भक्ती परब

‘देवबाभळी’, ‘अलबत्या गलबत्या’, ‘अनन्या’, ‘आरण्यक’, ‘हॅम्लेट’, ‘अमर फोटो स्टुडिओ’, ‘कार्टी काळजात घुसली’, ‘डोन्ट वरी बी हॅप्पी’ या मराठी नाटकांकडे पाहिले तर प्रथमदर्शनी एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे नाटकांचे वैविध्यपूर्ण विषय. गेल्या दोन वर्षांत मराठी नाटकात विविध प्रयोग झाले, सादरीकरणात वेगळेपणा आला, लोकप्रिय कलाकार रंगभूमीकडे वळले, निर्मिती संस्थांनीही कंबर कसली. यामुळे रंगभूमी आता पुन्हा एकदा नव्या वळणावर आणि सकारात्मक बदलांतून जात आहे. सध्या मराठी रंगभूमीवर काय चाललंय? नाटय़वर्तुळात नेमकं काय वातावरण आहे? प्रेक्षकांचा नाटकाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललाय का? कुठली नाटकं जास्त पाहिली जातात? दसरा-दिवाळी सुटय़ांच्या निमित्ताने नाटकं पाहिली जातात का? नाटकांसमोर कोणती आव्हाने आहेत?, अशा विविध मुद्दय़ांवर नाटय़क्षेत्रातील मान्यवरांशी साधलेला संवाद..

दसरा, दिवाळी म्हणून नव्हे तर नाटकांसाठी आताचा काळ खूपच चांगला आहे. सगळ्याच नाटकांना उत्तम प्रतिसाद मिळतोय. गेल्या वर्षीपासून आलेली नाटकं बघता ‘देवबाभळी’, ‘अनन्या’ यासारखी वेगळा विषय आणि वेगळे सादरीकरण असलेल्या नाटकांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. दरवर्षी असाच कल असतो. पन्नासेक नाटकं येतात. त्यातील ४-५ नाटकं  जी लोकांना भावतात, त्यांची तोंडी प्रसिद्धी होऊ न ती नाटके पाहणारी प्रेक्षकसंख्या वाढते. ‘अमर फोटो स्टुडिओ’ हे नाटक दोन वर्षांंपूर्वी सादर झाले असले तरी त्याला अजूनही चांगला प्रतिसाद आहे. ‘आमच्या हिचं प्रकरण’ हे नाटकही उत्तम चालले आहे. ‘हॅम्लेट’ नाटकालाही प्रेक्षकांची चांगली गर्दी आहे. मात्र अमूक एका प्रकारच्या नाटकांचाच कल आहे असे निश्चितपणे सांगता येणार नाही. १९९९ ते २००० या काळात वेगवेगळ्या विषयांवरची खूप नाटके आली आणि त्यांना प्रतिसादही चांगला मिळाला. त्यावेळी विनोदी आणि गंभीर नाटके दोन्हीही चालायची. आताच्या नाटकांना मिळणारा प्रतिसाद पाहता विशिष्ट प्रकारचेच नाटक नको, तर सगळ्याच प्रकारचे विषय प्रेक्षकांना आवडत आहेत, असे नाटय़निर्माते श्रीपाद पद्माकर यांनी सांगितले.

नाटकाचा प्रेक्षक कमी झाला आहे हे खरे नाही. नाटय़कला प्रेक्षकांनीच जिवंत ठेवली आहे. पण कलाकारांच्या बाबतीत बोलायचे झाले तर तिन्ही माध्यमांमध्ये काम करणारे कलाकार सध्या आहेत. तेही त्यांच्या वेळेचे नीट नियोजन करून नाटकासाठी वेळ देत आहेत. नाटकाचे प्रयोग जास्तीत जास्त कसे होतील याकडेही ते लक्ष देतात. तारखांचे नीट नियोजन केले तर कलाकारांना अडचणी येत नाहीत. त्यामुळे माध्यमे ही नाटकांसाठी स्पर्धक न ठरता सध्या पूरकच ठरत आहेत. एखादा चित्रपट चांगला चालला तर त्या कलाकाराचे नाटक बघायला प्रेक्षक येतात. नाटक चांगले चालत असेल तर त्याचा नंतर आलेला चित्रपट बघायला प्रेक्षक गर्दी करतात. माध्यमातून होणाऱ्या प्रसिद्धीचा फायदा सगळ्यांनाच होतो, असं मतही श्रीपाद पद्माकर यांनी व्यक्त केले.

सध्या लोकप्रिय असलेल्या आणि तेवढीच ताकदीची संहिता असलेल्या ‘संगीत देवबाभळी’चे निर्माते प्रसाद कांबळी म्हणाले, नाटक चांगले असेल तर शनिवार-रविवारच नाही तर इतर दिवशीही प्रेक्षक गर्दी करतात. ‘साखर खाल्लेला माणूस’ किंवा ‘अनन्या’, सध्या सुरू असलेल्या काही नाटकांना चांगला प्रेक्षकवर्ग आहे. तुम्ही काय चांगले देता त्यावर नाटक बघायचे की नाही हे प्रेक्षक ठरवतात. नवीन नाटकेही साधारणत: डिसेंबरच्या शेवटी येतात. तर काही नाटकेदसरा-दिवाळीच्या मुहूर्तावर सुरू होतात. दिवाळीत तीन/चार नवी नाटके येतात. पण जानेवारी आणि मार्च-एप्रिल दरम्यान येणाऱ्या नाटकांचे काही कल ठरून गेले आहेत. ठरावीक अभिनेत्याचा चित्रपट आला की प्रेक्षक गर्दी करतात, तसं मराठी नाटकांमध्ये प्रेक्षक फक्त प्रशांत दामले यांच्या नाटकांना गर्दी करतात. पण इतर नाटके नाटकातील आशयामुळे चालतात. नाटय़व्यवसाय हा सर्जनशील तितकाच जुगार (गॅम्बल) आहे. प्रत्येक नाटकाला स्वत:ला नव्याने सिद्ध करावे लागते. नाटय़संस्था आणि कलाकारांच्या प्रभावाने नाटक चालणारा सुवर्णकाळ निघून

गेला. वेगळे प्रयोग किंवा कलाकारांची वेगळी शैली यामुळे नाटक चालते. नाटय़क्षेत्रात अजूनही तितक्याच मेहनतीने प्रयोगशील कलाकार आणि निर्माते नवे काही करण्याचा प्रयत्न करत असतात. रंगभूमीचे अस्तित्व चांगल्या प्रकारे होणाऱ्या आशयनिर्मितीमुळेच टिकून आहे. प्राजक्त देशमुख, इरावती कर्णिक, क्षितिज पटवर्धन सारखी युवा पिढी आहे. अशा नावीन्याचा ध्यास घेतलेल्या पिढीमुळेही नाटकांना चांगला काळ अनुभवायला मिळत आहे. तरुण पिढीकडून मला खूप अपेक्षा आहेत. नाटकासमोर आव्हाने नेहमीच असतात. ही आव्हाने काळानुरूप बदलतात. या आव्हानांमुळेच नाटय़व्यवसायात काम करताना मजा येते.

नाटय़व्यवसायातील आजवरचा अनुभव आणि सध्याचा कल याविषयी निर्माते राहुल भंडारे यांनी सांगितले, गेली १० ते १५ वर्षे रंगभूमीवर सक्षम असे बालनाटय़ नव्हते. ‘अलबत्या गलबत्या’ या बालनाटय़ाने व्यावसायिक नाटकांचेही सगळे विक्रम मोडले. गेली काही वर्ष सक्षम बालनाटय़ नसल्यामुळे नवा प्रेक्षकवर्ग जन्माला येत नाही, हे आमच्या लक्षात आले. आजच्या युवा पिढीला समाजमाध्यमांच्या जाळ्यातून रंगभूमीकडे वळवायचे असेल तर चांगली नाटके देणे गरजेचे आहे. ‘आरण्यक’ नाटक नुकतेच सादर झाले असून त्यालाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मराठी रंगभूमीसाठी ही सकारात्मक गोष्ट आहे. वेगळ्या धाटणीची नाटके व्यावसायिक रंगभूमीवर चांगला गल्ला जमवितात. चित्रपटांनाही नाटय़कलावंताची दखल घ्यावी लागते. शिवाजी मंदिर ते प्लाझाचा पदपथ हे  अंतर आता कमी होत आहे. ‘हॅम्लेट’ सारखे नाटकही चांगले चालले असून रंगभूमीला चांगले दिवस येत आहेत. मंदीच्या काळातील हा सुवर्णकाळ असावा आणि ठरावाही. सणासुदीच्या दिवसातही प्रेक्षक नाटकांना निश्चितच गर्दी करतात. गणपती विसर्जनाच्या दिवशी केलेले प्रयोगही ‘हाऊ सफुल्ल’ झाले होते. दसरा ते डिसेंबर दरम्यान नाटकांसाठी सुगीचा काळ असतो. ऑक्टोबरनंतर पश्चिम महाराष्ट्रात कापणी सुरू होते. शेतकऱ्यांकडे पैसा आलेला असतो. त्यावेळी नाटक पाहण्याकडे त्यांचा कल असतो. यावर्षी दिवाळी पहाटेला ‘अलबत्या गलबत्या’चे प्रयोग आहेत. सध्या लहान मुले पालकांना घेऊ न येत आहेत. तिकिटाचे दर वाढले तरी ते नाटक प्रेक्षक बघू शकतात.

नाटकांचा बदलता कल याविषयी बोलताना नाटय़निर्माते दिनू पेडणेकर यांनी सांगितले. फक्त शहरातील प्रेक्षक गृहीत धरून चालत नाही. मुंबई, ठाणे, पुणे आणि त्यापलीकडेही चोखंदळ रसिक आहे. आता दिवाळीनंतर नाटकांचा सुगीचा काळ सुरू होईल. तो १० मार्चपर्यंत राहील. त्यानंतर मुलांच्या परीक्षा असतात. मुंबई आणि परिसरात लोकप्रिय होणारी नाटके शहरातून नाशिक आणि त्यापलीकडे दौरे करतात. नाटकांना चांगले बुकिंग आहे. आम्ही नाटकाचे ‘ऐच्छिक देणगी मूल्य’ प्रयोग करतो. त्यालाही खूप चांगला प्रतिसाद आहे. ‘हे मृत्युंजय’ नाटकाच्या प्रयोगानंतर आम्ही प्रेक्षकांना, या नाटकाचे प्रयोग पुन्हा पाहायचे असल्यास आम्हाला सहकार्य करा, असे आवाहन करतो.

दूरचित्रवाहिन्यांवरील मालिकांमधील कलाकार नाटकात असतील तर प्रेक्षक नाटकाकडे जास्त वळतात, असे सर्व निर्मात्यांनी सांगितले.

‘नव्या नाटकांची संख्या कमी ’

सध्या खूपच धीम्या गतीने नाटकांचे प्रयोग होत आहेत. शनिवार-रविवार पण तेवढा गर्दीचा जात नाही. सोमवार ते शुक्रवार बऱ्याच नाटय़गृहात (दीनानाथ ते गडकरीपर्यंत) प्रयोग होत नाहीत. पण ही परिस्थिती नवरात्रोत्सवापर्यंत सुधारते, हे आतापर्यंतच्या अनुभवावरून सांगता येईल. ऑगस्ट आणि सप्टेंबर दरम्यान १५ ते २० नाटकं दरवर्षी येतात. पण यावर्षी एखाद दुसरं नाटक सादर झालं आहे. गणेशोत्सवानंतर आतापर्यंतचा प्रतिसाद पाहता तो कमीच आहे. दिवाळीत तो वाढला पाहिजे. दिवाळीचे पहिले दोन/तीन दिवस लोक खरेदीत गुंतलेले असतात. मग तिसऱ्या-चौथ्या दिवसापासून नाटक पाहण्यासाठी प्रेक्षक येतात. ‘नोटाबंदी’चा परिणाम गेली दोन वर्षे दिसतो आहे. त्यामुळे व्यवसायात तेजी नाही पण चांगल्या नाटकाला प्रेक्षक आहे. आता नोव्हेंबरपासून चांगल्या नाटकांना सुरुवात होईल. शिवाजी मंदिरला ‘वस्त्रहरण’, भरत जाधव आणि प्रशांत दामले यांच्या नाटकांना प्रेक्षक गर्दी करतात. अलीकडे प्रेक्षकांना सेलिब्रेटी कलाकार लागतात. ते असले की प्रेक्षक नाटक पाहायला येतात. यावर्षी ‘अलबत्या गलबत्या’ या बालनाटय़ाने उच्चांक गाठला आहे. ज्या कलाकारांच्या मालिका दूरचित्रवाहिन्यांवर सुरू आहेत, त्या कलाकारांच्या नाटकाला प्रेक्षक गर्दी करतात.

हरी पाटणकर , बुकिंग क्लार्क, शिवाजी नाटय़मंदिर