बॉलिवूड दबंग खान सलमान खान आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांचा बहुप्रतिक्षीत ठरलेला ‘भारत’ हा चित्रपट बुधवारी (५ जून) ईदच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच सलमानची पाच वेगवेगळी रुप प्रेक्षकांना पाहता आली. त्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांचं मन जिंकण्यास यशस्वी ठरला आहे. चित्रपटाची कथा भारत (सलमान खान) या व्यक्तीच्या भोवती फिरतांना दिसते. यामध्ये भारतच्या तारुण्यावस्थेपासून वृद्धावस्थेपर्यंतचा काळ रंगविण्यात आला आहे. त्यासोबतच या चित्रपटामध्ये तगडी स्टारकास्ट झळकली आहे.

१९४७ सालच्या फ्लॅशबॅकमध्ये रंगविण्यात आलेल्या या चित्रपटामध्ये भारताचं होणारं विभाजन, त्या काळातील जनतेची परिस्थिती आणि साऱ्यामध्ये भारतचं खुलणारं प्रेम आणि त्याच्या जीवनाशी सुरु असलेला संघर्ष रंगविण्यात आला आहे. चित्रपटाच्या पूर्वार्धामध्ये भारताचं विभाजन चित्रीत करण्यात आलं आहे. यावेळी भारत (सलमान खान) एका सर्कसीमध्ये स्टंटमॅन म्हणून काम करत असतो. या सर्कसीमध्ये तो अनेक साहसदृश्यदेखील करत असतो. बाहेर देशात सुरु असलेली परिस्थिती आणि भारतच्या आयुष्यावर त्याचा होणारा परिणाम यावर हे चित्रीत करण्यात आलं आहे. त्यातच सर्कसी दरम्यान, त्याचं त्याच्या मैत्रिणीसोबत (दिशा पटानी) खुलणाऱ्या प्रेमावरही प्रकाश टाकण्यात आला आहे. त्यानंतर उत्तरार्धामध्ये १९७० चा काळ रंगविण्यात आला आहे. या उत्तरार्धामध्ये तेल निर्यात कंपनीमध्ये काम करणाऱ्या कुमुद रैनाचा (कतरिना कैफ) प्रवेश होतो. सर्कसीमध्ये काम केलेला भारत त्याच्या मित्रासह(सुनील ग्रोव्हर) या तेल निर्यात कंपनीमध्ये कामास रुजू होतो. कधी काळी सर्कसमधील मैत्रिणीवर प्रेम करणारा भारत या नव्या कंपनीत आल्यानंतर कुमुदच्या प्रेमात पडतो आणि येथून चित्रपटाला खऱ्या अर्थाने सुरुवात होते. या दोघांचं प्रेम, भारताचं होणारं विभाजन, त्यातच त्याला पाच वेगवेगळी रुप का साकारावी लागतात हे प्रेक्षकांना चित्रपट पाहिल्यानंतरच लक्षात येईल. त्यामुळे प्रेक्षकांना हे सारं जाणून घेण्यासाठी चित्रपट पाहावा लागणार आहे.

दरम्यान, या चित्रपटामध्ये रोमान्स, सस्पेन्स, इमोशनल सीन या साऱ्यांचा भरणा करण्यात आला आहे. त्यासोबतच चित्रपटामध्ये उत्तमरित्या सेटची उभारणी करण्यात आली आहे. चित्रपटातील प्रत्येक सीनला साजेशा गाण्यांचादेखील यात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे या चित्रपटाची रंगत प्रचंड वाढल्याचं दिसून येतं. चित्रपट दिग्दर्शक अली अब्बास जाफर यांनी या चित्रपटाला योग्य दिशा दिली आहे. त्यासोबतच चित्रपटातील तब्बू, दिशा पटानी, सुनील ग्रोव्हर, सोनाली कुलकर्णी, जॅकी श्रॉफ यांनीदेखील आपल्या भूमिकांना योग्य न्याय दिला आहे. विशेष म्हणजे पहिल्यांदाच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या सुनील ग्रोव्हरने प्रेक्षकांची मनं पहिल्या प्रयत्नात जिंकली आहेत.

स्टार : तीन स्टार