अभिषेक मुठाळ

वेब मालिकांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. त्यात भर पडते आहे चांगल्या कलाकारांची. दूरदर्शन ते मराठी-हिंदी चित्रपट, वाहिन्यांवरच्या मालिका, नाटक असा मोठा पल्ला गाठलेले अनेक प्रतिभावंत कलाकार सध्या वेबसीरिजच्या नव्या माध्यमाकडे वळले आहेत. या माध्यमाचं नवंपण आणि या दिग्गज कलाकारांचा अनुभव असा वेगळा संगम या वेब मालिकांच्या निमित्ताने पाहायला मिळतो आहे.

तेरा भागांच्या मालिकांसाठी दूरदर्शनवरून सुरुवात केलेले हे कलाकार दैनंदिन मालिकांच्या त्याच त्याच साचेबद्धपणाला कंटाळून या माध्यमापासून दुरावले होते. त्यात भर म्हणजे आठवडय़ाला होणाऱ्या सणांच्या महाएपिसोडमुळे मालिकांचा ट्रॅकवर होणारा परिणाम, लांबत जाणारा आशय यामुळे नकारात्मक दृष्टिकोन निर्माण झाला होता. रोज आशयाच्या नादात लेखकांकडून काहीही लिहून घेऊ न प्रेक्षकांच्या माथी मारण्याच्या प्रयत्नात लेखकाची अभिव्यक्ती, दिग्दर्शकाचं डोकं, कलाकारांची मेहनत आणि शेवटाला प्रेक्षकही भरडले जातात. या सगळ्यांपासून सध्या दूर असलेले डिजिटल प्लॅटफॉर्म म्हणूनच या जुन्याजाणत्या कलाकारांना आकर्षित करू लागले आहे.

वेब मालिकांमुळे काही प्रमाणात हे चित्र बदलायला सुरुवात झाली आणि त्यामुळे प्रेक्षकांची आवड टीव्हीच्या चॅनेलसोबत नव्हे तर लाइक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राइबच्या बटनवरून बदलू लागली. माध्यमं वेगवेगळी असली तरी त्यात फरक असा काही नाही. तंत्रज्ञान जरी बदललं तरी लागणारी माणसं तीच. त्यामुळे कलाकारांना इथे वाव मिळाला नसता तरच नवल. मात्र नाटय़सृष्टी आणि जुन्या मालिकांमधून काम केलेली अनेक कलाकार मंडळी या माध्यमाच्या जवळ येताना दिसू लागली आहेत. मोहन आगाशे, सुप्रिया पिळगावकर, सचिन पिळगावकर, यतीन कार्येकर इत्यादी कलाकार आपल्याला या माध्यमात काम करताना दिसत आहेत. यात वेगवेगळ्या आशयघन मालिका करायला मिळत असल्यामुळे आणि काम करण्याचं स्वातंत्र्य अबाधित राहत असल्यामुळे ज्येष्ठ कलाकारांचाही ओढा या माध्यमाकडे आपसूकच वळताना दिसतो आहे.

अल्ट बालाजीच्या ‘होम’ या वेब मालिकेत काम करणाऱ्या सुप्रिया पिळगावकर यांनी या माध्यमाबाबतचा आपला अनुभव सांगितला. ‘मी हिंदी मालिकांमधून काम करतच होते. त्यात या माध्यमात काम    करण्याची पद्धत कशी असते त्याबद्दल मला जास्त काही माहिती नव्हतं. माझी मुलगी श्रीयान मला एका लघुपटासाठी काम करायला घेऊन गेली. त्यानंतर मी हे माध्यम अनुभवण्याचं ठरवलं. मी तिला नेहमी म्हणत राहायचे, ‘काय तुम्ही ही आजकालची मुलं त्या मोबाइलला चिकटून असता, काय पाहत राहता त्यात!’ त्या वेळी ती मला म्हणाली की आम्ही यावर देशी-परदेशी मालिका आणि वेगवेगळे शो पाहत असतो. हे सगळं बघतं कोण याचं मला कुतूहल होतं. त्यामुळे मग मी पण लघुपट अनुभवल्यानंतर वेब मालिका करावी म्हणून होम ही मालिका केली,’ असं त्या म्हणाल्या.

दूरदर्शनवरच्या मर्यादित मालिका ते आताच्या भरमसाट वाहिन्यांवर सुरू असणाऱ्या शंभर, पाचशे, हजारांचा पल्ला गाठणाऱ्या मालिका आणि त्यांचा ओढूनताणून आणलेला आशय पाहता त्यातून मिळणारा आनंद कमी आणि चित्रीकरणाचा त्रास जास्त.. असाच सूर या कलाकारांचा आहे. हिंदी आणि मराठीतील अनेक नामवंत, अनुभवी कलाकार एकवेळ निवडक चित्रपटातून काम करतील मात्र टेलिव्हिजनवर येण्याचा विचार ते फार काळजीपूर्वक करताना दिसतात. मात्र वेब मालिकांचा आशयच नव्हे तर त्यांना मिळणारी प्रेक्षकसंख्याही या कलाकारांना वेब माध्यमाकडे आकर्षित करते आहे. परमनंट रूममेट्समध्ये आपल्याला असरानी आणि दर्शन जरीवाला सारखे मोठे कलाकार दिसले होते. त्यानंतर लोक आग्रहास्तव आलेली साराभाई वर्सेस साराभाई ही मालिका आपल्याला टीव्हीवर न येता ती वेबवर दिसते. हा एक वेगळा प्रयोग आपल्याला दिसतो. यातही आपल्याला रत्ना पाठक आणि सतीश शहा यांच्यासारखी कलावंत मंडळी आवर्जून काम करताना दिसतात. यूटय़ूब हे माध्यम सर्वाना खुले असल्यामुळे त्यावर येणारे प्रेक्षकही सर्व प्रकारचे आणि वयोगटातील असतात. वेब मालिकांमधील विषयाचे वैविध्य आणि त्यातून मिळणारे कामाचे समाधान या दोन गोष्टी कलाकारांसाठी महत्त्वाच्या ठरल्या आहेत. फादर या मालिकेत तर आपल्याला तीन ज्येष्ठ कलाकार मुख्य भूमिकेत दिसतात. गजेंद्र राव, अतुल श्रीवास्तव आणि ब्रिजेश काला यांनी फादर या वेब मालिकेपासून सुरुवात केली आणि आता तर या मंडळींनी वेब मालिकांमध्ये चांगलं बस्तान बसवलं आहे.

ज्येष्ठ अभिनेता, दिग्दर्शक सचिन पिळगावकर यांनी तर स्वत: मालिकांचं दिग्दर्शनही केलं आहे. मात्र टीव्ही मालिकांमध्ये अभिनय करणं त्यांना अवघडच वाटतं. ते म्हणतात ,‘डेली सोप टीव्ही मालिकांच्या वेळात काम करणं माझ्यासाठी अवघड आहे. मात्र डिजिटल माध्यम हे टीव्हीपेक्षा पूर्णपणे वेगळं आणि थोडं फार चित्रपटाच्या माध्यमाशी मिळतंजुळतं माध्यम आहे. कथा-पटकथा आधीच बांधलेली असते. माध्यमातील कथेचे विषय निवडण्याचं प्रमाण पण दर्जेदार आहे. त्यामुळे मी सेक्स चॅट विथ पप्पू अ‍ॅण्ड पापा ही वेब मालिका केली. चित्रपटासारखा नियोजनबद्ध साचा यात असल्याने वेगळी अशी मेहनत या माध्यमाकरिता घ्यावी लागली नाही. लैंगिक शिक्षणावर ही मालिका करताना एक फ्लो ठेवावा लागणार होता, कारण विषय थोडा नाजूक होता आणि तो आम्ही चांगल्या रीतीने पेलल्यामुळे ही मालिका लोकांना आवडली’, असं त्यांनी सांगितलं.

डिजिटल माध्यमाचा विचार करताना एकंदरीतच दृक्श्राव्य माध्यमाच्या जन्मापासूनचा वेध घेतला पाहिजे, असं मत ज्येष्ठ अभिनेता डॉ. मोहन आगाशे यांनी व्यक्त केलं. माध्यमांकडे आपण आजवर करमणुकीचं साधन म्हणूनच पाहिलं आहे पण डिजिटल माध्यम हे मनोरंजनाबरोबरच कलागुणांना वाव देणारं व्यासपीठ आणि शिक्षणाचंही माध्यम आहे. सध्याच्या डिजिटल युगात प्रयोग होत आहेत पण त्यामुळे करमणुकीसोबतच कलागुणांची वाढ होते आहे हा भाग येतो. शिवाय प्रेक्षकांना आपल्याकडे खेचून आणण्याची ताकद या माध्यमाकडे आहे. मला अनेकदा प्रेक्षक भेटतात. ते म्हणतात अमुक एक नाटक-चित्रपट चांगला आहे हे ऐकलं आहे. पण ते पाहण्यासाठी नाटय़गृहात किंवा चित्रपटगृहात कोण जाणार, त्यामुळे ते पाहणं टाळलं जातं. निदान इथे तसं होत नाही, असं आगाशे यांनी सांगितलं.

प्रकर्षांने वाढणारा प्रेक्षक आणि वेगवेगळे विषय हाताळण्याची या डिजिटल माध्यमात असलेली ताकद यामुळे अनेकदा गंभीर विषय ही हलक्याफुलक्या पद्धतीने, छोटय़ा-छोटय़ा गोष्टींमधून या वेब मालिकांमधून रंगवता येतात. त्यामुळे नव्याजुन्या कलाकारांचा डिजिटल माध्यमाबद्दलचा सकारात्मक दृष्टिकोन ही या माध्यमाची जमेची बाजू आहे, असं मत ही अनुभवी कलाकार मंडळी व्यक्त करतात.