जागतिक रंगभूमी दिवस ( ५ नोव्हेंबर) नुकताच साजरा झाला. या दिवसाचे औचित्य साधून तरुण रंगकर्मीचा रंगभूमीवर झालेला प्रवेश, रंगभूमीवरील त्यांचे अनुभव आणि प्रयोगादरम्यान रंगलेल्या किश्शांचा हा लेखाजोखा..

‘विरोधाभास’

गेली १५ वर्ष रंगभूमीवर सातत्याने नवनवीन प्रयोग करत आहे. गुजराती, हिंदी, मराठी या तिनही भाषांमधील नाटकांतून काम करते. सर्वाधिक ३९ पुरस्कारप्राप्त ‘संगीत देवबाभळी’ या नाटकाचा एक भाग असल्याचा मला सर्वाधिक आनंद आहे. नाटकाच्या लेखकाने केवळ मला समाजमाध्यमावर नाटकाची कल्पना दिली.  नाटकात माझी रुक्मिणीची भूमिका आहे. नाटकात विठ्ठलाच्या मूर्तीसमोर आवली उभी राहून शिव्या घालते असा एक प्रसंग आहे. एका प्रयोगाच्या वेळी विठ्ठलाची मूर्ती गदागदा हलू लागली. प्रसंगावधान राखत मी मूर्ती धरून ठेवली. आवली माझ्या नवऱ्याला शिव्या घालतेय, त्यामळे माझा पती विठ्ठल गदागदा हलतोय आणि पत्नी रुक्मिणी त्याला सांभाळून घेत आहे, असा विरोधाभास त्या प्रसंगादरम्यान घडला.

– मानसी जोशी

‘नाटकासाठी फर्ग्युसनमध्ये..’

शाळेत असताना बाईंनी इतिहासाच्या पुस्तकाच्या आधारे शिवाजी महाराज यांच्या जीवनावर तीन अंकी नाटक लिहिले होते. त्या नाटकात तरुण शिवाजीची भूमिका साकारली होती. ते माझं पहिलं नाटक. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर मी वैद्यकीय क्षेत्रात पाऊल ठेवण्यासाठी प्रवेश परीक्षा दिल्या.  कंटाळून वैद्यकीय शिक्षणाला रामराम ठोकून केवळ आणि केवळ नाटक करायला मिळेल म्हणून फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतला. पुढील तीन वर्षे अभ्यास, प्रात्यक्षिक, परीक्षा सगळं काही सांभाळून नाटक  केलं. पुरुषोत्तम करंडकमध्ये सलग तीन वर्ष सहभागी झालो. एकांकिकांमधून सहभागी होत अनुभवाचं गाठोडं पक्कं केलं आणि ‘स्ट्रॉबेरी’ या नाटकाद्वारे व्यावसायिक रंगभूमीवर प्रवेश केला. या नाटकातील एक प्रसंग न विसरता येण्यासारखा आहे. पश्चिम महाराष्ट्रात प्रयोग होता. प्रयोगाच्या सुरुवातीलाच माझ्या प्रवेशाच्या वेळी माझ्या चेहऱ्यावर प्रकाश टाकणाऱ्या स्पॉट लाइटची काच गरम होऊन फुटली आणि ती माझ्या समोर येऊन पडली. अतिशय गरम असणारी काच कारपेटवर पडल्यामुळे कारपेटमधून धूर येऊ  लागला. प्रयोगादरम्यान रंगमंचावर अचूक वेळ साधत ती गरम काच उचलली. प्रसंग सुरू असतानाच प्रसंगावधान राखून ती काच सेटच्या खिडकीतून बाहेर फेकून दिली. सुरुचीनेही प्रसंगावधान राखून मला पाण्याचा ग्लास आणून दिला आणि त्या पाण्यात पुढची पंधरा मिनिटे मी भाजलेली बोटं बुडवली

– सुयश टिळक

‘मागे वळून पाहताना’

पुण्यातील ‘जागर’ संस्थेच्या माध्यमातून पुढे आलो. ‘अब्राहम लिंकनचे पत्र’ हे माझं सर्वात पहिलं नाटक. महाविद्यालयात असताना अनेक एकांकिका स्पर्धामध्ये भाग घेतला.  महाविद्यालयात नाटक पाहण्यासाठी लोकांना पकडून आणायचो. नाटय़गृहात जबरदस्तीने बसवायचो. आता मात्र आमच्या ‘नाटक कंपनी’ची नाटकं दोन दिवसांत ‘हाऊसफुल्ल’ होतात. आम्ही मित्रमंडळींनी एकत्र येऊ न ‘नाटक कंपनी’ची सुरुवात केली.पूर्वी आम्हीच नाटक बसवायचो, लिहायचो, सेट डिझाइन करायचो. आता मात्र एक नाटक निर्माण करायचं झालं तर खूप मोठा चमू पुढे येतो हेच नाटक कंपनीचं यश आहे. लवकरच नवीन नाटकांची मेजवानी प्रेक्षकाना ंदेणार आहोत.

– आलोक राजवाडे

‘तो प्रसंग धन्य करणारा’

व्यावसायिक रंगभूमीवर माझी सुरुवात ‘एक शून्य तीन’ या नाटकापासून झाली. एका बिनधास्त विषयावर भाष्य करणाऱ्या या नाटकात भीती वाटेल अशी व्यक्तिरेखा होती. नाटकातील एका प्रसंगात एक व्यक्ती माझ्याशी गैरवर्तन करते, असा प्रसंग आहे. त्या प्रसंगाला दोन हात करताना माझ्याशी गैरवर्तन करणाऱ्या त्या व्यक्तीचा अत्यंत क्रूरतेने बदला घेते, असे दाखविले आहे. एका प्रयोगादरम्यान हा प्रसंग सुरू असताना उपस्थित प्रेक्षक पुरुषांनी ‘अरे असंच पाहिजे, असंच पाहिजे’ अशा जोरदार घोषणा दिल्या आणि टाळ्या वाजवायला सुरुवात केली. नाटकातील प्रसंग पार पडल्यानंतरही प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. एक स्त्री आणि एक अभिनेत्री म्हणून तो प्रसंग धन्य करणारा होता. भविष्यात रंगभूमीवर वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करणाऱ्या नाटकांत काम करण्याची इच्छा आहे.

– स्वानंदी टिकेकर

‘आणि माझा पाय भाजला..’

रंगभूमीवरील सुरुवात एकांकिका स्पर्धाच्या माध्यमातूनच झाली. इयत्ता ११वी ते १५वी अशी सलग पाच वर्ष मी निरनिराळ्या एकांकिका स्पर्धामध्ये भाग घेतला. अनुभवाचं गाठोडं पक्कं करत अनेक एकांकिका केल्या, भरघोस बक्षिसं मिळवली. ‘सवाई’सारखी स्पर्धा जिंकले. सध्या व्यावसायिक रंगभूमीवर माझं ‘अनन्या’ हे नाटक सुरू आहे. या नाटकातील ‘अनन्या’ची व्यक्तिरेखा माझ्यासाठी शारीरिक आव्हान देणारी आहे. नाटकात एक आग लागण्याचा प्रसंग आहे. त्यासाठी आम्ही धुपाचा धूर करतो. आमचा बॅकस्टेजचा दादा अचूक  वेळ साधून तो धूर रंगमंचावर सोडतो. एका प्रयोगाच्या वेळी नेहमीच्या दादाऐवजी दुसरा दादा होता. त्याने रंगमंचावर धूप ठेवला आहे याची मला कल्पनाच नव्हती. गडबडीत त्या धुपावरच पाय ठेवला आणि माझा पाय जबरदस्त भाजला. पुढच्या प्रसंगात मला पायावर जोर देऊनच काम करायचे होते. त्या भाजलेल्या पायाकडे अजिबात लक्ष न देता प्रयोग पूर्ण केला.

– ऋतुजा बागवे

‘आता प्रायोगिक रंगभूमीवर!’

नाटय़ शिबिरांमधूनच माझी रंगभूमीशी ओळख झाली. बालनाटय़ांच्या माध्यमातून रंगभूमीवर पाऊल पडलं. सगळ्यात पहिलं जे बालनाटय़ केलं त्यात मला संवादच नव्हते. एके दिवशी आमच्या संस्थेचं बालनाटय़ पाहायला गेलो होतो. त्या नाटकातील एक कलाकार गैरहजर होता. आयत्या वेळी त्याच्या जागी मला उभं केलं आणि तो प्रयोग प्रयोग पार पाडला. तेव्हापासून बालनाटय़ात मुख्य भूमिका मिळायला लागली. महाविद्यालयीन जीवनात अनेक एकांकिका स्पर्धामध्ये भाग घेतला, पारितोषिकं पटकावली. ‘समन्वय’ संस्थेत दाखल झालो. इंग्रजी प्रायोगिक रंगभूमीवरही कामं केलं. ‘अमर फोटो स्टुडियो’ हे आयुष्यातील महत्त्वाचं नाटक. नाटकात मी विविध भूमिका साकारतोय. एका प्रयोगाच्या वेळी पहिल्या रांगेत एक आजोबा येऊन बसले होते. नाटकातील प्रसंग एवढे भन्नाट आहेत की आपोआपच प्रेक्षकांकडून टाळ्या मिळतात. हे आजोबा उभे राहून टाळ्या वाजवत होते. नाटकातील एका गाण्यावर आजोबांनी रंगमंचाच्या जवळ येऊ न ठेकाही धरला. प्रायोगिक रंगभूमी ही नेहमीच माझ्या जिव्हाळ्याची असून लवकरच ‘नाटक कंपनी’च्या सहकार्याने प्रायोगिक रंगभूमीवर एक नवं कोरं नाटक घेऊन येण्याचा विचार आहे.

– अमेय वाघ

‘इटलीवर स्वारी’

दहावीच्या सुट्टीत ‘रंगभूमीवरील व्यक्तिमत्त्व विकास’ शिबिरात भाग घेतला होता. या शिबिरामुळे रंगभूमीची आवड निर्माण झाली. पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतल्यावर तेथील रंगभूमीच्या पोषक वातावरणाचाही माझ्यावर प्रभाव पडला. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यावर आता पुढे काय करायचं? हा आमच्यासमोर प्रश्न उभा राहिला. तेव्हा आम्ही  सर्वानी मिळून पुण्यात ‘नाटक कंपनी’ची स्थापना केली. वेगवेगळी नाटकं या कंपनीतून घडू लागली. त्यातलंच एक धर्मकीर्ती लिखित ‘गेली एकवीस वर्ष’ हे नाटक. हे नाटक घेऊन आम्ही मुंबईतल्या थेस्पो फेस्टिव्हलला गेलो. ज्यात ते सर्वाच्या पसंतीस उतरलं. तुम्ही हे नाटक घेऊन इटलीतील युवा महोत्सवाला का जात नाही?, अशी विचारणा झाली. आम्ही त्या महोत्सवासाठी अर्ज भरला. आमच्या नाटकाची निवडही झाली. महाराष्ट्र शासनाच्या मदतीने आणि हितचिंतकांच्या साहाय्याने आम्ही इटलीला गेलो, नाटकाचा प्रयोग केला. जगभरातून आलेल्या नाटकांमधून आम्हाला- आमच्या नाटकाला ‘सर्वोत्कृष्ट परीक्षक पुरस्कार’ मिळाला. इटलीला जाण्याच्या आधी आम्ही इटलीतीलच एका महोत्सवासाठी अर्ज केला होता. त्या महोत्सवासाठीही आमची निवड झाल्याची बातमी आम्हाला इटलीहून परतल्यावर मिळाली. आम्ही पुन्हा इटलीला गेलो. एकाच वर्षांत दोन वेळा इटलीवर स्वारी केली.

– सायली फाटक