सध्या मराठी चित्रपटसृष्टीमध्ये अनेक नवीन प्रयोग होताना पाहायला मिळत आहेत. असाच एक वेगळ्या धाटणीचा प्रयोग ‘कॅपेचिनो’ या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचा संगीत अनावरण सोहळा नुकताच मुंबईत मोठ्या दिमाखात अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांच्या हस्ते पार पडला. यावेळी चित्रपटातील कलाकार, तंत्रज्ञ आणि चित्रपटसृष्टीतील मान्यवर मंडळी आवर्जून उपस्थित होते. अविनाश विश्वजीत यांनी सादर केलेल्या एकाहून एक सरस म्युझिकल परफॉर्मन्सनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
शिव कदम आणि विश्वजित यांनी लिहिलेल्या गीतांना संगीतकार अविनाश, विश्वजित या तरुण जोडीने हटके म्युझिक दिले असून, या चित्रपटात एकूण चार वेगळ्या ढंगाच्या गाण्यांचा आस्वाद रसिकांना घेता येणार आहे. “थोडीशी स्वीट स्वीट शुगर”…. असे बोल असलेले चित्रपटाचे शीर्षक गीत सुप्रसिद्ध गायक शान यांच्या सुमधुर आवाजात रेकॉर्ड करण्यात आले आहे. “तू दर्दे दिल”… हे गाणे साहिल कुलकर्णी या नव्या दमाच्या तरुणाने गायले असून या चित्रपटाच्या माध्यमातून पार्श्वगायक म्हणून साहिलने सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे. गायिका आनंदी जोशी आणि फरहाद भिवंडीवाला यांच्या आवाजात चित्रपटातील ‘कधी कधी गुणगुणावे’…. हे रोमॅण्टिक गाणे स्वरबद्ध करण्यात आले आहे.
‘कॅपेचिनो’ चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत प्रथमच एक वेगळा प्रयोग करण्यात आला असून, गायिका शिखा अजमेरा हिच्या आवाजात “अलीफिया अलीफिया” हे एक अरेबिक प्रकारातले संगीत असलेले गाणे रेकॉर्ड करण्यात आले आहे. अभिनेत्री मानसी नाईक आणि अभिनेता संजय नार्वेकर यांच्यावर सदर गाणे चित्रित करण्यात आले आहे.
या चित्रपटाच्या निमित्ताने शिव कदम यांनी दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले असून, ‘कॅपेचिनो’ या चित्रपटासाठी त्यांनी कथा, पटकथा, संवाद, गीतकार, दिग्दर्शन अशा पाचही भूमिका सांभाळल्या आहेत. चित्रपटाच्या संगीतावर आम्ही बारकाईने लक्ष दिले, तसेच निर्माते संतोष देशपांडे यांनी संगीतकार अविनाश-विश्वजीत यांना पहिल्यापासूनच स्वातंत्र्य दिले, त्यामुळेच चित्रपटातील गाणी ही उत्कृष्ट झाल्याचे शिव कदम यांनी सांगितले.
‘कॅपेचिनो’ हे नावच उत्कंठा वाढवणारे आहे. लाईफ इज लाईक ‘कॅपेचिनो’ हे लक्षात ठेवून चित्रपटाचे संगीतही तितकेच उत्तम असले पाहिजे हे आम्ही आधीच ठरविले होते. त्यामुळेच इंडियन जॅझ, रोमॅण्टिक असे जॉनर आम्ही या चित्रपटात वापरले आहेत. अरेबिक म्युझिक स्टाईलचा आम्ही या चित्रपटात एक वेगळा प्रयोग केला असून, रसिकांनादेखील तो नक्कीच आवडेल असे संगीतकार विश्वजित यांनी सांगितले.
मुळातच संगीत घराण्यातील असल्यामुळे चित्रपाटाप्रमाणेच याचे संगीतदेखील उत्तम झाले पाहिजे यावर पहिल्यापासूनच आम्ही भर दिला होता. संगीतकार अविनाश-विश्वजीत यांनी उत्तम संगीत दिले असून सर्वांनाच ही गाणी आवडतील अशी आशा निर्माते संतोष देशपांडे यांनी व्यक्त केली.
लाईफ इज लाईक ‘कॅपेचिनो’ याभोवती चित्रपटाचे कथानक गुंफण्यात आले असून, आपले आयुष्य हे कॉफीप्रमाणेच थोडेसे गोड, कडू अशा दोन्ही गोष्टीनी युक्त असते हे या चित्रपटात दाखविले आहे. जितेंद्र जोशी, संजय नार्वेकर, मानसी नाईक, वर्षा उसगांवकर, मोहन जोशी, डॉ. गिरिश ओक, अनुजा साठे, विजू खोटे यांच्या या चित्रपटात भूमिका आहेत. एस. डी. मोशन पिक्चर्स निर्मित आणि शिव कदम दिग्दर्शित “एन ऐजलेस रॉमेडी” असलेला “कॅपेचिनो” हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.