सिनेमा ही अतिशय उत्कट प्रक्रिया अाहे. सिनेमा आपल्या जगण्याशी निगडीत असला तरी अाज प्रेक्षकांनी जाती-पातींच्या पलिकडे जाऊन सिनेमा पाहण्याची गरज आहे असल्याचे मत चित्रपट दिग्दर्शक सचिन कुंडलकर यांनी व्यक्त केले. ते ‘बुकशेल्फ’ युट्यूब चॅनेलच्या पहिल्या वर्धापनदिनानिमित्त अायोजित करण्यात अालेल्या ‘तुमच्या-अामच्या जगण्यातला सिनेमा या परिसंवादामध्ये बोलत होते. त्यांच्या सोबतीने चित्रपट समीक्षक गणेश मतकरी अाणि नाट्य दिग्दर्शक मनस्विनी लता रविंद्र यांनी सिनेमाच्या वर्तमान स्थितीकडे मार्मिक कटाक्ष टाकला.
दादरच्या ‘ब्राम्हण सेवा मंडळा’त पार पडलेल्या त्या परिसंवादात तिन्ही प्रमुख पाहुण्यांनी सिनेमा अाणि मानवी जगणे या विषयावर उहापोह केला. त्यामध्ये भारतीयांची मानसिकता, त्यांचा सिनेमाकडे पाहण्याचा दृष्टीकोन अाणि त्यावरून नुकत्याच घडलेल्या अस्वस्थ करणाऱ्या घटना अशा अनेक मुद्द्यांचा समावेश होता. पटकथालेखक अमोल उदगीरकर कार्यक्रमात संवादकाच्या भूमिकेत होते.
मनस्विनी यांनी चित्रपट माध्यमाच्या प्रवासाचा उल्लेख करताना सिनेमा दर दहा वर्षांनी कसा बदलत गेला ते उदाहरणांसह सांगितले. त्या म्हणाल्या, की सिनेमात सध्या जाणवणारा बदल आशादायी आहे, कारण तो मानवी जीवन अाणि समाज रचना यांच्या पातळीवर अधिक सूक्ष्मतेकडे जाणारा आहे. सध्या फिल्ममेकर्स विशिष्ट भूमिका घेत असल्याकडे लक्ष वेधताना मनस्विनी म्हणाल्या, की अनेकदा फिल्ममेकर्समध्ये स्वत:च्या कलाकृतीबद्दल प्रौढीची भावना असते. ते चित्र बदलण्याची गरज त्यांनी अधोरेखीत करताना सिनेमा जितका वैयक्तिक पातळीवर येऊन भाष्य करेल तितका तो लोकांना जास्त भावेल असे मनस्विनी यांनी सांगितले.
चर्चा कधी गंभीरतेकडे झुकत होती, तर कधी मान्यवरांच्या मार्मिक वाक्यांनी हशा अाणि टाळ्यांचा अावाज प्रेक्षागृहात घुमत होता. प्रेक्षकांमध्ये प्रकाशक-लेखक रामदास भटकळ, सुप्रसिद्ध इंजिनीयर नीळकंठ श्रीखंडे, ‘थिंक महाराष्ट्र’चे संपादक दिनकर गांगल, चित्रपट दिग्दर्शक अमित राय, प्रभात चित्र मंडळाचे सचिव संतोष पाठारे अाणि काही लेखक मंडळी अशा मान्यवरांसह सुमारे शंभरएक प्रेक्षक उपस्थित होते. ‘बुकशेल्फ’च्या कार्यक्रमाच्या फेसबुक लाईव्हला पाचशे अॉनलाईन प्रेक्षक हजर होते.
चित्रपट समीक्षक गणेश मतकरी म्हणाले, की सोशल मिडिया हे उत्तम माध्यम आहे. चर्चा होण्यासाठी, प्रतिक्रिया मिळण्यासाठी किंवा संवाद टिकून राहण्यासाठी फेसबुकसारख्या माध्यमाचा चांगला उपयोग होत असला तरीही त्या माध्यमाच्या मर्यादा लोकांनी ओळखायला हव्यात. त्यानंतर बोलताना सचिन कुंडलकर यांनी, सोशल मिडियाचा मर्यादेपलिकडे वापर करणाऱ्यांसाठी फेसबुक हा आजार आहे, असे मी मानतो असेही स्फोटक विधान केले.
परदेशातील सिनेमात पौराणिक कथांच्या संदर्भात अनेक सिनेमे घडतात. मात्र भारतीय संस्कृतीत पौराणिक कथांचे स्थान मोठे असूनही अापल्याकडे ती गोष्ट वापरली का जात नाही असा प्रश्न अमोल उदगीरकर यांनी विचारला. त्याला उत्तर देताना कुंडलकर यांनी, ‘‘सिनेमाची अवस्था पाहता अाता पौराणिक सिनेमेच बनवावे लागतील’’ असा मार्मिक टोला हाणला अाणि प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यास उत्स्फूर्त दाद दिली.
कुंडलकर पुढे म्हणाले, की सिनेमा आवडणं आणि न आवडणं ही स्वाभाविक प्रक्रिया आहे. त्यामुळे सिनेमा न आवडण्याची मोकळीक प्रेक्षकाने स्वत:ला द्यायला हवी. चित्रपट न पाहता त्याबद्दल भाष्य करणारे अनेक जण आहेत. मात्र अशाप्रकारे कलाकृतीचा आस्वाद न घेता त्याबद्दल बोलणे योग्य नाही अशी खंतही सर्वांनी व्यक्त केली. ‘बुकशेल्फ’ चॅनेलच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात विदर्भाचे कवी मोहन शिरसाट यांच्या ‘नाही फिरलो माघारी’ या ‘ग्रंथाली’ प्रकाशन निर्मित कवितासंग्रहाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात अाले. चित्रपट विषयक परिसंवादानंतर ‘बुकशेल्फ’ने ‘डेट्रिपर’ या इंग्रजी ग्राफिक नॉव्हेलचा परिचयात्मक व्हिडीयो पडद्यावर दाखवला. लवकरच तो ‘बुकशेल्फ’ चॅनेलवर प्रसारित करण्यात येणार असल्याचे ‘बुकशेल्फ’कडून सांगण्यात अाले.
साहित्य आणि सिनेमा – माध्यमांतर
साहित्याचे सिनेमात होणारे माध्यमांतर या मुद्द्यावर बोलताना कुंडलकर म्हणाले, ‘‘माध्यमांतर करणे हे आव्हानात्मक काम आहे. कारण त्यामध्ये अनेक गोष्टींचे भान ठेवावे लागते. दिग्दर्शकाला कथा वाचताना दिसलेला सिनेमा दाखवण्याची हौस असते. दिग्दर्शकाच्या मेंदूला दृश्यात्मकतेची ओढ असते. मात्र कोणत्या कादंबरी किंवा कथेचा सिनेमा होऊ शकतो याचे भान दिग्दर्शकाला असायला हवे. कुंडलकर यांनी ह्रषिकेश गुप्ते यांच्या दंशकाल या कादंबरीचा उल्लेख करत ती कादंबरी पडद्यावर मांडणे फार अवघड असल्याचे मत मांडले.