मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबतचे आक्षेपार्ह व्यंगचित्र फॉरवर्ड केल्याच्या कारणावरुन, मुंबईतील माजी नौदल अधिकारी मदन शर्मा यांना शिवसैनिकांकडून मारहाण करण्यात आली होती. याप्रकरणी सहा शिवसैनिकांना अटक देखील करण्यात आली. दरम्यान या घटनेवर अभिनेत्री रतन राजपूत हिने संताप व्यक्त केला आहे. “जर आज आपल्यासोबत बाळासाहेब ठाकरे असते तर अशी घटना घडलीच नसती. आम्ही खऱ्या वाघाला मिस करतोय.” अशा आशयाची पोस्ट लिहून तिने या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. रतनची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

अवश्य पाहा – कंगना हिमाचलला परतली, जाता जाता पुन्हा मुंबईबद्दल बोलली

अवश्य पाहा – “अंकितावर आरोप करुन प्रसिद्धीचा प्रयत्न सुरु”; शिबानीच्या टीकेवर अपर्णाचं प्रत्युत्तर

निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांनी ‘व्हॉट्स अ‍ॅप’वर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबतचे कथित आक्षेपार्ह व्यंगचित्र प्रसारित केले होते.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यापुढे हात जोडून उभे आहेत, अशा आशयाचे हे चित्र होते. शिवसेना शाखाप्रमुख कमलेश कदम यांनी त्याबाबत मदन शर्मा यांना दूरध्वनी करून जाब विचारला. त्यानंतर कदम आपल्या कार्यकर्त्यांसह शर्मा यांच्या कांदिवली येथील इमारतीखाली गेले आणि शर्मा यांना घराबाहेर बोलावून मारहाण केली. यात शर्मा यांच्या डोळ्याला जखम झाली. हा सर्व घटनाक्रम इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळील सीसीटिव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाला आहे.

वयोवृद्ध नौदल अधिकाऱ्याला शिवसैनिकांनी मारहाण केल्याची दृष्ये शनिवारी वृत्तवाहिन्यांवरून झळकताच त्याचे पडसाद उमटले. शिवसेनेच्या सुरुवातीच्या दिवसांतील कॉम्रेड कृष्णा देसाई खून खटल्यातील आरोपापासून ते नंतरच्या काळात अनेक पत्रकार, साहित्यिक, कलावंत यांच्यावरील हल्ले-शाब्दिक चकमकी यांमुळे शिवसेना हा हिंसेचा अवलंब करणारा प्रतिक्रियावादी पक्ष म्हणून ओळखला जातो. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आक्रमक शिवसेनेला विद्यमान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मधल्या काळात मवाळ स्वरूप दिल्याने पक्षाची प्रतिमा बदलली होती. आधी कंगना राणावत प्रकरण आणि आता माजी नौदल अधिकाऱ्याला मारहाण केल्याच्या प्रकरणामुळे निषेधाचे सूर उमटू लागले आहेत. शिवसेना पुन्हा ठोकशाहीकडे वळत असल्याची चर्चा सुरू झाली.