लॉकडाउनच्या काळात स्थलांतरित कामगारांची मदत केल्याने चर्चेत आलेला अभिनेता सोनू सूद याने बिहारमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे. बिहारमधील लोकांना सरकारने केलेलं काम योग्य वाटत असल्याने त्यांनी पुन्हा संधी दिली असावी असं सोनू सूदने एनडीटीव्हीशी बोलताना म्हटलं आहे. भारतातील लोकांना जास्त अपेक्षा असतात यामुळे अनेकदा ते दुसरी संधी देतात असंही त्याने सांगितलं आहे.
“लोकांना काहीतरी योग्य दिसलं असावं. भारतातील लोकांना फार अपेक्षा असतात आणि ते कधीतरी तुम्हाला दुसरी संधी देतात किंवा तिसरी संधीही देतात. आपलं आयुष्य अजून चांगलं व्हावं असं त्यांना वाटत असतं,” असं सोनू सूदने म्हटलं आहे. बिहारमध्ये जवळपास १८ तासांच्या मतमोजणीनंतर १२३ जागांसह एनडीएला स्पष्ट बहुमत मिळाल्याचं सिद्ध झालं. भाजपाला ७४ जागा मिळाल्या असताना नितीश कुमार यांच्या जेडीयू पक्षाला मात्र फक्त ४३ जागांवर विजय मिळवता आला.
सोनू सूदने लॉकडाउनच्या काळात मुंबई तसंच महाराष्ट्रातील इतर ठिकाणी अडकलेल्या अनेक स्थलांतरित मजुरांनी बिहार, उत्तर प्रदेशमधील त्यांच्या गावी पोहोचवण्यास मदत केली. ”बिहारमधील अनेक लोकांशी मी जोडला गेलो आहे. शिक्षण किंवा पायाभूत सुविधांबद्दल जेव्हा कधी चर्चा केली जाते तेव्हा स्थिती वाईट असल्याचं लक्षात येतं,” असं सोनू सूदने म्हटलं आहे.
“कोण जिंकलं हे महत्वाचं नसून पाच वर्षांनी बिहार बदलला असेल हे महत्वाचं आहे. विश्वास ठेवून सत्तेत आणलेल्या सरकारचा त्यांना अभिमान वाटला पाहिजे हे महत्वाचं आहे,” असं मत सोनू सूदने व्यक्त केलं आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 12, 2020 1:29 pm