News Flash

कसोटी वाहिन्यांची आणि प्रेक्षकांचीही

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या (ट्राय) नव्या नियमांमुळे प्रेक्षकांना त्यांच्या आवडत्या वाहिन्या निवडण्याचं स्वातंत्र्य मिळालं.

(संग्रहित छायाचित्र)

भक्ती परब

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या (ट्राय) नव्या नियमांमुळे प्रेक्षकांना त्यांच्या आवडत्या वाहिन्या निवडण्याचं स्वातंत्र्य मिळालं. आधीही हे स्वातंत्र्य होतंच, पण ते ‘पॅकेज’मध्ये बंदिस्त होतं. तसंच ते आपल्याला सेवा देणाऱ्या केबलचालक आणि डीटीएच ऑपरेटर यांच्या धोरणावर अवलंबून होतं. पण हे स्वातंत्र्य मिळालंय..या वाक्यात अनेक अर्थ सामावलेले आहेत. आजवर आपण आपल्या आवडीने चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहायचो. नाटकाचेही तसेच. अलीकडे आपण वेबसीरिज या माध्यमामध्ये रुळलोय, तर या वेबसीरिजही आपल्या आवडीमुळेच पाहतो. काय पाहायचं, काय नाही, हे निवडीचं स्वातंत्र्य इथेही अबाधित राहतं. पण दूरचित्रवाणी माध्यमाचं तसं नव्हतं. हे माध्यम आजही कुटुंबाच्या जास्त जवळ आहे. त्यामुळे वाहिन्यांची निवड हा भाग गांभीर्याने घेतला जात नव्हता. पण वाहिन्या निवडीचं स्वातंत्र्य मिळाल्यावर आपण ही वाहिनी अमुक एवढी रक्कम मोजून निवडली आहे, त्यामुळे चांगल्या मालिका पाहायला मिळायल्या हव्यात, अशी अपेक्षा प्रेक्षकांची इथून पुढे असणार आहे.

‘ट्राय’चा हा नियम अशा अनेक अर्थानी क्रांतिकारी म्हणायला हवा. एरव्ही ‘पॅकेज’मध्ये कुठल्या वाहिन्या आणि किती वाहिन्या आहेत, हे ढुंकूनही न पाहणारे आपण यानिमित्ताने जागरूक झालो. आणि आपल्या दूरचित्रवाणी संचावर आपल्याला आवडेल तेच यापुढे पाहू, असे म्हणून सज्ज झालोय.

स्टार, कलर्स, झी, सोनी या बडय़ा प्रक्षेपण कंपन्यांनी त्यांच्या वाहिन्यांची वेगवेगळी ‘पॅकेजेस’ केली. अर्थात ही पॅकेजेस असली तरी स्वतंत्रपणेही वाहिन्या निवडता येणारच आहेत. सुपरस्टार अमिताभ बच्चन, आमीर खान, महेंद्रसिंग धोनी ते लोकप्रिय हिंदी-मराठी कलाकार घेऊन वाहिन्यांच्या पॅके जच्या जाहिराती सध्या सुरूच आहेत. आमचा पॅक निवडा हे त्यांचं सांगणं, आपल्याला विचार करायला लावत आहे. पण यासाठी ‘चांगला आशय’ हाच निकष असणार आहे.

या नियमामुळे दूरचित्रवाणीचं मनोरंजन विश्व विस्तारण्याऐवजी मर्यादित होईल, असंही बोललं जातंय. नि:शुल्क वाहिन्यांमध्ये १०० वाहिन्या आणि त्यानंतर पुढे सशुल्क वाहिन्या निवडताना अनावश्यक वाहिन्या मागे पडणार आहेत. त्यामुळे वाहिन्यांचे जग बडय़ा प्रक्षेपण कंपन्यांपुरतं सीमित होईल, अशीही शक्यता वर्तवली जात आहे.

पण वाहिन्यांची निवड करताना अजून एक मुद्दा आहे तो ‘अ‍ॅक्टीव्ह प्रोग्रामिंग’चा. टेलिव्हिजन प्रोग्रामिंगमध्ये सकाळ, दुपार, संध्याकाळ (प्राइम टाइम) आणि शनिवार, रविवार अशा वेगवेगळ्या वेळात पाहिले जाणारे कार्यक्रम प्रेक्षकांसाठी तयार करायचे असतात.

परंतु बऱ्याच वाहिन्यांवर सकाळचा एखाददुसरा कार्यक्रम नंतर आधीच्या दिवशीच्या प्राइम टाइम कार्यक्रमांचे पुनप्र्रसारण त्यांनतर प्राइम टाइमचे कार्यक्रम कधी कधी शनिवार, रविवारी चित्रपट किंवा महाएपिसोड अशी रचना दिसून येते. बऱ्याचदा अनेक वाहिन्यांवर प्राइम टाइम सोडून इतर राहिलेल्या वेळेत पुनप्र्रसारित कार्यक्रमच दाखवले जातात. यामुळे वाहिन्या निवडल्यावर प्रेक्षकांना कदाचित तेच तेच कार्यक्रम पुन्हा पाहत बसावे लागतील. पण नव्या नियमामुळे सजग झालेल्या वाहिन्याही प्रोग्रामिंगमध्ये असलेल्या सगळ्या वेळात वेगवेगळ्या मालिका प्रेक्षकांसाठी आणण्याचा प्रयत्न इथून पुढे करतील असेही चिन्ह आहे.

इन्फोटेनमेंट आणि लाईफस्टाईल वाहिन्यांवर चांगला आशय असतो. पण तेच तेच पुनप्र्रसारित भाग पाहावे लागत असल्यामुळे प्रेक्षक दैनंदिन मालिकाच पाहणे पसंत करतो. ‘एपिक’ ही वाहिनी त्याचे चांगले उदाहरण आहे. त्यामुळे मनोरंजन वाहिन्यांना जास्त प्रेक्षकसंख्या लाभते. त्यात त्या वाहिनीशी बांधील असणे ही गोष्टही त्या त्या वाहिनीसाठी फायदेशीर ठरते. भारतीय दूरचित्रवाणीवर ‘अ‍ॅक्टिव्ह प्रोग्रामिंग’ असलेल्या वाहिन्यांवर साठ टक्केच्या आसपासच नवा आशय पाहायला मिळतो. तोही फक्त प्राइम टाइमच्या वेळात, इतर वेळी पुनप्र्रसारित कार्यक्रमांचाच भरणा असतो. जुन्या काळात जसे डीडी नॅशनल किंवा सह्य़ाद्री वाहिनीवर वेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या वयोगटातील प्रेक्षकांचा विचार करून कार्यक्रम दाखवले जायचे, ते आता दिसत नाही. याला बदलती जीवनशैली हे एक कारण असलं तरी ते पुरेसं नाही.

हिंदीतील मनोरंजन (जीईसी) वाहिन्यांचा विचार करता स्टार प्लस, झी, कलर्स, सोनी टीव्ही, सब टीव्ही, अँड टीव्ही, स्टार भारत याच वाहिन्यांवर प्राइम टाइमला नवे कार्यक्रम दाखवले जातात. या वाहिन्यांवर प्राइम टाइम सोडून इतर वेळी कार्यक्रमांचं पुनप्र्रसारणच पाहायला मिळतं. त्याचबरोबर झी मराठी, स्टार प्रवाह, कलर्स मराठी, झी युवा, सोनी मराठी या वाहिन्यांवरही प्राइम टाइम सोडून इतर वेळेत तिच परिस्थिती असते. झी मराठीवरील सकाळचा ‘राम राम महाराष्ट्र’, दुपारी दाखवण्यात येणारा ‘आम्ही सारे खवय्ये’ या कार्यक्रमांचा अपवादवगळता आणि वाहिन्यांवर महिन्यातून किंवा दोन -तीन महिन्यातून एकदा दाखवला जाणारा नवा चित्रपट किंवा महाएपिसोड यांचा अपवाद वगळता तेच तेच कार्यक्रम पहावे लागतात. त्यामुळे वाहिन्यांना इतर वेळांकडे दुर्लक्ष करून यापुढे चालणार नाही. टेलिव्हिजन प्रोग्रामिंग काही गृहितकं धरून केलं जात असलं तरी दिवसभर माणसं घराबाहेर असतात, शनिवार, रविवार विकेंडला जातात. अशी ढोबळ गृहीतकं ठेवून चालणार नाही. त्यापेक्षा या वेळात नवं काय देता येईल, याचा विचार वाहिन्यांना करावा लागणार आहे. कारण प्रेक्षकांनी मोजक्याच सशुल्क वाहिन्या निवडल्यामुळे सर्फिंग करून दुसरी वाहिनीही बघता येणार नाही. त्यामुळे ज्या वाहिन्या निवडल्यात, त्यांच्यावर परिपूर्ण मनोरंजन मिळावं, अशी प्रेक्षकांची अपेक्षा असणार. कारण कुटुंबियांच्या वयोगटानुसार आणि त्यांच्या आवडीनुसार वाहिन्या निवडायच्या आहेत. शिवाय आता आपण महिन्याला जेवढे शुल्क भरतोय, त्यापेक्षा जास्त द्यायला लागू नये. हीसुद्धा किमान अपेक्षा असणार आहे. त्याचबरोबर ठरावीक वाहिन्या निवडून मासिक शुल्क कमी करण्याकडेही काही प्रेक्षकांचा कल असणार आहे.

अशा सगळ्या गोष्टी लक्षात घेता इथून पुढे वाहिन्यांची संख्या कमी होईल किंवा नव्या संकल्पना, विशिष्ट वयोगट, विशिष्ट विषय घेऊन नव्या वाहिन्याही दाखल होतील. काही वाहिन्यांच्या आता आहेत त्यापेक्षा किमतीही कमी होतील. पण या सगळ्यात आशय मागे पडता कामा नये, कारण आशयच प्रेक्षकांना आकर्षित करणार आहे. त्यामुळे वाहिन्यांसाठी हा कसोटीचा काळ असला तरी प्रेक्षकांच्याही जागरूकतेचा कस लागणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 3, 2019 12:53 am

Web Title: article about test tvs and audiences
Next Stories
1 ‘कथेमागचा दृष्टिकोन महत्त्वाचा’
2 गाण्याचं नाव..
3 ‘सोयरे सकळ’ : घनगर्द अरण्यात.. मूळांच्या शोधात!
Just Now!
X