ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर सध्या एका महत्त्वाकांक्षी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहेत. ‘द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ या चित्रपटातून ते भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची व्यक्तीरेखा साकारताना दिसणार आहेत. या चित्रपटातील त्यांच्या लूकवरुन काही दिवसांपूर्वीच पडदा उचलण्यात आला होता, ज्यानंतर आता खुद्द अनुपम खेर यांनी या चित्रपटातील आणखी दोन महत्त्वाच्या भूमिकांवरुन पडदा उचलला आहे.

अर्जुन माथूर आणि आहाना कुम्रा यांच्या भूमिकांवरुन त्यांनी पडदा उचलला असून, ते दोघंही यात अनुक्रमे राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्या भूमिकेत झळकणार आहेत. खेर यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन याविषयीची माहिती दिली.

वाचा : ३०८ मुलींवर छाप पाडण्यासाठी संजय दत्तनं वापरली ‘ही’ युक्ती

प्रियांका गांधींच्या भूमिकेत दिसणारी आहाना कुम्रा अनेकांचच लक्ष वेधत आहे. काही काळासाठी मनमोहन सिंग यांचे माध्यम सल्लागार असलेले संजय बारू यांच्या पुस्तकावर हा चित्रपट आधारित असेल. २०१४ साली झालेल्या निवडणूकीपूर्वी ‘द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर: द मेकिंग अॅण्ड अनमेकिंग ऑफ मनमोहन सिंग’ या पुस्तकाचे बारू यांनी अनावरण केलं होतं.