‘धुरळा’ हा मल्टीस्टारर मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अलिकडेच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. या ट्रेलरमध्ये वाजवण्यात आलेल्या पार्श्वसंगीताची प्रेक्षकांनी प्रचंड स्तुती केली होती. तेव्हापासूनच रसिकमंडळी ‘धुरळा’तील गाण्यांची आतुरतेने वाट पाहात होते. अखेर चित्रपटातील पहिले गाणे प्रदर्शित झाले आहे.
नजर धार धार मानूस दमदार
राजाचा जिगर पब्लिक फिगर
धुरळा करतोय जिथंबी शिरतोय
धिंगाणा होतोय तिथं
नाद करा पणं आमचा कुठ?
असे या गाण्याचे बोल आहेत. सोशल मीडियावर सध्या या गाण्याचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. काही तासांपूर्वी प्रदर्शित झालेले हे गाणे यूट्यूबवर १८ हजार पेक्षा अधिक वेळा नेटकऱ्यांनी पाहिले आहे.
हव्वा कुनाची रं? … हव्वा आपलीच रं! असं म्हणत दिग्दर्शक समीर विद्वांस यांच्या ‘धुरळा’ चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर सध्या चर्चेत आहे. अल्का कुबल, सई ताम्हणकर, सोनाली कुलकर्णी, प्रसाद ओक, अंकुश चौधरी, सिद्धार्थ जाधव, उमेश कुलकर्णी, अमेय वाघ अशी मराठी चित्रपटसृष्टीतील जबरदस्त तगडी स्टारकास्ट या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दिसते आहे. गावाकडच्या मातीत मुरलेलं राजकारण, निवडणुकांची रणधुमाळी आणि सत्तेच्या या खेळात एकमेकांवर कुरघोडी करताना उडालेला राजकारणाचा ‘धुरळा’ हे सगळेच पैलू या ट्रेलरमध्ये उलगडण्यात आले आहेत. ३ जानेवारी २०२० मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 21, 2019 6:03 pm