News Flash

लुकलुकती गोष्ट!

दर एका चित्रपटाबरोबर लुक बदलत राहणं ही कलाकारांची गरजच बनली आहे, असं म्हटलं तर वावगं ठरू नये.

(संग्रहित छायाचित्र)

रेश्मा राईकवार

‘ठग्ज ऑफ हिंदुस्तान’ या यशराज प्रॉडक्शनच्या आगामी चित्रपटाचा प्रोमो आणि त्याची पत्रकार परिषद एकाच गोष्टीमुळे गाजली. या चित्रपटाचा प्रोमो ज्याक्षणी प्रदर्शित झाला, त्याक्षणी त्यातल्या कुठल्या गोष्टींवर जास्त चर्वितचर्वण झालं असेल तर ते चित्रपटातील कलाकारांच्या लुकवर. अमिताभ बच्चन, आमिर खान यांचे लुक्स हे ‘पायरेट्स ऑफ कॅरेबियन’ या हॉलीवूडपटातील व्यक्तिरेखांशी मिळतीजुळती असल्याची टीकाच समाजमाध्यमांवरून सुरू झाली. याच गोंधळात जी परिषद घेतली गेली त्यात आमिर खान हजर होताच अनेकांच्या भुवया उंचावल्या. विषय होता पुन्हा एकदा आमिरचा बदललेला लुक. हिंदी-मराठी किंवा प्रादेशिक भाषेतील कोणताही चित्रपट असो. तो ऐतिहासिक पट असो किंवा सध्याच्या कुठल्यातरी विषयावरचा चित्रपट असो, त्याची कथा काय यापेक्षाही उत्सुकता असते ती त्यातील मुख्य कलाकारांचा लुक कोणता आहे, मग तो लुक त्या कलाकाराने पूर्ण चित्रीकरणादरम्यान कसा सांभाळला इथपासून ते अगदी चित्रपट संपला की कलाकारांच्या तोंडून जसे हुश्श निघते.. तसाच काहीसा सूर प्रेक्षकांच्याही मुखी असतो. जसा तो ‘ठग्ज ऑफ हिंदुस्थान’च्या पत्रकार परिषदेतील आमिरचा बदललेला चेहरा बघून अनेकांच्या तोंडून व्यक्त झाला..

दर एका चित्रपटाबरोबर लुक बदलत राहणं ही कलाकारांची गरजच बनली आहे, असं म्हटलं तर वावगं ठरू नये. बरं याला कुठल्याच जॉनरचा चित्रपट अपवाद नाही. म्हणजे सलमान खान हरएक चित्रपटात काहीतरी वेगळीच भूमिका बजावतो असं नाही. मात्र ‘दबंग’ म्हटला तरी ‘चुलबुल पांडे’चं काहीतरी वेगळेपण असावं लागतं आणि ‘एक था टायगर’ दोनदा आला तरी छोटीशी का होईना दाढी ठेवावीच लागते. हल्ली चित्रपटांच्या कथा या बऱ्याचदा कानपूर, चंदेरी, लखनौ, बिहार, वाराणसी अशा देशाच्या कानाकोपऱ्यातून फिरत असल्याने वरुण धवन, राजकुमार राव, शाहीद कपूर, श्रध्दा कपूर, अलिया भट, आयुषमान खुराणा अगदी अक्षय कुमारलाही बोली बदलावी लागते. गाव तसा वेश या नियमाप्रमाणे वेगळा अवतारही धारण करावा लागतो. ‘पॅडमॅन’मधला अक्षय कुमार ‘गोल्ड’मध्ये थोडा का होईना वेगळा भासतो. आमिर खान आणि अमिताभ बच्चन हे दोन कलाकार त्यांच्या अभिनयाइतकेच त्यांच्या लुकसाठी ओळखले जातात. कथेची गरज हे एक कारण असले तरी आमिरसारखा कलाकार चित्रपट पूर्ण होईपर्यंत त्याच लुकमध्ये वावरतो.

पूर्वी हे एकाच लुकमध्ये वावरणं एखाद-दुसऱ्या कलाकारापुरतेच असायचे. सेटवरून बाहेर पडले की एक केशरचना सोडली तर त्या अवतारात कलाकार दिसत नसत. मात्र आमिर, विद्या बालन आणि सध्या त्यांच्यात जोडले गेलेले तिसरे नाव म्हणजे रणवीर सिंग हे सेटच्या बाहेरही चित्रपटातल्याच लुकमध्ये वावरत असतात. विद्या बालन हिच्यावर याबाबतीत अनेकदा टीकाही झाली होती. मात्र मी जी व्यक्तिरेखा साकारते आहे, त्यात चित्रपट प्रदर्शित होईपर्यंत पूर्णपणे रममाण होणं मला आवडते. शिवाय, चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतर त्याच लुकमध्ये वावरल्याने आपोआपच चित्रपटाची प्रसिद्धी होते, असे विद्याने एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते. प्रसिद्धीचा हाच फंडा आमिरच्याही कायम लुकमध्ये वावरण्यात असतो.

सध्या निदान चित्रीकरण पूर्ण होईपर्यंत तरी तो लुक सांभाळणे ही कलाकारांची गरज होऊन बसली आहे. अनेकदा ऐतिहासिक चित्रपटातली किंवा वेगळी व्यक्तिरेखा साकारायची असेल तर त्या लुकमध्येच राहणे कलाकार स्वत:हून पसंत करतात. ‘बाजीराव मस्तानी’ किंवा ‘पद्मावत’सारख्या चित्रपटातील व्यक्तिरेखा साकारताना रणवीरने लुकच सांभाळला नव्हता तर ती व्यक्तिरेखा ठसावी यासाठी सेट वगळता सगळ्यांपासून दूर अज्ञातवास स्वीकारला होता. कलाकारांच्या भूमिका साकारण्याच्या आणि त्यासाठी लुकपासून साऱ्या गोष्टी सांभाळण्याच्या या पद्धती भल्याही वेगवेगळ्या असतील. मात्र खरोखरच शरीरयष्टी कमी-जास्त करणं, केशरचना यापासून अगदी कपडय़ांची स्टाईल सांभाळणं तेही चित्रपट पूर्ण होईपर्यंत ते सारे जपणे ही सध्या कलाकारांसाठी कसोटी ठरते आहे. ‘बाहुबली द बिगिनिंग’ ते ‘द कन्क्लुजन’ हा सलग चार वर्षांचा प्रवास प्रभास आणि राणा डुग्गुबाती या दोन कलाकारांनाही सांभाळावा लागला होता. प्रभासला या चार वर्षांत कुठलाच चित्रपट स्वीकारता आला नव्हता. या चार वर्षांत त्याला त्याच्या लुकमध्ये सर्वात जास्त त्रास देणारी गोष्ट कोणती होती, असे विचारल्यावर त्याने माझे लांब केस, असे उत्तर दिले होते. ‘बाहुबली’चे चित्रीकरण पूर्णपणे संपल्यानंतर त्याने पहिल्यांदा जाऊन केस कापले होते आणि मिशी उडवल्याची आठवणही सांगितली.

मराठीतही सध्या अनेक कलाकार लुकसाठी झगडताना दिसतात. ‘वजनदार’ चित्रपटासाठी सई ताम्हणकर आणि प्रिया बापट या दोघींनी वाढवलेले वजन, त्यानंतर ते वजन उतरवण्यासाठी खूप संयम ठेवावा लागला होता आणि सातत्याने ते डाएट, फिटनेसचं रुटीनही त्यांना सांभाळावे लागले होते. त्याही आधी ‘नटरंग’साठी अभिनेते अतुल कुलकर्णी यांनीही अशाच प्रकारचे परिश्रम घेतले होते. अभिनेता सुबोध भावे हे सध्याचे उदाहरण. त्याचा ‘तुला पाहते रे’ या मालिकेतील लुक सध्या लोकप्रिय झाला आहे. त्यामुळे हा लुक सांभाळण्याची त्याला कसरत करावी लागते आहे. या मालिकेमुळे दुसरे कुठलेच काम आपण घेतलेले नाही, असेही त्याने सांगितले.

लुक सांभाळणं ही कलाकारांसाठी जिकिरीची गोष्ट खरी. मात्र सतत स्टाईल स्टेटमेंट बदलत असणारे, आपल्या लुकसाठी, फॅशनसाठी कायम चर्चेत असणाऱ्या शाहीद कपूर, राजकुमार राव यांच्यासारख्या आजच्या तरुण कलाकार मंडळींना ते फारसे किचकट वाटत नाही. उलट स्टाईल स्टेटमेंट म्हणून आपला प्रत्येक लुक ते मिरवताना दिसतात. ‘पद्मावत’ चित्रपटातील महारावल रतनसिंग असेल किंवा अगदी आत्ता प्रदर्शित झालेल्या ‘बत्ती गुल मीटर चालू’ चित्रपटातील युवकाचा लुक असेल, तो लुक मिरवायला मला आवडते. इतर वेळीही कपडे आणि स्टाईलच्या बाबतीत सतत काहीतरी नवीन करत राहायला आवडते आणि चाहते ते फॉलो करत असल्यामुळे त्या सगळ्याला प्रसिद्धी मिळते, असे शाहीद म्हणतो.

आजचा चित्रपट आशयाच्या, मांडणीच्या बाबतीत जितका बदलतो आहे त्यानुसार या कलाकारांचा चित्रपटातील आणि चित्रपटाबाहेरचा वावरही बदलतो आहे. कथेनुसार येणारी वेशभूषा-केशभूषा ही गरज म्हणून सांभाळतानाच त्याला स्वत:चा असा काही ठसा उमटवत ते लोकप्रिय करण्यात आमिर खानपासून ते रणबीर कपूर, रणवीर सिंग, शाहीद कपूर, राजकुमार राव, वरुण धवन ही आताची मंडळी माहीर आहेत. त्यामुळे लुकची ही गोष्ट त्यांच्यासाठी कंटाळवाणी नाही तर त्यांना पुढे नेणारीच ठरते आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 30, 2018 12:47 am

Web Title: article about the look of artists in the film
Next Stories
1 ज्येष्ठांची वेबवाट
2 इथे निवारा ऊनसावली..
3 वेबवाला : रिलेशनशिप
Just Now!
X