चिन्मय मांडलेकरला त्याच्या अभिनयाच्या कौशल्याइतकेच उत्कृष्ट लेखनासाठीही ओळखले जाते. ‘वादळवाट’ मालिकेपासून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केलेल्या चिन्मयने आतापर्यंत विविध ढंगांच्या भूमिकांमधून आपले अभिनयकौशल्य सिद्ध केले आहे. ‘तू तिथे मी’ या मालिकेतील सत्यजित मुधोळकर या चिन्मयने रंगवलेल्या व्यक्तिरेखेला प्रचंड प्रतिसाद मिळाला तरी टीके लाही सामोरे जावे लागले होते. मात्र, ही मालिका प्राइम टाइममध्ये असल्याने तिचे सादरीकरण रंजक पद्धतीने करावे लागले होते, असा खुलासा चिन्मयने केला आहे.
चिन्मय लवकरच ‘ई टीव्ही’वरील ‘तू माझा सांगाती’ या मालिकेतून तुकारामांच्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येणार आहे. याआधी चित्रपटांच्या माध्यमातून संत तुकारामांचा जीवनपट प्रेक्षकांसमोर मांडण्यात आला आहे. पुन्हा तोच विषय मालिकेद्वारे मांडण्यामागची संकल्पना आणि त्यात त्याने साकारलेले संत तुकाराम याबद्दल बोलताना चिन्मयने सांगितले की, आतापर्यंत चित्रपटांच्या माध्यमातून संत तुकारामांचे आत्मचरित्र मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पण ही मालिका फक्त संत तुकारामांवर आधारित नसून यात दोन माणसांच्या, त्यांच्या नातेसंबंधांबाबत भाष्य केले आहे. ही कथा तुकाराम आणि त्यांची दुसरी बायको आवली यांच्यातील नात्यावर आधारित आहे. एकीकडे तुकाराम आणि त्यांची विठ्ठलावर असलेली निस्सीम भक्ती, तर दुसरीकडे तुकाराम आणि आवलीच्या वैवाहिक जीवनातील ओढाताण, त्यांचे एकमेकांवरील प्रेम यावर या कथेचा गाभा अवलंबून आहे, असे चिन्मयने सांगितले.  नुकतीच सत्यजित मुधोळकरसारखी तापट भूमिका केल्यानंतर संत तुकारामांची संयमी भूमिका करणे चिन्मयच्या दृष्टीने सोपे नव्हते. ‘सत्यजित हा विद्रोही होता. तो लगेच चिडत असे. त्याचा राग व्यक्त करी. पण संत तुकारामांची भूमिका त्यापेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. आपल्याला साहित्यातून किंवा त्यांच्या अभंग-ओव्यांमधून भेटणारे संत तुकाराम हे विद्रोही दितात. त्यांनी जातीभेदासारख्या विषयांवर केलेली परखड टीका आपल्या वाचनात आली आहे. पण प्रत्यक्ष जीवनात ते तितकेच संयमी, शांत स्वभावाचे होते. त्यांच्या वागण्यात कुठेच बंडखोरी दिसत नसे. तुकारामांच्या व्यक्तिरेखेसाठी मी अजूनही अभ्यास करीत आहे. पण त्यांच्याविषयी माहिती मिळवणे आणि त्यांची भूमिका साकारणे यात फरक आहे. त्यामुळे ते कसे वागत असतील, कसे बोलत असतील हे सर्व मी माझ्या कल्पनेनुसार साकारत असल्याचेही त्याने सांगितले.
 चिन्मयच्या सत्यजितवर प्रेक्षकांनी जितके भरभरून प्रेम केले तितकीच त्याला टीकाही सहन करावी लागली होती. मालिकेच्या लेखनाची जबाबदारीही चिन्मयनेच पार पाडली असल्यामुळे तो थेट टीकेचा धनी होता. त्याबद्दल बोलताना चिन्मयने सांगितले, ‘आजही ‘तू तिथे मी’मधील व्यक्तिरेखा किंवा प्रसंग प्रत्यक्ष जीवनात अनुभवल्याचे सांगणाऱ्या अनेक व्यक्ती मला भेटतात. विवाहबाह्य़ संबंधांसारखे प्रश्न आज कित्येकांच्या घरात पाहायला मिळतात. वय वाढत गेल्याने लग्न न झालेली आत्या, नवऱ्याची संशयी वृत्ती हे सर्व आज समाजात घडत आहे आणि तेच मालिकेत दाखवण्याचा प्रयत्न आम्ही केला. गोष्टीत कुठेच खोटेपणा नव्हता, पण त्याचे सादरीकरण दैनंदिन मालिकांच्या ठोकळ्यात बसेल अशा रंजक पद्धतीनेच करावे लागले होते आणि तेच काही जणांना खटकले, असा खुलासा चिन्मयने केला.