छोट्या पडद्यावरील विशेष लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे ‘इंडियाज बेस्ट डान्सर’. सध्या हा कार्यक्रम विविध कारणांसाठी चर्चेत आहे. यामध्येच आता अभिनेत्री नोरा फतेहीने हा कार्यक्रम सोडल्यामुळे नवीन चर्चा रंगली आहे. मलायका अरोरा या शोमध्ये परतल्यामुळे नोराने हा कार्यक्रम सोडल्याचं सांगण्यात येत आहे.
काही दिवसांपूर्वी मलायका अरोराला करोनाची लागण झाली होती. त्यामुळे तिने काही काळासाठी या कार्यक्रमापासून फारकत घेतली होती. मात्र, आता मलायकाने करोनावर मात केली असून ती तिच्या कार्यक्रमाकडे परत वळली आहे. विशेष म्हणजे मलायका नसल्यामुळे नोरा या कार्यक्रमात परिक्षक पदाची भूमिका पार पाडत होती. परंतु, मलायका परत आल्यामुळे नोराने हा कार्यक्रम सोडला आहे.
दरम्यान, नोराने हा कार्यक्रम सोडल्यामुळे प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका गीता कपूर प्रचंड भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. तसंच गीता कपूर यांनी सोशल मीडियावर नोरासाठी एक पोस्टदेखील शेअर केली होती. नोरा बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री असून बऱ्याचदा ती तिच्या डान्सच्या व्हिडीओमुळे चर्चेत असते.