व्यावसायिकता आणि दर्जेदार आशय अशी सांगड घालत चित्रपटनिर्मिती करणं हे शिवधनुष्य सध्या चित्रपटकर्मीना पेलावं लागतं आहे. गोष्ट आली की त्यातली पात्रं आली, लेखकाने सांगितलेली आणि दिग्दर्शकाने पाहिलेली ही गोष्ट कॅमेऱ्यासमोर जिवंत करताना त्याच ताकदीचे कलाकार शोधणं महत्वाचं असतं. त्यातही सातत्याने नवीने चेहरे, अभिनयाची वेगवेगळ्या प्रकारे गुणवत्ता, क्षमता असलेले कलाकार देशभरातून शोधून काढणं हे सोपं राहिलेलं नाही. एकेका भूमिकेसाठी हजारो ऑडिशन्स घेऊन नवे चेहरे शोधणारी कास्टिंगची दुनिया गेली अनेक र्वष वादविवाद आणि लैंगिक छळवणुकीसारख्या आरोपांना सामोरी जाते आहे. मात्र या क्षेत्रात नव्याने स्थिरावलेल्या कास्टिंग डिरेक्टर्सनी चित्रपट क्षेत्रातील अभिनयाच्या, दिग्दर्शनाच्या संकल्पनाच मुळातून बदलल्या असल्याने कास्टिंगची दुनियाही झपाटय़ाने बदलत चालली असल्याचं स्पष्ट केलं.

कास्टिंग डिरेक्टर्ससमोर सध्या सगळ्यात मोठं आव्हान कोणतं असेल तर ते नव्याने येत राहणाऱ्या आशयघन चित्रपटांसाठी तेवढय़ाच ताकदीचे कलाकार, नवनवीन चेहरे शोधून त्यांना ७० एमएमच्या पडद्यावर आणणं.. गेल्या दहा वर्षांमध्ये नायक-नायिकांपेक्षाही चरित्र कलाकारांसाठी मागणी सातत्याने वाढत चालली असल्याची माहिती ‘कास्टिंग बे’ची जोडगोळी अभिषेक बॅनर्जी आणि अनमोल अहुजा यांनी दिली. अभिषेक आणि अनमोल यांनी ‘नो वन किल्ड जेसिका’, ‘टॉयलेट एक प्रेमकथा’, ‘रेड’, ‘परी’, ‘बॉम्बे टॉकीज’, ‘स्टुडंट ऑफ द इअर टु’, ‘फिलौरी’, ‘सिक्रेट सुपरस्टार’ अशा अनेक नव्याजुन्या चित्रपटांसाठी कास्टिंग के ली आहे. आम्ही जेव्हा कास्टिंग डिरेक्टर म्हणून कामाला सुरुवात केली होती तेव्हा कुमुद मिश्रा, सीमा पहावा, झीशान काद्रीसारख्या कलाकारांनी चित्रपट क्षेत्रात नुकताच प्रवेश केला होता. आज ते प्रथितयश चरित्र कलाकार म्हणून नावारूपाला आले आहेत. आता या प्रस्थापितांशिवाय आणखी नवे चेहरे चरित्र कलाकार म्हणून शोधणं ही सध्याची गरज असल्याचं अभिषेक सांगतो. चित्रपट व्यावसायिक आहे की आशयघन यामुळे कास्टिंग डिरेक्टर्सना फरक पडत नाही, त्यांना कुठल्याही चित्रपटाच्या कास्टिंगसाठी घ्यावी लागणारी मेहनत सारखीच असते फार तर दोन्हीकडे कलाकार निवडताना दृष्टिकोनात फरक असू शकतो, असं अनमोल सांगतो. ‘व्हेंटिलेटर’ चित्रपटात सत्तरपेक्षा जास्त कलाकार निवडणाऱ्या कास्टिंग डिरेक्टर रोहन मापुस्करचंही हेच म्हणणं आहे. दिग्दर्शकाला नेमक्या कशा पद्धतीचे कलाकार हवे आहेत, हे समजून घेऊनच कास्टिंग डिरेक्टर्सना त्यांचं काम करावं लागतं, असं रोहन म्हणतो. अर्थात, रोहनसाठी ही पद्धत वेगळी आहे असं तो म्हणतो. रोहनने दिग्दर्शक राजेश मापुस्कर यांच्याबरोबर हिंदीत ‘थ्री इडियट्स’, ‘फरारी की सवारी’ अशा चित्रपटांसाठी कास्टिंग केलं आहे. राजेशची कामाची पद्धत वेगळी आहे. कथा लिहीत असतानाच त्यातल्या व्यक्तिरेखा आणि त्यात कोणता कलाकार फिट बसेल हे चित्र त्यांच्या नजरेसमोर असते. किंबहुना त्यांना डोक्यात ठेवूनच कथा लिहिली जात असल्याने फारशी अडचण येत नाही, असं रोहन सांगतो.

तर चित्रपटात कोणते कलाकार असावेत याचं नियंत्रण हे बऱ्याच अंशी दिग्दर्शकांवरच असतं, असं अनमोल स्पष्ट करतो. पूर्वी निर्माता सुचवतील ते कलाकार चित्रपटात असायला हवेत वगैरे प्रकार होते. आता तसं होत नाही. तुमची कथा पहिली महत्त्वाची ठरते, दिग्दर्शक कोण हेही तितकंच पाहिलं जातं, तुमचा चित्रपट कोणत्या प्रेक्षकांसाठी आहे याचाही विचार करावा लागतो. मुळात एखादा मोठा कलाकार तुमच्या चित्रपटात असला, चित्रपटनिर्मितीचं बजेटही मोठं असलं तरी इतर कलाकार कथेला सूट होणारे आहेत की नाहीत याचा विचार करावाच लागतो, असं अभिषेक सांगतो. दिग्दर्शक स्वत: या प्रक्रियेत सहभागी असतो. करण जोहरसारखा निर्माता, दिग्दर्शक असेल तर तो त्याची निर्मिती असलेल्या चित्रपटाच्या बाबतीतही तितकंच लक्ष घालतो आणि कलाकारांची निवड करतो, अशी माहिती ‘टॅलेंट नेक्स्ट’चे शेखर पुरोहित यांनी दिली. शेखर पुरोहित यांची ‘टॅलेंट नेक्स्ट’ ही कंपनी डिजिटली कास्टिंगचं काम पाहते. बॉलीवूडमध्ये सध्या अजय देवगण, सलमान खान, आमिर खान, अनुष्का शर्मा अशी अनेक कलाकार मंडळी चित्रपट निर्माता म्हणून स्थिरावली आहेत. त्यांची निर्मिती असलेल्या चित्रपटांमध्ये, त्यांची मुख्य भूमिका असली किंवा नसली तरी त्यांच्या जोडीला कोणता कलाकार असावा, याबद्दल त्यांची सूचना असू शकते. मात्र त्यांनी सांगितलेल्या कलाकारालाही ऑडिशन द्यावी लागते आणि तो ऑडिशनमध्ये खरा उतरला, लुक टेस्ट योग्य पद्धतीने पार पडली तरच त्या कलाकाराची निवड होते. त्यामुळे कलाकार मग तो आम्ही निवडलेला असेल किंवा दिग्दर्शक- निर्मात्याने सुचवलेला असेल त्याला निवडीची प्रक्रिया सारखीच असते. त्या कलाकारांवर चित्रपटांची भिस्त असल्याने तिथे फक्त अमक्याने सांगितलंय म्हणून निवड करून चालतच नाही, असं अभिषेक बॅनर्जी सांगतो.

कलाकारांनाही आता अभिनयाचं महत्त्व चांगल्या प्रकारे लक्षात आलं आहे, तुमच्याक डे चेहरा असून चालत नाही तर तुमच्यात अभिनय असावा लागतो. त्यामुळे तेही अवास्तव मागणी न करता उत्तम कलाकारांच्या शोधात असतात, असं अनमोल म्हणतो. उदाहरणच द्यायचं झालं तर ‘परी’मध्ये अनुष्का शर्माबरोबर परमब्रत चॅटर्जी हा बंगाली अभिनेता आहे. असे प्रयोग याआधी शक्य नव्हते. मात्र आता अशाच प्रकारे नायक-नायिकांचा शोध घ्यावा लागतो, असं तो सांगतो. तर कलाकारांच्या निवडीच्या बाबतीत ऑडिशनची प्रक्रिया खूप महत्त्वाची ठरते, असं रोहन सांगतो. ‘फरारी की सवारी’साठी आम्ही आमिर खान यांच्यासह शर्मन जोशी आणि आणखी १८ कलाकारांची नावं काढली होती. या चित्रपटात वडील आणि मुलगा यांची कथा होती. वडिलांच्या भूमिकेत या अठरामधील कोणते कलाकार सूट होतील, असा प्रश्न घेऊन आम्ही लोकांकडून सर्वेक्षण करून घेतलं. त्यात सर्वाधिक मतं ही शर्मनला मिळाली होती. त्या वेळी आम्ही क थेला जास्त महत्त्व दिलं, स्टार व्हॅल्यूचा विचार केला नाही आणि तो चित्रपट शर्मनकडे आला, असं रोहनने स्पष्ट केलं. तर चित्रपटातील मध्यवर्ती दोन व्यक्तिरेखा सोडल्या तरी इतर अनेक पात्रांसाठी चेहरे निवडायचे असतात आणि त्यासाठी तितकाच विचार करावा लागतो. ‘साधासाच प्रसंग आहे, रुग्णालयात एका परिचारिकेवर कॅमेरा आहे, पण कॅमेऱ्यासमोर जर ती परिचारिका आमिर खानशी बोलणार असेल तर अर्थातच तिचं दृश्य काही सेकंदाचं असलं तरी अभिनयाच्या बाबतीत तिचा दर्जा हा आमिरला शोभेल असाच असायला हवा. तिथे नुसते देखणे चेहरे देऊन चालतच नाही, असं अभिषेकने सांगितलं. तर चित्रपट, टीव्ही आणि वेबसीरिज अशा तीन माध्यमांसाठी मिळून अनेक कलाकारांचा शोध घ्यावा लागतो. पुरवठा करावा लागतो. त्यासाठी डिजिटल तंत्राचा वापर हा फायदेशीर ठरला आहे, असं शेखर पुरोहित सांगतात. करण जोहरच्या चित्रपटातील कलाकार निवडण्यासाठी मला त्यांच्या कार्यालयात जाऊन बसावं लागत नाही. मी कलाकारांच्या ऑडिशन्स ऑनलाइन मागवतो आणि त्यांच्यापर्यंत पोहोचवतो. त्यातून त्यांना ज्या ऑडिशन्स योग्य वाटतात त्या निवडून त्याची माहिती पुन्हा माझ्याकडे येते आणि माझ्याकडून त्या कलाकारांपर्यंत पोहोचतो. मी जगात कुठेही असलो तरी कोणासाठीही कास्टिंगचं काम करू शकतो आणि यात फसवणुकीचा संबंधही येत नाही, असं पुरोहित यांचं म्हणणं आहे. तर डिजिटल किंवा फेसबुक, इन्स्टाग्राम यामुळे कास्टिंगचं जग अधिक विस्तारलं आहे, असं अनमोल सांगतो. ‘नो वन किल्ड जेसिका’साठी राणी मुखर्जी आणि विद्या बालन हे दोन ओळखीचे चेहरे सोडले तर पूर्ण कलाकार हे दिल्लीच्या नाटय़विश्वातील होते ज्यांची निवड आम्ही फेसबुकच्या माध्यमातूनच केली असं तो सांगतो.

‘कास्टिंग’ हा शब्द उच्चारला तरी ‘कास्टिंग काऊच’ आणि अशी अनेक प्रकरणं लोकांच्याच काय नवोदित कलाकारांच्याही मनात येतात. लैंगिक छळवणूक ही आपल्या समाजातच आहे, पुरुषप्रधान संस्कृतीत आहे, त्यामुळे इतर कोणत्याही कार्यालयात घडतात अशा गोष्टी चित्रपटवर्तुळातही घडतात. अखेर हा शो बिझनेस आहे. मात्र यात दोन्ही बाजू महत्त्वाच्या ठरतात. कलाकारांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की, अशा अनैतिक गोष्टींतून जी कामं तुमच्यासमोर येतात ती व्यावसायिक नाहीत. त्यांचा दर्जा हा तसाच असतो, तुम्ही तो मार्ग निवडलात तर तुमची वाट घसरणीचीच असेल हे लक्षात घेतलं पाहिजे, असं अभिषेक बॅनर्जीने स्पष्ट केलं. तर रोहन मापुस्कर यांनी असे अनुभव आपल्याला आले नसले तरी या गोष्टी इंडस्ट्रीत आहेत हे स्पष्ट करतात आणि त्यासाठी कलाकारांनी सावधपणे, ठामपणे आपल्या भूमिकांची निवड केली पाहिजे, असं सांगितलं. एक इंडस्ट्री म्हणून सध्या कार्यरत असणारे कास्टिंग डिरेक्टर्स एकत्र येऊन एक पारदर्शक, व्यावसायिक व्यवस्था उभारण्याच्या प्रयत्नात आहोत, असेही अभिषेक-अनमोल यांनी सांगितले. येत्या काळात कास्टिंगची ही दुनिया डिजिटलच्या साथीने वेगाने बदलणार असून भविष्यात कलाकार आपल्या दिसण्यावर नाही तर अभिनयावर जास्त मेहनत घेतील. त्यामुळे उत्तम कलाकारांचा खजिनाच नजीकच्या भविष्यात खुला होणार असल्याचं सूतोवाचही या कास्टिंग डिरेक्टर्सनी केलं.