‘बिग बॉस’च्या घरातील वास्तव्यामुळे आपल्यात मोठ्याप्रमाणावर नैराश्य आणि रुक्षपणा आल्याची भावना नुकतीच ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडलेली स्पर्धक रेने ध्यानीने व्यक्त केली आहे. टीव्हीवरील ‘रोडीज’ या अशाच प्रकारच्या एका रिअॅलिटी शोद्वारे प्रसिध्दीच्या झोतात आलेल्या रेनेने ‘वाईल्ड कार्ड’ स्पर्धक म्हणून ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश मिळविला होता. ‘बिग बॉस’च्या घरात निभावून नेणे कठीण असल्याचे देखील तिने म्हटले आहे. ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडल्यावर वृत्तसंस्थेशी बोलताना ती म्हणाली, जवळजवळ अर्धा शो संपल्यानंतर मी ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश केला होता. घरातील सर्वांना त्यांचे त्यांचे मित्र मिळाले होते आणि कोणीही माझ्याशी जुळवून घेण्याच्या मन:स्थितीत नव्हते. ‘बिग बॉस’च्या घरात फोन आणि टीव्हीप्रमाणेच माझ्यासाठी मित्रदेखील नव्हते. हे सर्व फारच निराशाजनक होते. प्रत्येक दिवसागणिक माझ्यात एकटेपणाची भावना निर्माण होत होती.
‘रॉडीज’मधील आक्रमक आणि फटकळ व्यक्तिमत्त्वासाठी प्रसिद्ध असलेल्या रेनेने ‘बिग बॉस’च्या घरात आपल्यातील या व्यक्तिमत्वाचे दर्शन घडविले नाही. कदाचित ‘बिग बॉस ८’मधील आपल्या शांत व्यक्तिमत्वामुळे आपण शोमधून बाहेर पडल्याचे रेनेचे मानणे आहे. या विषयी ती म्हणाली, याआधी ‘रोडीज’ या रिअॅलिटी शोमध्ये मी भाग घेतला होता. त्या शोमधील माझा आक्रमकपणा प्रेक्षकांनी पाहिला होता. जेव्हा मी घरात प्रवेश केला, तेव्हा माझ्यातील आक्रमकपणा आणि फटकळपणा पाहायला मिळेल असे प्रेक्षकांना वाटत होते. परंतु, तसे काहीच झाले नाही. मला वाटते, त्यामुळेच मला ‘व्होट आऊट’ व्हावे लागले. घरात मित्र न बनवू शकलेल्या रेनेचे घरातील अन्य स्पर्धक उपेन पटेलशी चांगले संबंध जुळले होते. उपेन विषयी बोलताना ती म्हणाली, उपेनवर माझा क्रश होता. उपेन हा एक चांगला माणूस आहे… तो खूप शांत आणि संयमी आहे. घरातील गडबड गोंधळापासून स्वत:ला दूर ठेवणे तो पसंत करतो. खरोखर त्याच्याबरोबर माझे चांगले संबंध जुळले होते. ‘बिग बॉस ८’ चा विजेता कोण होईल या प्रश्नाचे उत्तर देताना ती म्हणाली, प्रितम हा खूप चांगला माणूस आहे. मला वाटत की, त्याच्यासारखी एखादी व्यक्ती ‘बिग बॉस ८’ची विजेते व्हावी, अशी प्रेक्षकांची अपेक्षा असणार.