चित्रपटसृष्टीमध्ये काही कलाकारांचं नाव घेताच त्यांची संपूर्ण कारकीर्द आपल्या डोळ्यांसमोर उभी राहते. अशा कलाकारांच्या यादीत येणारं एक नाव म्हणजे अभिनेता आमिर खान. ‘रंगीला’, ‘परफेक्शनिस्ट’ ते ‘हानिकारक बापू’ अशा वेगवेगळ्या रुपांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या या अभिनेत्याची बात काही औरच. आजवर त्याने साकारलेल्या विविध भूमिका आणि वागण्याबोलण्याच्या त्याच्या अंदाजाने प्रेक्षकांच्या मनावर नेहमीच राज्य केलं आहे.

मुख्य म्हणजे प्रत्येक वेळी आमिरने त्याच्या भूमिकांनी प्रेक्षकांना थक्क केलं आहे. आव्हानात्मक पण तितकेच प्रभावी कथानकांचे चित्रपट, त्याचं संवादकौशल्य आणि सहकलाकारांसोबतची त्याची ऑनस्क्रीन केमिस्ट्री असं सारंकाही अगदी ‘परफेक्ट’ असल्यामुळे हा अभिनेता बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ म्हणून ओळखला जाऊ लागला. अशा या अभिनेत्याविषयीच्या काही गोष्टी मात्र अनेकांच्याच नडरेआड राहिल्या. चला तर मग नजर टाकूया अशाच काही खास गोष्टींवर…

Panipat : ‘पानिपत’चा थरार रुपेरी पडद्यावर येण्यास सज्ज

*शालेय दिवसांमध्ये आमिरला लॉन टेनिस या खेळात रस होता. शालेय पातळीवर आयोजित करण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय लॉन टेनिस स्पर्धांमध्ये त्याने अनेकदा आपल्या शाळेचं प्रतिनिधीत्वंही केलं होतं. रॉजर फेडरर हा त्याचा आवडता टेनिसपटू.

*वयाच्या १६ व्या वर्षी आमिरने आदित्य भट्टाचार्य (बासू भट्टाचार्य यांचा मुलगा) या मित्रासोबत ‘पॅरानोइया’ (Paranoia) नावाचा एक मूकपट तयार केला होता. यासाठी डॉ. श्रीराम लागू यांनी त्याला आर्थिक मदत देऊ केली होती.

*’अवांतर’ नावाच्या एका ग्रुपमध्ये आमिर जवळपास दोन वर्षे बॅकस्टेज आर्टिस्ट म्हणून काम करत होता. त्यानंतर वडिलांच्या विरोधात जाऊन त्याने आपला मोर्चा अभिनयाकडे वळवला.

*आमिरची पहिली फिचर फिल्म म्हणजे म्हणजे केतन मेहता सोबतचा होळीवर आधारित तयार करण्यात आलेला एक माहितीपट. एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांनी हा माहितीपट साकारला होता ज्यात आमिरने काम केलं होतं.

*पहिल्या फिचर फिल्ममधील श्रेयनामावलीत त्याच्या नावाचा उल्लेख आमिर हुसैन खान असा करण्यात आला होता. आशुतोष गोवारिकरनेही यात महत्त्वाची भूमिका साकारली होती.

*रिना दत्ता आणि आमिर खान यांची भेट १९८४ मध्ये झाली होती. १९८६ मध्ये जावेद मियाँदाद यांनी शारजामध्ये शेवटच्या चेंडूवर षटकार मारला होता अगदी त्याच दिवशी आमिर आणि रिनाने लग्न केलं होतं.

*कमी निर्मिती खर्चात साकारण्यात आलेल्या कयामत से कयामत तक हा चित्रपट कमी निर्मिती खर्चात साकारण्यात आल्यामुळे या चित्रपटाचे पोस्ट लावण्याचे कामही आमिरने केले होते. राज झुत्शी आणि आमिर खान या दोघांनी मिळून बस आणि ऑटोरिक्षावर हे पोस्टर चिकटवण्याचे काम केले होते.

*’कयामत से कयामत तक’च्या चित्रीकरणापासून आमिर आणि अभिनेत्री जुही चावला यांच्यात मैत्री झाली. पण, ‘इश्क’ चित्रपटाच्या वेळी मात्र त्यांच्या मैत्रीत मीठाचा खडा पडला, ज्यानंतर त्यांच्या मैत्रीची समीकरणं बदलली.

*पुरस्कार सोहळ्यांना सहसा हजेरी न लावणारा आमिर त्याच्या विरोधात आहे असं नाही. पण, १९९० मध्ये त्याच्याऐवजी सनी देओलला ‘घायल’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार देण्यात आला. तेव्हापासून त्याने पुरस्कार सोहळ्यांपासून दूर राहणं पसंत केलं. त्यावेळी आमिरला ‘दिल’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता या विभागात नामांकन मिळालं होतं.

*’हिंदुस्तान टाइम्स’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार आमिरची पत्नी किरण राव हिच्यामते त्याला ‘इटिंग डिसऑर्डर’ आहे. अंघोळ करण्यातही त्याला फारसा रस नसतो.