त्याचमुळे प्रेक्षक आधीच्या नार्कोजच्या आठवणीत गेला नाही तरच नवल आणि त्याचा फायदा लोकप्रियतेत नक्कीच होतो. दिग्दर्शनात तोच प्रभाव दिसून येतो. एकाच वेळी दोनतीन ठिकाणी सुरू असणाऱ्या घटना एकाच वेळी दाखवून प्रेक्षकाला खिळवून ठेवण्याची पद्धत अगदी तशीच आधीच्या सिरीजप्रमाणे प्रभावी झाली आहे. पण ही जमेची बाजू असली तरी नार्कोज मेक्सिकोचे कथानक काही ठिकाणी मात्र खूपच मंद गतीने पुढे जाताना दिसते. अगदी प्रेमप्रकरणांवरदेखील भरपूर वेळ खर्च केला आहे. अर्थात त्या प्रेमप्रकरणाचा थेट कथानकावर परिणाम होत असला तरी तो वेळ अनाठायी वाटतो. तसेच घरातील, कार्यालयातील अगदी छोटे छोटे प्रसंगदेखील काही वेळा बारकाईने मांडले आहेत. मांडणी म्हणून हे कदाचित ठीक वाटत असले तरी ते कथानकात, सादरीकरणात काही भर घालत नाहीत.

अमली पदार्थाचे व्यापारी, तस्कर यांचे साम्राज्य हा जरी विषय असला तरी काही बाबतीत ही सिरीज एकदम वेगळी आहे. एकाच वेळी प्रत्यक्ष घटनास्थळावर आणि टेबलावरील चर्चा, वाद असं दोन्ही यामध्ये आहे. किंबहुना प्रत्यक्ष तस्करी अथवा त्यासंदर्भातील घटना यापेक्षा धोरणात्मक बाबींमधील राजकारण मांडण्यावर अधिक भर आहे. त्यामुळे बंदुकीतून, पिस्तूलातून दणादण गोळ्या झाडणे, एकापाठोपाठ एक असे खून करणे, सेक्स अशा बाबी या अगदीच गरजेनुसार येतात हा चांगलाच बदल आहे. आणि कथेची गरज ही शह-काटशहाचे राजकारण अशी असल्याचा तो परिणाम असावा. पाब्लो एस्काबोरवर आधारित नार्कोज असो की मेक्सिकोतील नार्कोज हे माहितीपटाच्या अंगाने मांडता येणारे विषयदेखील आहेत. पण ते अधिक रंजक कसे करता येईल यावर सिरीजकर्त्यांचा भर आहे हे निश्चित. काही वेळा यशस्वी फॉम्र्युला असला तरी सिरीजकर्ते एकुणात यशस्वी ठरतात हे महत्त्वाचे आहे.

नार्कोज मेक्सिको पाहताना अनेक ठिकाणी कंटाळवाणे वाटू लागते. पण तरीदेखील एक भाग संपता संपता पुढचा भाग पाहण्याची उत्सुकता निर्माण होते हे नक्की. त्याचबरोबर दुसऱ्या सीझनचे बीजदेखील यात व्यवस्थित पेरले आहे. या  सर्व घटकांमुळे एकदा पाहण्यास चांगली व लोकप्रिय होईल अशीच ही वेबसिरीज आहे.

नार्कोज : मेक्सिको सीझन पहिला

ऑनलाइन अ‍ॅप : नेटफ्लिक्स

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 25, 2018 12:37 am

Web Title: article about narcos web series new narcos
Next Stories
1 बॉक्स ऑफिसवर ‘नाळ’राज
2 ९० हजारांचे बूट घालून मलायकाची अर्जून कपूरसोबत डिनर डेट
3 Video : रणवीर-दीपिकाचे रिसेप्शन ‘असे’ झाले सोशल मीडियावर ट्रोल
Just Now!
X