करोना विषाणूचं संकट दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. त्यामुळे सर्वत्र भीतीचं वातावरण पसरलं आहे. याच काळात जनतेच्या सुरक्षेसाठी देशात चौथ्या टप्प्यातील लॉकडाउन घोषित करण्यात आला आहे. मात्र लॉकडाउनमुळे सारं काही बंद असल्यामुळे हातावर पोट असणाऱ्यांना प्रचंड हाल सहन करावे लागत आहेत. त्यामुळे परराज्यातून आलेले नागरिक त्यांच्या गावी परत जाण्यासाठी धडपड करत आहेत. यातच अभिनेता सोनू सूद या मजुरांच्या मदतीसाठी पुढे आला असून सातत्याने तो गरजुंना मदत करत आहे. विशेष म्हणजे आता त्याने गरजुंपर्यंत पोहोचण्यासाठी आणि त्यांची अडचण दूर करण्यासाठी नवी शक्कल लढविली आहे.

लॉकडाउनचा काळ सुरु झाल्यापासून सोनू विविध मार्गाने गरजुंना मदत करत आहे. आतापर्यंत त्याने परराज्यातून आलेल्या अनेकांना त्यांच्या गावी सुखरुपरित्या पोहोचविलं आहे. त्यामुळे शहरांतील कानाकोपऱ्यांमध्ये अडकलेले मजूर सोनूकडून मदतीची अपेक्षा करत आहेत. त्यामुळेच प्रत्येक गरजूंपर्यंत पोहोचण्यासाठी सोनूने ट्विटरवर एक क्रमांक शेअर केला असून या क्रमांकावर फोन करुन ‘अडचण सांगा’, असं आवाहन केलं आहे.

सोनूने हा फोन क्रमांक शेअर करत ज्यांना घरी जायचं आहे, अशांनी कृपया मला कळवा असं म्हटलं आहे. “जर तुम्ही मुंबईमध्ये आहात आणि तुम्हाला परत तुमच्या गावी जायचं असेल तर कृपया १८००१२१३७११  या क्रमांकावर संपर्क साधा. तसंच तुम्ही किती जण आहात, नेमक्या कोणत्या ठिकाणी आहात आणि तुम्हाला कोणत्या गावी पोहोचायचं आहे हे सांगा. मी आणि माझी टीम शक्य होईल तितकी सगळी मदत करण्यासाठी तयार आहोत”, असं ट्विट सोनूने केलं आहे.

दरम्यान, सोनूचं हे ट्विट पाहिल्यानंतर अनेकांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. लॉकडाउन घोषित झाल्यापासून सोनू सातत्याने गरजुंना मदत करत आहे. आतापर्यंत त्याने जवळपास ४५ हजार जणांच्या जेवणाची सोय केली आहे. तसंच त्याचे हॉटेलदेखील डॉक्टर आणि अन्य कर्मचाऱ्यांना विश्रांतीसाठी दिले आहेत. इतकंच नाही तर त्याने आतापर्यंत हजारांपेक्षा जास्त मजुरांना त्यांच्या गावी पाठविण्यास मदत केली आहे.