अनेक तरुण गुणी कलाकारांसाठी, आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा खूप महत्त्वाची भूमिका बजावत असतात. मराठी चित्रपटसृष्टी आणि  मालिकांना अशाच स्पर्धांतून आजवर अनेक कलाकार मिळाले आहेत. त्यातीलच एक गुणी आणि प्रतिभावान युवा अभिनेत्री म्हणजे शिवानी रांगोळे. शिवानी रांगोळे मुळची पुण्याची आहे. मागील वर्षी, लोकप्रिय मराठी मालिका ‘शेजारी शेजारी पक्के शेजारी’ मध्ये ती वैभव मांगले याच्या किशोरवयीन मुलीच्या भूमिकेत दिसली होती. याशिवाय अंकुश चौधरी व मुक्ता बर्वे अभिनित ‘डबल सीट’ चित्रपटातही ती छोट्याश्या भूमिकेत दिसली होती. शिवानीने सुजय डहाके याच्या ‘फ़ुंतरु’ चित्रपटातही महत्त्वाची भूमिका साकारली होती. तसेच, ‘& जरा हटके’ या प्रकाश कुंटे दिग्दर्शित चित्रपटात प्रमुख भूमिकेत ती दिसली होती. सध्या ती झी युवाच्या ‘बन मस्का’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे. गोड तितकिच चुलबुली आणि संवेदनशील असलेल्या शिवानीच्या क्रशबद्दल जाणून घेऊया..

माझं ऑल टाइम क्रश शाहरुख खानच आहे. मला त्याच्यासोबत कधी तरी काम करण्याची संधी मिळावी असं मनापासून वाटतं. नाहीतर निदान मी त्याला समोर बघू शकले किंवा त्याला Hi म्हणू शकले तरी ती माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट असेल. त्याची बायोग्राफी मी वाचली आहे. त्याची लव्हलाइफ, वैयक्तिक आयुष्य याविषयी अगदी सविस्तर त्या पुस्तकात लिहलेलं आहे. मला तो इतका पॅशनेट आणि रोमॅण्टिक वाटतो. मलाचं काय असं अनेक मुलींना त्याच्याबाबत वाटत असेल. मी ‘फुंतरू’ चित्रपट करत होते तेव्हा तिथे अर्चना म्हणून कॅमेरामन होती. त्यावेळी तिने मला शाहरुखबद्दल काही गोष्टी सांगितल्या. शाहरुखला त्याच्या चित्रपटासाठी काम करणा-या प्रत्येक व्यक्तीचं नाव माहितं असतं. सेटवर एखादी नवीन व्यक्ती आली तरी त्याचं नाव तो जाणून घेतो. विशेष म्हणजे तो प्रत्येक मुलीसोबत प्रेमाने वागतो आणि त्यांना आदर देतो. त्याची ही गोष्ट मला खूप आवडते. आपल्या ख-या आयुष्यात किंवा लव्ह लाइफमध्ये काहीही होत असतं. सतत बदल घडतं असतं. पण माझ्या आयुष्यात एक कायम आहे ती म्हणजे शाहरुखवरचं क्रश.

‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ हा शाहरुखचा चित्रपट माझा ऑल टाइम फेव्हरेट आहे. ‘दिलवाले..’ माझ्यासाठी चित्रपट नसून एक थेअरी आहे. मला आयुष्यात जो कोणी भेटेल किंवा माझ्या आयुष्यात जे काही घडेल ते या चित्रपटाप्रमाणे घडावं अशी माझं स्वप्न आहे. ज्याप्रकारे शाहरुख त्या अभिनेत्रीला पटवतो ते माझ्यासाठी फॅसिनेटींग होतं. त्यामुळे या चित्रपटाप्रमाणे माझ्याही आयुष्यात गोष्टी घडाव्यात असं माझं स्वप्न आहे.

चैताली गुरव, chaitali.gurav@indianexpress.com