News Flash

चिमुकल्या अहिल्याने साजरी केली अहिल्याबाई होळकर यांची २९६वी जयंती

बाल कलाकार अदिती जलतारे साकारतेय अहिल्याबाई होळकरांची भूमिका

३१ मे रोजी देशभरात अहिल्याबाई होळकरांची २९६ वी जयंती साजरी केली जातेय. अहिल्याबाई होळकर हे एक द्रष्टे व्यक्तिमत्व होते. त्यांनी आपल्या कर्तृत्वाने मोठ्या स्तरावर समाजोपयोगी कार्य करून एक उदाहरण घालून दिले. सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील पुण्यश्लोक अहिल्याबाई या मालिकेत छोट्या अहिल्याबाईंची भूमिका करत असलेली अदिती जलतारे या मालिकेतून बरेच काही शिकत आहे. अदिती अवघ्या ११ वर्षांची आहे.

अहिल्याबाईंची जन्मजयंती साजरी करत असताना अदितीने आपली कृतज्ञता व्यक्त केली आहे. ती म्हणते, “या मालिकेने मला कठोर परिश्रमाचे महत्त्व समजावले आहे. आपण जर न थकता, न खचता काम करत राहिलो, तर आज ना उद्या आपल्याला यश मिळतेच. अहिल्याबाई होळकर ही व्यक्तिरेखा साकारताना आणि समजून घेताना मी हा एक मोठा धडा शिकले आहे.”

अहिल्याबाई होळकरांचा प्रवास सोपा नव्हता. ज्या काळात सामाजिक रूढी आणि पुरुष प्रधानतेचा पगडा समाजमानसावर होता, त्या काळात अहिल्याबाईंनी आपल्या उदाहरणाने हे सिद्ध करून दिले की, मनुष्य त्याच्या कर्तृत्वाने मोठा होतो, जन्माने तो मुलगा किंवा मुलगी आहे, म्हणून नाही.

त्यांच्या नजरेत सर्व जण आणि सर्व काही समान होते.
अदिती पुढे म्हणते, “माझ्या दृष्टीने त्यांचा कनवाळूपणा, विनम्रता आणि त्यांच्या मनातील कृतज्ञतेची भावना हे त्यांचे गुण अत्यंत प्रेरणादायक आहेत. त्यांनी आयुष्यात जे जे साध्य केले त्याबद्दल मनात सदैव कृतज्ञतेची भावना होती. त्यांच्यात असलेला आणखी एक मोठा गुण म्हणजे, त्यांनी अत्यंत निखळ नजरेतून जगाकडे पाहिले. त्यांच्या नजरेत सर्व जण आणि सर्व काही समान होते. कोणत्याही पूर्व धारणा मनात बाळगून त्यांनी जगाकडे पाहिले नाही. निर्धाराने त्या मार्गक्रमण करत राहिल्या आणि आव्हानांना तोंड देत राहिल्या आणि असे करताना मनातील प्रेम, करुणा हे गुण त्यांनी हरवू दिले नाहीत. अहिल्याबाई होळकर एक प्रेरणादायक व्यक्तिमत्व आहे आणि माझ्या मनात त्यांच्याबद्दल नितांत आदर आहे.”

ahilyabai-holkar

चौंडी गावात जन्मलेल्या अहिल्याबाईंना माळव्याचे शासनाकर्ते मल्हारराव होळकर या पेशव्यांच्या सुभेदाराने आपला मुलगा खंडेराव याच्यासाठी बाल वधू म्हणून निवडले होते. अहिल्येचा समतावादी दृष्टिकोन, वेगळ्या पद्धतीने विचार करण्याची पद्धत आणि जिज्ञासू वृत्ती याने प्रभावित झालेल्या मल्हाररावांना तिची ज्ञान मिळवण्याची तळमळ जाणवली. त्यांनी तिची शिक्षणाची तहान भागवण्यासाठी सामाजिक रूढींना दाद दिली नाही आणि त्यांच्याही नकळत त्यांच्या राज्यासाठी नवीन, समर्थ वारस म्हणून तिला तयार केले.

अदिती शेवटी म्हणाली, “मी मोठी होईन तेव्हाही, मला वाटते हे शिकलेले धडे मी विसरणार नाही. आणि माझ्या जीवनातही त्यांचा अंगीकार करण्याचा प्रयत्न करीन.अहिल्याबाई होळकर ही व्यक्तिरेखा साकारल्यानंतर आणि त्यांचा प्रवास समजून घेतल्यानंतर मला ही गोष्ट प्रकर्षाने जाणवते आहे. या आठवणी आणि ही शिकवण माझ्या मनात कायम जिवंत राहील.”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 31, 2021 6:31 pm

Web Title: child actress aditi jaltare celebrated ahilyabai holkar 296 anniversary kpw 89
Next Stories
1 वैवाहिक जीवनातल्या तणावावर खुल्या मनाने व्यक्त झाला करण मेहरा
2 वडिलांच्या निधनानंतर संभावना सेठने रूग्णालयाला पाठवली नोटीस; म्हणाली, बेडला हात पाय बांधून ठेवले होते….
3 “दोन पावलं चालणं मुश्किल झालं होतं”; करोनामुळे मलायकाची झाली होती ‘अशी’ अवस्था
Just Now!
X