आशुतोष गोवारीकर यांचा बहुचर्चित ‘पानिपत : द ग्रेट बेट्रेयल’ हा चित्रपट शुक्रवारी (६ डिसेंबर) प्रदर्शित झाला. १७६१ साली अहमद शाह अब्दाली व मराठे यांच्यात झालेल्या युद्धावर हा चित्रपट आधारित आहे. या चित्रपटामध्ये संजय दत्त अहमद शाह अब्दालीच्या भूमिकेत असून अर्जुन कपूरने सदाशिवराव भाऊ यांच्या रुपात झळकला आहे.
या चित्रपटामध्ये संजय दत्त, क्रिती सेनॉन आणि अर्जुन कपूरचा लूक साऱ्यांचंच लक्ष वेधून घेत आहे. विशेष म्हणजे चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच या कलाकारांचे लूक प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले होते. त्यामुळेच या कलाकारांचा मेकअप किंवा सीन कसे चित्रीत झाले याचा व्हिडीओ अर्जुनने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या व्हिडीओमधून बिहाइन्ड द सीन नेमके कसे होते हे दिसत आहे.
या चित्रपटामध्ये संजय दत्तने त्याच्या शरीरयष्टीकडे विशेष लक्ष दिलं होतं. तर अर्जुनने त्याच्या लूकवर जोर दिला होता. तसंच क्रितीनेदेखील अभिनयाकडे लक्ष दिल्याचं दिसून येत आहे. इतकंच नाही तर या तिघांनी त्यांच्या भूमिकेला न्याय देण्यासाठी किती मेहनत घेतली हे शेअर केलेल्या व्हिडीओमधून स्पष्टपणे दिसत आहे.
दरम्यान, ‘पानिपत’चे तिसरे युद्ध होऊन आता अडीचशे वर्षे उलटली असली तरी अजूनही ‘पानिपत’ हा मराठी माणसाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. हाच विषय अत्यंत भव्यदिव्य स्वरुपात मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न दिग्दर्शक आशुतोष गोवारीकरांनी केला आहे.