07 March 2021

News Flash

चित्र रंजन : मूक ‘आवाज’

दिग्दर्शक राज आर. गुप्ता यांचा दिग्दर्शक म्हणून ‘बाबा’ हा पहिलाच चित्रपट आहे

(संग्रहित छायाचित्र)

रेश्मा राईकवार

बाबा

आवाज ऐकताही येत नाही आणि तोंडातूनही निघत नाही, अशांचा संवाद हा खरोखरच बोलका असतो. अपंगत्वामुळे असलेल्या सगळ्या शारीरिक मर्यादांवर मात करून एकमेकांशी बोलण्याची, एकमेकांचा आधार होण्याची, आपले असे विश्व उभे करण्याची इच्छा, जिद्द यामुळे त्यांच्या त्यांच्यातीलच असेल पण ते मूक आवाजाचे विश्व मोठे बोलके  असते. हा संवाद मुळात समजून घेणे हेच सामान्य माणसाचे आव्हान असते, ‘बाबा’ या चित्रपटात दिग्दर्शकाने हे बोलके विश्व पडद्यावर अक्षरश: जिवंत केले आहे.

दिग्दर्शक राज आर. गुप्ता यांचा दिग्दर्शक म्हणून ‘बाबा’ हा पहिलाच चित्रपट आहे, याआधी त्यांनी हिंदी चित्रपटांसाठी साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. दिग्दर्शनातील त्यांचे अनुभवी असणे चित्रपटातही प्रतिबिंबित झाले आहे. कथा-पटकथा त्यांची नसली तरी या कथेतून नेमके काय दाखवायचे आहे, याची स्पष्टता असल्याने मूक-बधिर जोडप्याची ही गोष्ट रंगवताना दिग्दर्शकाने अगदी बारीकसारीक तपशिलांचा विचार क रून ती पडद्यावर मांडली आहे, हे जाणवल्याशिवाय राहत नाही. चित्रपटाच्या सुरुवातीलाच आपल्याला रंगीबेरंगी कागदातून समोरच्या विश्वाचे बदलते रंग पाहणारा छोटा शंकर (आर्यन मेघजी) दिसतो. शंकरचा रंगलेला खेळ, त्याचे घरी येऊन आईशी (नंदिता पाटकर) खेळणे, कामावरून घरी आलेल्या वडिलांना (दीपक दोब्रियाल) बिलगणे.. हे सगळे कुठल्याही सामान्य घरात नेहमी दिसणारे आनंदी दृश्य इथेही दिसते. काहीच खटकत नाही. या तिघांमधला संवाद इतका सहजसुंदर आहे की तिथे आवाजच नाही आहे, याची जाणीवच आपल्याला होत नाही. माधव आणि आनंदी दोघांनाही ऐकू येत नाही, बोलता येत नाही आहे, हे आपल्याला एव्हाना कळलेले असते. आवाज नसला म्हणून या तिघांचे काही बिघडलेले नाही, ते त्यांच्या छोटय़ाशा विश्वात पुरेपूर रमले आहेत.

जत्रा पाहिली की तिथे नेण्याचा शंकरचा हट्ट, त्याचा हट्ट पुरवण्यासाठी एकीकडे माधवची तयारी तर दुसरीकडे शंकरला त्याचा हट्ट योग्य नाही म्हणून नजरेने, खुणांनी दटावणारी आई.. त्या तिघांचेही कष्टाचे असले तरी हसरे-खेळकर आयुष्य शांत-संथ प्रवाहासारखे पुढे चालले आहे. या प्रवाहात राजन आणि पल्लवी (अभिजीत खांडकेकर – स्पृहा जोशी) यांच्या येण्याने खळखळ माजते. आजवर ज्या आवाजाची उणीवच त्यांना भासत नव्हती, तीच त्यांची गरज बनते. शंकरला आपल्यापासून दूर जाऊ न देण्याची धडपड करताना माधवचा कस लागतो. त्यावेळी खरे म्हणजे प्रेक्षक म्हणून आपल्याला पहिल्यांदा जाणीव होते की शंकरला आवाज आहे. माधव आणि आनंदीसारखा शंकर मूक नाही. पण त्या दोघांबरोबर नेहमीच्या आवाजाच्या दुनियेपासून दूर शांततेत राहिलेल्या शंकरला बोलणे काय हेच माहिती नसल्याने त्याचे आवाजी विश्व शांत आहे. या शांततेचा ओरखडा माधव-आनंदीच्या मनावर उमटतो जेव्हा त्यांच्या मूक-बधिर असण्यामुळे ते शंकरचे संगोपन करू शकत नाहीत, यावर शिक्कामोर्तब करण्यासाठी सगळे आसुसलेले असतात. माधवची धडपड, त्या तिघांचे आनंदी विश्व आणि शंकरची त्यांच्याप्रति असलेली ओढ या सगळ्यातून दिग्दर्शकाने ‘बाबा’ची गोष्ट उभी केली आहे.

इतक्या ताकदीची कथा साकारण्यासाठी सक्षम कलाकारच हवेत. या चित्रपटात लहानमोठय़ा सगळ्याच भूमिकांमध्ये उत्तम कलाकार असल्याने अभिनयाच्या बाबतीत चित्रपट वरचढ ठरला आहे. अर्थात, सगळ्यात जास्त भार हा दीपक दोब्रियाल आणि शंकरची भूमिका करणाऱ्या आर्यन मेघजी या बालकलाकारावर आहे. या दोघांनीही बापलेकातील हे नाते खूप सुंदररीत्या साकारले आहे. दीपक दोब्रियाल यांचा हिंदीतील अनुभव आणि तिथला त्यांचा दबदबा प्रेक्षकांना माहिती आहे. त्यामुळे मराठीतही त्यांच्या अभिनयाची तीच किमया अनुभवता येईल का, हा साहजिक प्रश्न होता. अर्थात, हिंदूीत जे करायला मिळत नाही त्याची कसर इथे मुख्य भूमिकेत त्यांनी चांगलीच भरून काढली आहे. कुठलेही मोठे कलाकार नाहीत, तथाकथित ग्लॅमर नाही. अशावेळी हातात आलेल्या या उत्तम व्यक्तिरेखेचे त्यांनी सोने केले आहे. आर्यन, नंदिता या दोघांनीही कुठलेच संवाद नसताना हे छोटेखानी आनंदाचे घर अभिनयातून उत्तम उभे केले आहे. माधवचा मित्र म्हणून चित्तरंजन गिरी यांनीही उत्तम अभिनय केला आहे. याशिवाय, जयवंत वाडेकर, जयंत गाडेकर यांच्या छोटय़ा व्यक्तिरेखाही लक्षात राहतात. त्या तुलनेत अभिजीत खांडकेकर, स्पृहा जोशी आणि शैलेश दातार यांना फार वाव नाही, त्यांनी त्यांच्या व्यक्तिरेखा त्याच सहजतेने साकारल्या आहेत.

‘बाबा’ या चित्रपटात दिग्दर्शकाच्या मांडणीइतकाच पाश्र्वसंगीताचाही मोलाचा वाटा आहे. संवाद नसताना ही कथा प्रवाहीपणे पुढे नेण्याचे काम रोहन-रोहन यांच्या पाश्र्वसंगीताने केले आहे. ‘बाबा’ ही अशी कुठल्याही चौकटीतील गोष्ट नाही. तो जगण्याचा एक वेगळा अनुभव आहे. ‘आहे रे’ वर्गाचा ‘नाही रे’ लोकांकडे बघण्याचा एक ठरावीक दृष्टिकोन असतो. ज्यांच्याकडे शारीरिक, आर्थिक क्षमताच नाही ते पुढे जाऊ शकणार नाहीत, हे समीकरणही याच ठरावीक दृष्टिकोनातून उतरलेले आहे. अनेकदा त्यातील फोलपणा जाणवून देण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागतो. हा संघर्ष जसा या चित्रपटातून पाहायला मिळतो. ठोकताळ्यांपलीकडे असणारे प्रेमाचे घट्ट नाते आहे जे इथे माधव आणि शंकरमध्ये आहे. इथे माधवच्या तोंडी संवाद आहे की बोलता येत नसले तरी शंकरला जे हवे आहे ते आम्ही मनाने ओळखतो. हाच मनाचा संवाद प्रेक्षकांशी घडवून आणणारा असा हा अनुभव आहे.

* दिग्दर्शक – राज आर. गुप्ता

* कलाकार – दीपक दोब्रियाल, नंदिता पाटकर, आर्यन मेघजी, चित्तरंजन गिरी, अभिजीत खांडकेकर, स्पृहा जोशी, जयवंत वाडेकर, शैलेश दातार आणि जयंत गाडेकर.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 3, 2019 12:26 am

Web Title: baba marathi movie review abn 97
Next Stories
1 Photos : अभिजीत बिचुकलेची पत्नी ‘बिग बॉस’च्या घरात
2 संजय दत्तचा ‘बाबा’ दाखवला जाणार ‘गोल्डन ग्लोब्ज’मध्ये
3 अखेर सनी लिओनीने मागितली त्या तरुणाची माफी
Just Now!
X