रॅपर एमसी कोडे म्हणून लोकप्रिय असलेला आदित्य तिवारी हा २ जूनपासून बेपत्ता आहे. आदित्य गेल्या काही दिवसांपासून नैराश्यात होता. तो नैराश्येत आहे असं त्याने एक सोशल मीडिया पोस्ट शेअर करत सांगितले होते. त्या पोस्टमध्ये त्याने सांगितले की तो यमुना नदीच्या पुलावर आहे. त्यानंतर आदित्यचा यमुना नदीजवळ शोध घेण्यात आला परंतु तिथे तो भेटला नाही. तेव्हापासून त्याचे सर्व चाहते हे चिंताग्रस्त आहेत. तर दुसरीकडे काही लोक ही सुसाईड नोट असल्याचा दावा करतं आहेत.

आदित्य हा २२ वर्षाचा आहे. त्याने ही पोस्ट त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केली आहे. “सतत सुरू असलेला संघर्ष आणि इतर समस्यांमुळे मी त्रासलो आहे. यामुळे आता मी थकलो आहे. मला असं वाटतं की एक दिवस हे सगळं संपेल आणि मी शांत होईल. सध्या मी यमुना नदीच्या पुलावर एकटा आहे. इथून मला दिसतं की त्या लाटा माझ्या वेदनांना समजून घेत आहेत त्या मला उत्तर देत आहेत,” असे आदित्य म्हणाला.

“मी फक्त क्षमा मागू शकतो, कारण माझ्या स्वार्थपूर्ण निर्णयामुळे बऱ्याच लोकांना त्रास झाला आहे. परंतु तुम्हाला हे समजून घेणं गरजेच आहे की शेवटी माझ्यासाठी शांतता आणि माझ्या आजुबाजुला असलेल्या लोकांच्या सुरक्षेची ही किंमत आहे. मी स्वत: शिवाय इतर कोणालाही दोष देत नाही. माझ्यापासून सुटका होणे ही शिक्षा असेल जी संपूर्ण देशाला हवी आहे. धन्यवाद,” अशा आशयाची पोस्ट आदित्यने केली आहे.

ही पोस्ट शेअर करण्याआधी आदित्यने मुंबईत स्थित असलेल्या एका रॅपरला मेसेज केला. “मी हे शरीर सोडून जात आहे. तुम्ही आता हा वारसा सुरू ठेवा.”

गेल्या आठवड्यात रॅप वॉरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. यात आदित्य हा हिंदू धर्मग्रंथांचा अनादर करताना दिसतं आहे. हा व्हिडीओ आदित्य १७ वर्षांचा होता तेव्हाचा आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आदित्यला मृत्यूच्या धमक्या देण्यात आल्या.

आदित्य हा दिल्लीत मोठा झाला. त्याच्या मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार आदित्य लहान असताना त्याच्या वडिलांनी आत्महत्या केली होती.