‘पेस्तनजी’ या चित्रपटातून १९८८ सालच्या बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या खेर यांनी आपल्या दमदार अभिनयामुळे कलाविश्वात स्वत:च स्वतंत्र स्थान निर्माण केलं आहे. केवळ अभिनय हा ध्यास समजणा-या किरण यांनी पंजाबमधून अभिनयाला सुरुवात केली होती. एका लहानशा ठिकाणाहून अभिनयाची सुरुवात करणा-या किरण यांचा एक दिवस बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींमध्ये समावेश होईल असे त्यांनाही वाटलं नव्हतं. मात्र प्रचंड मेहनत आणि कामाप्रतीचे प्रेम यामुळे त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली आणि आपले स्थान अढळ केले. किरण यांनी ‘देवदास’, ‘हम तुम’, ‘वीर-झारा’, ‘फना’, ‘रंग दे बसंती’, ‘कभी अलविदा ना कहना’, ‘ओम शांती ओम’ असे अनेक यशस्वी हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका केल्या आहेत. अभिनयाव्यतिरिक्त त्यांनी राजकारणातही आपले नशीब आजमावल्याचे पाहायला मिळते. किरण यांनी त्यांच्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत. मात्र त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत फार कमी जणांना माहित आहे. त्त्यामुळे त्यांच्या जीवनाशी निगडीत अशा काही गोष्टी पुढीलप्रमाणे सांगता येतील.

१. बॉलिवूडमध्ये स्वतंत्र स्थान निर्माण केलेल्या किरण यांच्या जन्म १५ जून १९५५ साली चंदीगडमधील एका शीख कुटुंबामध्ये झाला. किरण यांनी त्यांचं शिक्षण पंजाब विद्यापीठातून पूर्ण केलं त्यानंतर त्यांनी चंदीगडमधूनच आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. अभिनयाची सुरुवात झाल्यानंतर त्यांच्यातील अभिनेत्री त्यांना स्वस्थ बसू देईना आणि आपल्या अभिनयाची जादू दाखविण्यासाठी त्यांनी थेट मुंबईची वाट धरली.

२. किरण खेर या एक हरहुनरी अभिनेत्री असण्याबरोबरच त्या एक उत्कृष्ट बॅटमिंटन खेळाडू आहेत. त्यांनी दिपिका पदुकोनचे वडील प्रकाश पदुकोन यांच्याबरोबर राष्ट्रीय स्तरावर बॅटमिंटनच्या स्पर्धा गाजविल्या आहेत.

३. किरण यांना दोन बहीणी आणि एक भाऊ असून त्यांच्या भावाचा २००३ साली एका दुर्घटनेमध्ये मृत्यू झाला. मात्र, या दु:खातून सावरुन त्यांनी २०१४ साली लोकसभा निवडणूक लढविली आणि चंदीगड मतदारसंघातून त्या लोकसभेवर निवडून आल्या.

४. बॉलिवूडमधील प्रसिद्ध व्यक्तीमत्व अनुपम खेर हे किरण खेर यांचे पती असून अनुपम खेर यांचे हा दुसरा विवाह आहे. अनुपम खेर यांचे पहिले लग्न गौतम बेरी यांच्याबरोबर झाले होते. मात्र लग्नाच्या काही वर्षातच त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आणि ते कायदेशीररित्या वेगळे झाले. त्यानंतर त्यांनी किरण यांच्याबरोबर लग्न केले. या दोघांना एक मुलगा असून सिकंदर खेर असं त्याचं नाव आहे.

५. १९७३ साली किरण यांनी असर प्यार दा या पंजाबी चित्रपटातून करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर पेस्तनजी या चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर किरण यांनी एकाहून एक उत्कृष्ट चित्रपट देण्यास सुरुवात केली. यामध्ये २००२ साली संजय लिला भन्साली यांच्या देवदास चित्रपटातील त्यांचा अभिनय विशेष गाजला. उत्कृष्ट अभिनय केल्यामुळे किरण यांना आतापर्यंत अनेक पुरस्कार प्रदान करण्यात आले आहत.

दरम्यान, ‘मंगल पांडे’, ‘रंग दे बसंती’, ‘वीर-जारा’, ‘देवदास’, ‘कर्ज’, ‘हम’, ‘मै हूं ना’, ‘दोस्ताना’, ‘सरदारी बेगम’, ‘कभी अलविदा ना कहना’, ‘मिलेंगे-मिलेंगे’, ‘कमबख्त इश्क’, ‘कुर्बान’, ‘फना’, ‘एहसास’, ‘अजब गजब लव’, ‘खूबसूरत’, ‘टोटल सियापा’ या सारखे अनेक चित्रपट त्यांनी केले असून  त्यांनी २००९ साली भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला होता. तसेच २०११ मध्ये त्यांनी अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनामध्येदेखील सहभाग घेतला होता.