‘ऐश्वर्या राय माझी आहे’, असा दावा करणाऱ्या एका तरुणाने सध्या अनेकांचेच लक्ष वेधले आहे. आंध्रप्रदेश येथील २९ वर्षीय संगीत कुमार याने हा दावा केला आहे. मुख्य म्हणजे जोवर ऐश्वर्याबद्दल खरी माहिती मिळत नाही तोवर आपण आंध्रप्रदेशला जाणार नसल्याचेही संगीतने म्हटले आहे.

ऐश्वर्याविषयी असे वक्तव्य करणारा संगीत सध्या अनेकांचे लक्ष वेधतोय खरा. पण, फक्त ऐश्वर्याच नव्हे तर, इतरही सेलिब्रिटींविषयी काही विचित्र दावे करण्यात आले होते. किंबहुना त्यामुळे सेलिब्रिटींविषयी चुकीच्या चर्चांनाही उधाण आल्याचं पाहायला मिळाले होते.

शाहरुखची अनोळखी आई…
बॉलिवूडचा किंग शाहरुख खान आपला मुलगा असल्याचा दावा एका महिलेने केला होता. ‘न्यूज बाइट्स’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार १९९६ मध्ये महाराष्ट्रातील लातूर येथील एका महिलेने शाहरुख आपला मुलगा असल्याचे म्हणत तो हरवला असल्याचेही ती म्हणाली होती. शाहरुखवर आपला हक्क सांगत तिने न्यायालयातही धाव घेतली होती.

मीरा राजपूत शाहिद कपूरची पहिली पत्नी नव्हे…
हे आम्ही नाही, तर एका चाहत्याने म्हटले होते. इतकेच नव्हे, तर दिवंगत अभिनेता राज कुमार यांची मुलगी वास्तविका हिने २०१२ मध्ये शाहिदची पत्नी असल्याचा दावा केला होता. ती जागोजागी शाहिदचा पाठलाग करत होती, त्याच्या इमारतीखाली बराच वेळ उभी राहायची. शेवटी शाहिदने तिच्याविरोधात पोलीस तक्रार दाखल केली होती.

अभिषेक बच्चनच्या लग्नाच्याच दिवशी तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता…
बच्चन कुटुंबियांच्या भोवतीसुद्धा चर्चा आणि वादांचं वर्तुळ पाहायला मिळालं आहे. २००७ मध्ये मॉडेल जान्हवी कपूर हिने अभिषेक- ऐश्वर्याच्या लग्नाच्याच दिवशी त्यांच्या घराबाहेर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. ऐश्वर्यासोबत अभिषेकचे लग्न होत असल्यामुळेच हे पाऊल उचलल्याचा दावा तिने केला होता.

धनुषला करावी लागली होती ‘डीएनए’ टेस्ट…
रजनीकांत यांचा जावई, प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता धनुषलाही अशा विचित्र परिस्थितीचा सामना करावा लागला होता. तामिळनाडू येथील आर.कथिरेसन आणि के.मीनाक्षी या जोडप्याने धनुषचे खरे आई-वडील असल्याचा दावा केला होता. धनुष आमचाच मुलगा आहे, असे म्हणत त्यांनी न्यायालयात दाद मागितली होती. त्यांचे म्हणणे खोटे आहे असे म्हणत धनुष मात्र आपल्या भूमिकेवर ठाम होता.