दिग्दर्शक संजय लीला भन्साळी आणि सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी यांनी गुरुवारी ‘पद्मावती’ चित्रपटाचा वाद सोडवण्याच्या दृष्टीने खासदारांच्या समितीची भेट घेतली. खासदारांच्या समितीपुढे भन्साळींनी आपली बाजू मांडत ‘पद्मावती’ हा चित्रपट कवितेवर आधारित असून, त्यातून इतिहासाची मोडतोड केलीच नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.

पद्मावती चित्रपटावरुन निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर संजय लीला भन्साळी यांनी गुरुवारी खासदारांचा समावेश असलेल्या संसदीय समितीची भेट घेतली. ‘टाइम्स नाऊ’ने दिलेल्या वृत्तानुसार जवळपास अडीच तास चाललेल्या या चर्चेमध्ये भन्साळींवर चित्रपटाविषयी प्रश्नांचा मारा करण्यात आल्याचे समजते. पण, ‘पद्मावती’ हा चित्रपट कोणत्याच ऐतिहासिक घटनेवर आधारित नसून ‘पद्मावत’ या कवितेवर आधारला असल्याचे त्यांनी समितीसमोर स्पष्ट केले. सन १५४० मध्ये सूफी कवी मलिक मोहम्मद जायसी यांनी ही कविता रचली असून, त्यावरच चित्रपटाचे कथानक आधारित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

अनुराग ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली ३० सदस्यांच्या संसदीय समितीसमोर ‘पद्मावती’च्या वादावर चर्चा करण्यात आली. या समितीमध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, परेश रावल, राज बब्बर यांचा समावेश होता. यावेळी समितीकडून भन्साळींना विविध प्रश्न विचारण्यात आले. चित्रपटाचे पोस्ट प्रॉडक्शन पूर्ण झालेले नसतानाही तो सेन्सॉरपुढे कसा पाठवण्यात आला, चित्रपटाच्या नावे कोणता संदर्भ इतिहासात नमूद करण्यात आला होता का, आणि आला असल्यास तुम्ही इतिहासाची मोडतोड केली नाही असे कसे म्हणू शकता, असे बरेच प्रश्न भन्साळींना विचारण्यात आल्याचे समजते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वाचा : ‘पद्मावती’ चित्रपटाचा दुसरा ट्रेलर लवकरच प्रदर्शित होण्याची शक्यता

भारताबाहेर या चित्रपटाला हिरवा कंदील मिळाल्यामुळे चित्रपट सेन्सॉरने प्रमाणित करण्यापूर्वीच तो युरोपमध्ये पाठवण्यात आला होता का, असा प्रश्नही त्यांना विचारण्यात आला. पण, चित्रपटाचे कथानक एका कवितेवर आधारल्याचे म्हणत भन्साळींनी अनेकांनाच धक्का दिला. त्यामुळे निदान आतातरी या चर्चेतून चित्रपटाला फायदा होतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.