मराठी चित्रपटसृष्टीत नावजलेल नाव म्हणजेच अवधूत गुप्ते. गायक, संगीत दिग्दर्शक, परीक्षक अशा वेगवेगळ्या भूमिकांमधून अवधूत गुप्ते नेहमीच प्रेक्षकांच्या भेटीला येतो. प्रेक्षकांना नेहमीच काही तरी हटके देण्याचा प्रयत्न अवधूत करत असतो. विशेष म्हणजे यावेळी तो एक रॅप साँग घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

अवधूतच्या या नव्या गाण्याचं नाव ‘जात’ असं आहे. या गाण्यातील रॅपमधून त्याने जातीय व्यवस्थेवर आपले विचार मांडले आहे. या गाण्यातून माणुसकी हीच खरी जात आहे हा संदेश देण्यात आला आहे. संवेदनशील विषय या गाण्यातून सादर करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

या गाण्याला नेटकऱ्यांनी चांगलाच प्रतिसाद दिला आहे. या गाण्याचे गीतकार समीर सावंत आहेत. तर, संगीतकार विक्रम बाम आहेत. अवधूतचं ‘ऐका दाजीबा’, ‘मधुबाला’ अशी अनेक गाणी गाजली आहेत. ‘झेंडा’, ‘कान्हा’, ‘बॉइज’, ‘रेगे’, ‘जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा’, ‘मोरया’ असे त्याचे अनेक चित्रपट गाजलेले आहेत.