अभिनेता सलमान खानच्या आगामी ‘भारत’ या चित्रपटाचा फर्स्ट लूक पोस्टर नुकताच प्रदर्शित झाला आहे. सलमानने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा पोस्टर शेअर केला असून यामध्ये वाघा बॉर्डरवर सलमान आणि कतरिना उभे असल्याचं पाहायला मिळत आहे. अली अब्बास जफर दिग्दर्शित हा चित्रपट त्याच्या कथानकासाठी विशेष चर्चेत आहे. सलमान आणि कतरिना याआधी अली अब्बास जफरच्याच ‘टायगर जिंदा है’ चित्रपटात एकत्र झळकले होते.

या पोस्टरमध्ये वाघा बॉर्डरवर भारतातून पाकिस्तानकडे पाहत सलमान आणि कतरिना उभे आहेत. वाघा बॉर्डरवर चित्रीकरणाची परवानगी नसल्याने पंजाबमधील लुधियाना इथं वाघा बॉर्डरसारखा सेट उभारून त्याचं शूटिंग करण्यात आलं.

https://www.instagram.com/p/BqL-mCBA932/

वाचा : ‘शाहरुखचं लग्न झाल्याचं कळताच मी खूप रडले’

२०१४ साली प्रदर्शित झालेल्या “Ode To My Father” दक्षिण कोरियन चित्रपटावर भारत आधारलेला आहे. ‘भारत’ चित्रपटात रशियन सर्कस आणि अन्य काही साहसी दृश्य पाहायला मिळणार आहेत. प्रियांका चोप्रानं काही दिवसांपूर्वीच ‘भारत’ला तडकाफडकी सोडचिठ्ठी दिली होती. तेव्हापासून हा चित्रपट चर्चेत होता. ‘भारत’मध्ये दिशा पटानी, कतरिना कैफ, नोरा फतेही, तब्बू, सुनील ग्रोव्हर असे अनेक कलाकार पाहायला मिळणार आहेत. २०१९ मध्ये ईदच्या दिवशी भारत प्रदर्शित होणार आहे.