एकिकडे विनोदवीर कपिल शर्मा विनोदाची फटकेबाजी करत असतानाच मराठीतही ‘चला हवा येऊ द्या’ या क्रार्यक्रमाच्या माध्यमातून निलेश साबळे आणि त्याची संपूर्ण टिम तितक्याच जोमाने रसिकांना खळखळून हसवण्यात यशस्वी होत आहे. या कार्यक्रमाच्या प्रत्येक भागानंतर पुढच्या भागामध्ये विनोदाची कोणती नवी खेळी पाहायला मिळणार याबद्दल रसिकांमध्ये नेहमीच उत्सुकता लागून राहिलेली असते. ‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर हे कलाकार जितकी धम्माल करतात तितकीच किंबहुना त्याहीपेक्षा जास्त धम्माल हे थुकरटवाडीचे कलाकार पडद्यामागे करतात. याचीच ग्वाही देणारा एक व्हिडिओ कुशल बद्रिकेने त्याच्या फेसबुक अकाऊंटवर शेअर केला आहे.

‘हवा येऊ द्याच्या नव्या स्किटची तालीम’, असे कॅप्शन देत कुशलने हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये कुशल आणि निलेश साबळे चक्क पिपाणी वाजवताना दिसत असून त्यांनी ‘सैराट झालं जी’ या गाण्याचा ठेका धरलेला पाहायला मिळतो. थुकरटवाडी, तेथील रहिवासी आणि तिथे येणारे पाहुणे सध्या प्रेक्षकांच्या कुटुंबाचा अविभाज्य भाग बनले आहेत. मराठी नाटक, चित्रपट, मालिकांसोबतच हिंदी चित्रपटांचेही तितक्याच हिरिरीने ‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर स्वागत केले जाते. येणाऱ्या प्रत्येक कलाकाराच्या अनुषंगाने ‘थुकरटवाडी’चा माहोल सजवला जातो, आणि त्यानुसारच निलेश साबळे अॅण्ड टिमची विनोदी शैली मंचावरील उपस्थितांची फिरकी घेते असेच म्हणावे लागेल.

निलेश साबळे, श्रेया बुगडे, भाऊ कदम, कुशल बद्रिके, भारत गणेशपुरे, सागर कारंडे आणि संपूर्ण टिम त्यांच्या ‘थुकरटवाडी’त आलेल्या प्रत्येक पाहुण्याच्या चेहऱ्यावर हसू उमटवण्यात नि:शंक यशस्वी होत आहे. छोट्या पडद्यावरील ‘चला हवा येऊ द्या’ या हास्यविनोदी कार्यक्रमाने केवळ मराठी मनातच नव्हे तर इतर भाषिक चित्रपट रसिकांच्या मनातदेखील स्थान मिळवले आहे. मराठी कलाकारांबरोबरच बॉलिवूडमधील शाहरुख खान, सलमान खान, अक्षय कुमार, जॉन अॅब्राहम, सोनम कपूर इत्यादी नामवंत मंडळींनीही त्यांच्या चित्रपटाच्या प्रसिध्दीसाठी ‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर उपस्थिती लावली आहे. या शोमधील हास्यफवाऱ्यांनी दर्शकांबरोबरच चित्रपटाच्या प्रसिध्दीसाठी आलेले कलाकारदेखील उपस्थितांसोबत हसूनहसून लोटपोट होतात.